(राजापूर / तुषार पाचलकर)
रत्नागिरी जिल्ह्यात राजापूर विस्ताराने मोठा तालुका आहे. सह्याद्रीपासून सागरी किनारपट्टीपर्यंत असलेल्या तालुक्यातील जनतेला रेल्वे तिकीट आरक्षणाची समस्या खूप वर्षापासून होती आणि हिच समस्या राजापुरातील दक्ष पत्रकार मंडळींनी केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालय अंतर्गत राज्य स्तरीय दिशा समिती सदस्य संतोष गांगण यांच्याकडे तीन वर्षापूर्वी निदर्शनास आणून दिली. सदर विषयीचा प्रस्ताव श्री. गांगण यांनी तत्कालीन खासदार डॉ. विनय सहस्रबुद्धे यांना दिला. त्यानंतर डॉ. विनय सहस्रबुद्धे यांनी तत्कालीन केंद्रीय रेल्वे मंत्री मा.श्री. पियुष गोयल यांना प्रत्यक्ष भेटून राजापूर पोस्टात पीआरएस सेवा सुरु करण्यासाठी लेखी प्रस्ताव दिला व रेल्वे मंत्रालयात या विषयाचा नियमित पाठपुरावा केला.
कोरोना काळामुळे शासकीय मान्यता प्रक्रियेला थोडा विलंब झाला. भाजप नेते संतोष गांगण यांनी केंद्रीय डाक भवनमधून पोस्टात पीआरएस मशीन बसविन्यासाठी परवानगी मिळवण्यासाठी प्रयत्न करताना कोंकण रेल्वे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. संजय गुप्ता यांच्याशी नियमित संपर्क साधून सदर सेवेसाठी आवश्यक ते नवीन मशीन राजापूर पोस्ट ऑफिसमध्ये बसविण्यात आले आहे. सदर प्रकियेत कोंकण रेल्वेकडून चांगले सहकार्य मिळाले. प्रवाश्याना पीआरची सेवा देण्यासाठी राजापूर पोस्ट ऑफिसचे एक कर्मचारी नियमित नियुक्त करण्यात आले आहेत. देशभरातील प्रवासाचे रेल्वे खिडकी तिकीट राजापूरपासून जवळ कणकवली व रत्नागिरी रेल्वे स्टेशनंला मिळत होते. आता प्रवाश्याना एवढ्या दूर जाण्याची आवश्यकता नसून आरक्षित खिडकी तिकीट राजापूर पोस्ट ऑफिसमध्ये मिळत आहे. तरी सदर पीआरएस सेवेचा जेनतेने लाभ घ्यावा. या जनतेतून डॉ. विनय सहस्रबुद्धे यांचे आभार व्यक्त केले जात आहेत