मे महिन्यात उन्हाळी सुट्टी पडली आणि राज्यघटना आणि नागरिक राजेंद्रप्रसाद मसुरकर यांचे पुस्तक वाचण्याची संधी मिळाली. खरोखरच एखादी कादंबरी किंवा एका अजरामर व्यक्तिमत्त्वाचे चरित्र वाचताना प्रारंभीपासून अगदी शेवटपर्यंत पुस्तक कधी वाचून पूर्ण करतो असे एखाद्या वाचकाला वाटते तीच स्थिती राजेंद्रप्रसाद मसुरकर यांनी आपल्या संकल्पनेतून आणि व्यासंगातून साकारलेल्या राज्यघटना आणि नागरिक हे पुस्तक हाती घेऊन वाचताना माझी झाली.
सौ. मुग्धा मसुरकर यांनी अवेश्री प्रकाशन रत्नागिरी येथून १४ एप्रिल २०२४ रोजी हे पुस्तक प्रकाशित केले असून या पुस्तकाचे लेखक राजेंद्रप्रसाद मसूरकर आहेत. एकूण पृष्ठ ६८ असून या पुस्तकाचे मूल्य शंभर रुपये आहे. या पुस्तकाला नागपूर येथील प्रसिद्ध विधीज्ञ तसेच स्तंभलेखक ॲड.प्रतीक राजुरकर यांची प्रस्तावना अनेक वाचकाला आकर्षित करणारी आहे.
या पुस्तकात लेखकाने संपूर्ण राज्यघटनेच्या आशयाबरोबर राज्य घटनेची मूल्य -तत्वे – वैशिष्ट्ये अतिशय मोठ्या कौशल्याने मांडणी करून हे पुस्तक वाचकांच्या पसंतीस उतरवले आहे, खरं तर हे श्रेय लेखकाच्या विद्वत्तेला जाते. लेखकाने अतिशय अभ्यासाने विविध दाखले आणि काही ऐतिहासिक पुरावे , घटनांचा संदर्भ देऊन विवेचन केले असल्याने वाचक हे पुस्तक आवडीने घटना समजून घेत पुढे जात राहातो. त्यामुळे हे पुस्तक वाचकांच्या आणि भारतीय नागरिकांच्या मनात आपल्या लिखीत लोकशाही मूल्यांचा , तत्वांचा, अधिकारांचा आणि कर्तव्याचा एक अमूल्य दस्तऐवज आहे ही भावना दृढ होते.
भारतीय प्रजासत्ताकाच्या अमृतमहोत्सवी वर्षात हे पुस्तक निर्मिले गेल्यामुळे या पुस्तकाला वाचकांचा प्रतिसाद भरभरून मिळत आहे. औचित्य प्रजासत्ताक अमृत महोत्सव ही संकल्पना केंद्रस्थानी ठेवून सर्व भारतीय नागरिकांना राज्यघटना आणि नागरिक हे पुस्तक हाती देऊन आपले संविधान ,आपली लोकशाहीची शाश्वत मूल्य जनमानसात पुन्हा तितक्याच स्फुर्तिदायकतेने जागृत करणे ही कल्पनाच भारतीय सुजाण नागरिक म्हणून प्रसिद्ध विचारवंत आणि समीक्षक राजेंद्रप्रसाद मसुरकर यांनी या पुस्तकाच्या रूपाने केली आहे.
विशेष म्हणजे या पुस्तकात भारतीय राज्यघटनेची जाणीवपूर्वक ओळख नव्या पिढीला या पुस्तकाच्या रूपाने सहज आकलन होईल अशी समृद्ध भाषाशैली वापरली आहे. भारतीय राज्यघटना ही लोकांनी निर्माण केलेली लोकशाही राज्याचा पायाभूत असल्याचे उल्लेख या पुस्तकात करून लेखकाने भारतीय राज्यघटनेची व्यापक ओळख, राज्यघटनेचे महत्त्व, गरज, लोकशाही व्यवस्थेची परंपरा, संविधान निर्मिती, विश्वव्यापी प्रास्ताविका,आपले हक्क, संविधानातील विविधतेतील एकता, संविधानातील भाग, परिशिष्ट, घटना दुरूस्ती, बहुमत यांसारखे काठीण्य पातळीचे विषय अगदी सहजतेने आणि ओघवतेपणे रेखाटले आहे. शिवाय घटनादत्त अधिकार,मानवी जीवनातील सुखी तत्वं, धर्म आणि संस्कृती जतनाचा अधिकार, घटनेतील मार्गदर्शक तत्वे आणि मूलभूत कर्तव्य आजच्या पिढीत रुजविण्यासाठी लेखकाची हातोटी खरच वाखाणण्याजोगी आहे.
हे पुस्तक घरोघरी वाचनालयात अनिवार्य असून ते शालेय ग्रंथालयात उपलब्ध झाले तर उद्या शाळा कॉलेजमधून बाहेर पडणारा युवक संविधानातील कलमांविषयी अथवा आपल्या अधिकार व कर्तव्ये याविषयी , लोकशाहीविषयी ,भारतीय संस्कृतीविषयी आपली मते निर्भीडपणे मांडू शकेल एवढी प्रचंड ऊर्जा या पुस्तकातून मला मिळाली आणि ती अनेक वाचकांना मिळेल याविषयी मला ठाम विश्वास आहे.
