(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील कळझोंडी बौद्धवाडी नजीकच असलेल्या संदीप लक्ष्मण पवार यांच्या शेतात चक्क बिबट्या वाघ दबा धरून बसला असताना गुरांची धावपळ उडाली.अगदी नजीकच तीन फुटावर बिबट्या वाघ बसलेला पाहून शेतकरी संदीप पवार यांची पाचावर धारण बसली. त्यांनी मोठ्या हुशारीने आपली पाळीव जनावरे त्वरित हाकल्याने अपघात टाळला. मात्र या परिसरात प्रचंड घबराटीचे वातावरण पसरले आहे.
गणपती उत्सवाच्या पूर्वसंध्येलाच वाघाने या परिसरात आपली वर्दळ सुरू केली असून भक्ष्य शोधण्यासाठी गुरांच्या मागावर या बिबट्या वाघाची हालचाल दिसून येत आहे. याबाबतचे वृत्त असे की शेतकरी संदीप पवार हे आपली पाळीव जनावरे चरवून सायंकाळी पाच वाजता घरी घेऊन येत होते याचवेळी वाटेत हा बिबट्या वाघ दबा धरून शिकारी भक्ष्य शोधण्यासाठी ऐटीत बसला होता. प्रत्यक्ष वाघ बसलेला पाहून संदीप पवार हे क्षणार्धात भांबावून गेले, त्यांना प्रचंड घाम सुटला व प्रचंड भयभीत झाले. तरीही त्यांनी आपली पाळीव जनावरे झटापटीने सुरक्षितपणे मार्गाने घरापर्यंत आणली.
हा वाघ बौद्धवाडीच्या अगदी नजीक आलेला पाहून येथील इतर शेतकरी सुभाष पवार, सुशांत पवार, संगम पवार, किशोर पवार यांनी घटनास्थळी भेट दिली. यावेळी तो वाघ तेथून दुसऱ्या भागाकडे जात असल्याचे पाहिले. त्यामुळे या भागात प्रचंड खबराटीचे वातावरण पसरले आहे. आपल्या वाड्या वस्तीवर लक्ष ठेवून ते रात्रभर पहारा करीत होते. याबाबत वनविभाग यांना कल्पना देण्यात आली असून वनविभागाने या वाघाचा त्वरित बंदोबस्त करावा अशी आग्रही मागणी कळझोंडी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष संदीप पवार, सामाजिक कार्यकर्ते महादेव आग्रे, किशोर पवार, सुभाष पवार, संगम पवार यांनी केली आहे.