( संगमेश्वर / प्रतिनिधी )
दिल्ली येथे संपन्न होणाऱ्या ९८ व्या मराठी साहित्य संमेलनाच्या पूर्व संध्येला पुणे येथून लेखक, प्रकाशक, पत्रकार आणि साहित्य रसिकांना घेऊन जाणाऱ्या ” महादजी शिंदे ” विशेष रेल्वेत सलग दोन दिवस फिरत्या चाकावरील साहित्य संमेलनात कवी आणि लेखकांनी खरी रंगत भरली. चाकावरील सर्व डब्यात विचार चक्रांना चांगलाच वेग आल्याचे रसिकांना अनुभवायला मिळाले. यामुळे या साहित्य यात्री संमेलनात चांगलीच रंगत आली. साहित्ययात्री रेल्वे संमेलनाचे अध्यक्ष शरद तांदळे यांनी कोणतीही कसर सोडली नाही.
सरहद संस्था पुणे आयोजित ९८ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाला दिल्ली येथे जाणाऱ्या लेखक, प्रकाशक, पत्रकार, साहित्य रसिक यांच्यासाठी पुणे येथून नाममात्र शुल्क घेऊन विशेष रेल्वे सोडण्यात आली. या दोन दिवसांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी पुणे येथून रेल्वे सुटताच तासाभरात आयोजकांनी प्रत्येक डब्यात एक स्पीकर, माईक आदि साहित्य पुरवले. यामुळे काही वेळातच १६ डब्यातून कविता, कथा, चारोळी, अनुभव कथन, गीते यांच्या बहारदार मैफली सुरु झाल्या.
राज्याच्या विविध कानोकोपऱ्यातून आलेल्या कविनी साहित्य रसिकांना अक्षरशः मंत्रमुग्ध केले. या कविता ऐकून अनेक नवोदित कवींनाही कंठ फुटला. काही लेखकांनी आपल्या बहारदार कथा ऐकवून वातावरणात एक वेगळाच माहोल निर्माण केला. एका पाठोपाठ एक चारोळ्यांनी तर धम्माल आणली. उपस्थित साहित्य रसिकांनी वेगवेगळी गीतं गाऊन या मैफलित स्वतःलाही झोकून दिले. आजची सकाळ तर संवादिनी, तबला आणि टाळांच्या गजरात सुरु झालेल्या भाजनांनी तर प्रसन्न झाली. प्रत्येक डब्यात हा गजर सुरु असल्याने फिरत्या चाकांना सकाळी जणू एका दिंडीचे स्वरूप आले होते. सकाळी ११ वा. हे भजन कीर्तन सुरूच होते. दुपारी परत एकदा कथा – कविताना जोर चढला आणि दोन दिवसांचा हा प्रवास फिरत्या चाकावरील साहित्ययात्री संमेलनाने अधिक सुखकर केला. सरहद संस्थेचे संजय नहार यांच्या उत्तम नियोजन आणि सुचने नुसार त्यांचे स्वयंसेवकांनी विशेष रेल्वेतील सर्वांची अत्यंत आदराने उत्तम सेवा करत कोणतीही कसर सोडली नाही. साहित्य यात्री संमेलनाचे अध्यक्ष शरद तांदळे यांना यासाठी धन्यवाद देण्यात आले.
फिरत्या चाकांवरील साहित्य संमेलन अविस्मरणीय !
९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी जाणाऱ्या साहित्याच्या सर्व पूजाऱ्यांसाठी फिरत्या चाकावरील हे दोन दिवसांचे अनुभव अविस्मरणीय असेच म्हणावे लागतील. आयोजकांनी गेले दोन दिवस जी उत्तम व्यवस्था केली त्यामुळे प्रवास सुखकर झाला. फिरत्या चाकांवर बहरलेले विनोद, कविता, कथा, गीते, चारोळ्या ऐकून मन तृप्त झालं. फिरत्या चाकांवरील हा प्रवास संपू नये असाच होता. मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी यांनी रेल्वेच्या सर्व डब्यात फिरून लेखक, प्रकाशक, कवी, साहित्यरसिक यांची आस्थेने विचारपूस केली आणि त्यांनीही या मैफलीचा आनंद लुटल्याने उत्साह वाढला.
— घनश्याम पाटील, संपादक चपराक प्रकाशन पुणे