भारतीय राज्यघटना -घटना समिती, मसुदा समितीने तसेच अनेक लोकनियुक्त प्रतिनिधी यांच्या माध्यमातून साकारली. घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर , घटना समितीचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्यासह अनेक विद्वान,अनेक पंडित, अनेक लोक नियुक्त प्रतिनिधी यांच्या माध्यमातून उदयास आली.संविधान निर्मितीत राष्ट्रातील लोकांना मान्य असलेले लोकप्रतिनिधी होते.घटनाकारांनी लिहिलेले मसुदे देशातील सर्व जनतेला खुलेपणाने वाचण्यात देण्यात आले आणि जनतेने कळविलेल्या मतांचा सूचनांचा सांगोपांग विचार घटना समितीने केला.यावरून राज्यघटनेच्या निर्मितीत सामान्य जनतेचाही सहभाग असल्याचे लेखकाने नमूद केले आहे.त्यामुळे ही राज्यघटना जागतिक स्तरावरील मोठी लिखित स्वरूपाची राज्यघटना म्हणून ओळखली जातेच,ना पूर्णतः ताठर ,ना पूर्णतः लवचिक अशा स्वरूपाची राज्यघटना ही लोककल्याणकारी राज्यघटना म्हणून या पुस्तकातून यशस्वीपणे मांडली आहे. ज्याने भारतीय संविधान ज्यांनी वाचले नाही अशांना राज्यघटना आणि नागरिक हे पुस्तक वाचून राज्यघटनेचा गाभा सहज आकलन होईल.
राष्ट्रातील जनतेचे उद्दिष्ट आशा-आकांक्षा ,राजकीय व्यवस्था, सामाजिक संक्रमण ,सार्वजनिक जीवन यांना नव्या आणि आधुनिक विचारांची बैठक दिली. देशी परदेशी अभ्यासकांनी ,विद्वानांनी गौरवलेली समावेशक व अर्थपूर्ण प्रस्ताविका राज्यघटनेच्या प्रारंभी लिहिली तिचे विवेचन लेखकांनी आपल्या प्रभावी धाटणीने केले आहे.राज्यघटनेत बदल करण्यासाठी बहुमताचे विवेचन सोपी उदाहरणे देऊन वाचकांना समजावून दिली आहेत. राज्यघटना निर्मात्यांनी लोक घटनेच्या केंद्रस्थानी मानले येथेच लोकशाही यशस्वी ठरली.
भारतीय राज्यघटनेत प्रत्येक विधान नि:संदिग्ध रीतीने लिहिले असल्याची नोंद या पुस्तकात आवर्जून करण्यात आली आहे.त्यामुळे आपले संविधान सुस्पष्ट आणि सर्वसमावेशक आहे.पुस्तकात तीन -चार -पाच पृष्ठानंतर पुढील पानावर चौकोनात लक्षवेधी व आशयपूर्ण संदर्भिय टिप्पणी वाचकांच्या विचारात अधिक भर घालते. राज्यघटनेची वैशिष्ट्ये मूल्य- तत्वे पुस्तकात अतिशय मनोवेधक, शब्द आणि वाक्य सहज आकलन होणारी तर काही संदर्भ अधिक वैचारिक उंचीचे दिल्याने हे पुस्तक सर्वांना दिशादर्शक ठरणारे आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रजांच्या राजवटीतील कायदे ,भारतीय प्राचीन गणराज्य, बौद्धकालिन व शिवकालीन संदर्भ, दाखले समाविष्ट असल्याने लेखकांची मांडणी, उंची, वैचारिता अनेकांना आपलीशी करते. अनेक क्रांतिकारक, विचारवंत, कायदेपंडित यांचा योग्य तिथे अपेक्षित उल्लेख आल्याने या पुस्तकाची व्याप्ती वाढली आहे.
जमिनीवर पाय असलेले कर्तबगार,आंतरराष्ट्रीय पातळीवरील समीक्षक आणि अभ्यासू लेखक म्हणून राजेंद्रप्रसाद मसुरकर यांनी राज्यघटना आणि नागरिक हे पुस्तक साकारुन गरूडझेप घेतली आहे , हे पुस्तक अनेकांना दिशादर्शक ठरणारे, अनेकांच्या ज्ञानात भर घालणारे आहे एवढे नक्की…
पुस्तक परीक्षण – संतोष रा.पवार
मु.पो.जाकादेवी
ता. जि. रत्नागिरी
मोबाईल ९४२३०४९९८३
पुस्तकाचे नाव- राज्यघटना आणि नागरिक
प्रकाशक-अवेश्री प्रकाशन, रत्नागिरी
लेखक- राजेंद्रप्रसाद मसुरकर
पृष्ठे ६८ मूल्य १००/-