(रत्नागिरी / प्रतिनिधी)
भंडारी समाजाच्या सर्वांगिण विकासासाठी समाज एकत्र करणे काळाची गरज आहे. समाजाची शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक आणि राजकीय उन्नत्ती साधायची असेल तर एकत्र येऊन भंडारी भविष्याचा वेध घेणे क्रमप्राप्त आहे. याच उद्देश्याने रत्नागिरी येथे भंडारी समाजाचे अधिवेशन रविवार दि. २५ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आले असल्याची माहिती महाराष्ट्र चेंबर ऑफ काॅमर्सचे माजी अध्यक्ष आशिष पेडणेकर यांनी दिली. यावेळी राजीव कीर उपस्थित होते.
कोकणात पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, गोवा, पुणे, नांदेड या ठिकाणी भंडारी समाज वास्तव्यास आहे. अनेक मंडळाच्या माध्यमातून भंडारी समाजाचे सामाजिक कार्य सुरू आहे. या सर्व मंडळांना एकत्र करून अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. २००७ साली वेंगुर्ला येथे अधिवेशन झाले होते, त्यानंतर रत्नागिरीत होणार आहे. या अधिवेशनामध्ये शैक्षणिक, सामाजिक आर्थिक, व्यावसायिक विषयांवर चर्चासत्र होवून त्यामध्ये समाजहिताचे काही ठराव संमत केले जाणार आहेत.
अधिवेशनामध्ये महिलांसाठी एक विशेष सत्राचा समावेश असणार आहे. राज्यातील समस्त भंडारी बांधव एकत्र येणार असून वक्तेसुध्दा भंडारी समाजातील असणार आहे. कोणत्याही राजकीय पक्षाचा समावेश असणार नाही. अधिवेशनामध्ये २५ वर्ष समाजाला पूरक ठरणारा ठराव मांडण्यात येणार आहे.
अधिवेशनासाठी केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, गोव्याचे माजी मुख्यमंत्री रवी नाईक, भंडारी नेते अनिल होबळे, माजी मंत्री कालिदास कोळंबकर, मुंबई विद्यापिठाचे माजी कुलगुरू डाॅ. सुहास पेडणेकर भंडारी समाज नेते नवीनचंद्र बांदिवडेकर, पत्रकार राजेश कोचरेकर, बिपिन मयेकर, सुभाष मयेकर उपस्थित राहणार आहेत. भंडारी समाजबांधवांनी बहुसंख्येने अधिवेशनासाठी उपस्थित रहावे, असे आवाहन राजीव कीर यांनी केले आहे.