(राजापूर)
सहकार क्षेत्रात कोकण विभागात अग्रेसर राहिलेल्या येथील राजापूर अर्बन बँकेने आपले कार्यक्षेत्र महाराष्ट्र राज्य केल्याने राज्यभरातून व्यवसायिक, उद्योजक बँकेशी जोडले जात आहेत. राजापूर तालुक्याचे सुपुत्र, प्रसिद्ध आणि लोकप्रिय लेखक, दिग्दर्शक, अभिनेते महेश मांजरेकर आणि विनोदी अभिनेते भालचंद्र उर्फ भाऊ कदम यांनीही अर्बन बँकेचे सभासदत्व स्विकारले असून बँक परिवारात सहभागी झाले आहेत.
बँकेचे ज्येष्ठ संचालक अॅड. शशिकांत सुतार, मुख्य कार्यकारी अधिकारी शेखरकुमार अहिरे, शाखाधिकारी रोहित सामंत यांनी श्री. मांजरेकर व श्री. कदम यांची मुंबई येथे भेट घेतली. व त्यांना बँकेचे सभासद करून घेतले. यावेळी अॅड. शशिकांत सुतार व शेखरकुमार अहिरे यांनी श्री. मांजरेकर व श्री. कदम यांचे राजापूर अर्बन बँकेच्या वतीने स्वागत केले. यासाठी उद्योजक विलास मांजरेकर व सीए प्रसाद देसाई यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
शतकोत्तर वाटचाल करताना राजापूर अर्बन बँकेने राज्यभरात आपले कार्यक्षेत्र विस्तारण्याचा निर्धार केला आहे. राज्यभरातून जास्तीत जास्त नवे सभासद जोडताना निर्धारीत केलेले ठेवींचे लक्ष गाठण्यासाठी संचालक, अधिकारी आणि कर्मचारी वर्ग मेहनत घेत आहेत.