(रत्नागिरी)
खरीप हंगामाची अंतिम आणेवारी जाहीर होऊन जवळपास अडीच महिन्याचा कालावधी लोटला तरीही विम्याचा पूर्ण लाभ मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रमावस्था वाढत आहे. विमा कंपनी शेतकऱ्यांची अग्रिमवरच बोळवण करणार का, असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत. शेकडो शेतकरी अग्रिम लाभापासूनही वंचित आहेत.
सन २०२३-२४ च्या खरीप हंगामातील पिकांची अंतिम आणेवारी ३० डिसेंबरला जाहीर झाली आहे. जवळपास अडीच महिन्याचा कालावधी उलटला असला, तरी अजूनही विम्याचा पूर्णपणे लाभ मिळालेला नाही. मागील महिन्यात २५ टक्के अग्रिम देण्यात आला आहे. यामध्येही अध्यापेक्षा जास्त शेतकरी अग्रिमपासून अजूनही वंचित आहेत. जिल्ह्यात एकूण १५०० महसुली गावे आहेत. या सर्वच गावांची खरीप हंगामाची अंतिम पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी म्हणजे ४८ पैसे आलेली आहे. या वर्षी पावसाळा तब्बल एक महिन्याने उशिरा सुरू झाला व त्यानंतरही पावसात खंड पडला. त्यामुळे भात पीक संकटात आले होते. नाचणीच्या उत्पादनालाही फटका बसला होता.
कृषी विभागाच्या आवाहनामुळे तसेच शासनाकडून एक रुपयात विमा दिल्यामुळे जवळपास ९० टक्के शेतकऱ्यांनी पीक विमा काढला आहे. खरिपाची अंतिम पैसेवारी ५० पेक्षा कमी आल्यास पीक विमा व दुष्काळग्रस्तांसाठीच्या सर्व सवलती लागू होतात. पीक विमा, जमीन महसुलात सूट, सहकारी कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीला स्थगिती, कृषी पंपांच्या वीज बिलात सवलत, विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफी, रोजगार हमी योजनांच्या कामाच्या निकषात शिथिलता, आवश्यक तिथे पिण्याचे टँकर इत्यादी सवलती दिल्या जातात.
अडीच महिन्याचा कालावधी उलटला
जिल्ह्यातील सर्वच मंडळाची अंतिम पैसेवारी ३० डिसेंबरला जाहीर झाली आहे. जिल्ह्याची अंतिम पैसेवारी जाहीर होऊन जवळपास अडीच महिन्यांचा कालावधी उलटला असला तरी विम्यासह इतर सुविधांचा लाभ शेतकऱ्यांना मिळालेला नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.
Follow us on Google News : https://news.google.com/s/CBIw9dzq7KQB?sceid=IN:en&sceid=IN:en&sceid=IN:en&r=0&oc=1