अखिल महाराष्ट्राचे श्रध्दास्थान म्हणून ज्याच्याकडे पाहिले जाते ते श्री क्षेत्र गणपतीपुळे हे रत्नागिरीतील अग्रणी देवस्थान आहे. रत्नागिरीहून ३५ कि.मी. अंतरावर समुद्राकाठी हे लोभस ठिकाण वसलेले आहे. निवळी फाट्यावरून गणपतीपुळ्यापर्यंतचा प्रवास नजरेला सुखावणारा आहे.
डोंगराळ भागात विराजलेली नैसर्गिक मूर्ती आणि लागूनच असलेला अरबी समुद्र यामुळे हे मंदिर पर्यटकांचे आणि भक्तांचे आवडते ठिकाण बनलेले आहे. येथील गणपतीचे मंदिर हे डोंगराला लागून असल्याने, मंदिराला प्रदक्षिणा घालयाची असेल तर संपूर्ण डोंगराला प्रदक्षिणा घालावी लागते. या टेकडीचा परीघ साधारण हा एक किलोमीटर अंतरचा आहे. हा प्रदक्षिणामार्ग असंख्य झाडाझुडपांनी वेढलेला आहे.
रक्षणकर्त्या श्री महागणपतीसमोर अथांग पसरलेला चंदेरी सागर जणू त्याला पदस्पर्श करून शांत होत असतो. गर्द हिरवाईने नटलेल्या डोंगरपरिसरतून मंदिराला मारलेली प्रदक्षिणा भाविकांना मन:शांती देऊन जाते. इथल्या गणेशमंदिराची रचनाही वैशिष्ट्यपूर्ण आहे. चंदेरी सागराच्या पार्श्वभूमीवर गणेशाचे शुभ्र धवल मंदिर खूप उठून दिसते. अनेकांच्या मनोकामना पूर्ण करणारा, भक्तांच्या नवसाला पावणारा हा श्री चिंतामणी आहे अशी भाविकांची या गणेशाबद्दल श्रद्धा आहे.
पेशवेकाळात श्रीमंत नानासाहेब पेशवे यांनी मंदिरासमोरचा नंदादीप उभारला तर श्रीमंत बाजीराव यांचे भाऊ चिमाजी अप्पा यांनी येथे नगारखान्याची व्यवस्था केली. तर श्रीमंत माधवराव पेशवे यांच्या पत्नी रमाबाई यांनी येथे दगडी धर्मशाळा उभारली असे उल्लेख इतिहासात आढळून येतात.
अंगारकी, संकष्टी आणि माघ महिन्यातील चतुर्थीला येथे मोठी यात्रा भरते. परिसरातील उद्यान आणि मंदिर परिसराच्या सुशोभीकरणामुळे हे देवस्थान भाविक आणि पर्यटकांचे एक प्रमुख आकर्षण बनले आहे. या परिसरात अनेक चांगली हॉटेल्स असून घरगुती निवास व्यवस्था मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे.
पर्यटन आणि पुण्य या दोन्हीची सांगड घालता येते :
आरबी समुद्र, वाळूचा किनारा आणि नारळ पोफळीच्या झाडांमुळे हा मंदिर परिसर अतिशय विलोभनीय झाला आहे. गणपतीपुळे येथे समुद्र आणि वाळूचा किनारा असल्याने पर्यटन आणि पुण्य या दोन्हीची सांगड घालता येते. गणपतीपुळे येथील समुद्र किनारा अतिशय स्वच्छ व निळ्याशार पाण्याचा असल्याने पर्यटकांची गर्दी वर्षगभर असते. मुख्यतः सुट्ट्यांमध्ये पर्यटक गणपतीपुळे येथे मोठ्या प्रमाणात गर्दी करतात.
मूषकच्या कानात ईछा सांगितली की पूर्ण होते अशी श्रद्धा :
मंदिराच्या आत शिरतांना बाहेर एक भलमोठा मोठा मूषक नजरेस पडतो. या मूषकच्या कानात भाविक आपली ईछा सांगतात. भाविकांची अशी मान्यता आहे की मूषकच्या कानात आपली ईछा सांगितली की ती पूर्ण होते.
मंदिर परिसरात अनेक दुकाने आहेत यामध्ये लाकडी खेळणी, विविध आकारातील गणपतीच्या मूर्ती,पुजा साहित्य विकणारे यांचा मोठ्याप्रमात समावेश आहे. सोबत समुद्र किनार्यावर नारळ विकणारे व समुद्राचा फेरफटका मारण्यासाठी मोटर बोट,परांपरिक होडी मोठ्या प्रमाणात आहे.
मंदिर प्रशासनाच्या माध्यमातून येथे दुपारच्या अरतींनंतर आणि संध्याकाळी अरतींनंतर प्रसादाचे वाटप केले जाते. यात खिचडी भात, शिरा,साबुदाणा खिचडी ई समावेश असतो.
गणपतीपुळे नाव कसे पडले :
यासंदर्भात येथे एक कथा सांगितली जाते. फार वर्षापूर्वी गणपतीपुळे या गावात मोठी वस्ती नव्हती. कालांतरणे वस्ती निर्माण झाली परंतु गावाचा उत्तर बाजूला. गणपतीपुळेच्या पश्चिम दिशेने उतरण असल्याने बराचसा भूभाग हा पुळणवट आहे. समुद्रापुढे पुळणीचे म्हणजेच वाळूचे भव्य मैदानात गणपतीचे महास्थान असल्यामुळे गणपती आणि पुळणवट भाग असल्याने या गावाला अशा सामाईक शब्दाने ओळखले जावू लागले.अशी माहिती स्थानिक सांगतात.