(रत्नागिरी / प्रतिनिधी)
खेड तालुक्यातील उपविभागीय सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी हे निकृष्ठ दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदाराला कसे पाठीशी घालून गलथान कारभार करत आहेत हे खवटी गावातील संजय कुसळकर यांच्या उपोषणाने उघड होत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बसलेल्या उपोषणकर्त्याचा दुसरा दिवस सुरू असून अद्यापही कारवाई करण्याच्या हालचाली दिसत नाही.
उधळे गावातील पाष्टेवाडी संरक्षण भिंत तसेच खवटी गावामधील आदिवासीवाडी येथील संरक्षण भिंतीचे काँक्रीट कामांमध्ये मोठ्या प्रमाणात दगड टाकून काँक्ट्रिक्रिकरण करून हे सर्व काम निकृष्ट केल्याची व चौकशी करण्याची तक्रार बांधकाम विभागाकडे केली होती. उपोषणकर्ते कुसळकर यांनी तक्रारीचा पाठपुरावा करण्यासाठी प्रशासन दरबारी अनेक हेलपाटे मारून सुद्धा ठेकेदारावर कारवाई झाली नाही. त्यामुळे दिनांक १३ जानेवारी २०२५ रोजी रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण छेडले आहे. मात्र उपोषणस्थळी अद्यापही रत्नागिरी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या एकही अधिकाऱ्यांनी भेट दिली नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. यावरून संबधीत ठेकेदाराला अधिकाऱ्यांचा आशीर्वाद आहे का? उपोषणकर्त्याची दखल कोण घेणार? असे प्रश्न आता उपस्थित होत आहे.
दिनांक 15 ऑगस्ट 2024 रोजी रत्नागिरी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांची भेट घेतली असता त्यांनी संबधित ऑफिसला सांगितले असून तुमचे काम होऊन जाईल असे तोंडी आश्वासन दिले होते. 19 सप्टेंबर 2024 रोजी उलटला तरीही कारवाई झाली नसल्याने तक्रारदार पुन्हा अधिकाऱ्यांना भेटून कारवाई का होत नाही? असा जाब विचारल्यानंतर त्यांनी तातडीने पत्रक काढले. या पत्रात नमूद केले आहे की, अर्जदार हे दिनांक २०/९/२०२४ रोजी जिल्हाधिकारी रत्नागिरी कार्यालयासमोर उपोषण करणार असल्याचे नमुद केले आहे आणि सदर तक्रार हे आज दिनांक १९/९/२०२४ रोजी मंडळ कार्यालयात आले असता दि. २०/९/२०२४ रोजी उपोषण संदर्भात अधीक्षक अभियंता यांनी सदरचे उपोषण करु नये याबाबत विनंती केली आहे. त्यावेळी तक्रारदार संजय कुसाळकर यांनी शिक्षक अभियंत्यांच्या विनंतीचा मान ठेवून उपोषण केले नाही.
रक्कम भरण्यास तयार, मात्र कारवाई किती दिवसात करणार?
तथापि उप विभागीय अभियंता सा.बां. उपविभाग खेड यांनी श्री. संजय शिवाजी कुसळकर यांना उद्देशून लिहिलेल्या दि. २७/०२/२०२४ च्या पत्रानुसार सदरच्या निकृष्ठ कामाबाबत सदर तक्रारदार यांस रु.२,९८,०००/- एवढी रक्कम भरण्यास कळविले आहे. त्यानुसार सदर तक्रारदार यांनी त्यांचे दिनांक २२/३/२०२४ च्या पत्रान्वये सदर रक्कम भरण्यास तयार आहे. परंतु सदरचे काम निकृष्ठ आढल्यास सदर ठेकेदारांवर काय कारवाई करणार व भरण्यात आलेली रक्कम केव्हा परत मिळणार असे प्रश्न उपस्थित केले आहे. तक्रारदार कुसळकर यांच्या पत्रानुसार त्यांनी नमूद केलेल्या मुद्दयांबाबत विभागीयस्तरावर आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना सहाय्यक अधीक्षक अभियंता एम.एफ. लोथे ( अधीक्षक अभियंता, रत्नागिरी – सा. बां. मंडळ, रत्नागिरी ) यांनी केल्या होत्या मात्र अद्यापही कोणतीही कारवाई होत नसल्याने तक्रारदार संजय कुसळकर यांनी उपोषणाचे हत्यार उपसले आहे. आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे. मात्र उपोषण सुरूच आहे. रखरखत्या उन्हात, रात्री अपरात्री उपोषणकर्ता एकटा बसलेला आहे. मात्र एसीमध्ये बसलेल्या अधिकाऱ्यांना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बसलेला उपोषणकर्ता दिसत नाही का? असा संतप्त सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे.