(चिपळूण)
चिपळूण शहरातील मार्कंडी भागात एका गल्लीत असलेल्या एका अपार्टमेंटच्या शेवटच्या मजल्यावर असणारा वेश्या व्यवसायाचा अड्डा पोलिसांनी काल शुक्रवारी रात्री उध्वस्त केला आहे. या वेळी दोन पीडित महिलांची सुटका करण्यात आली तर एका संशयित आरोपीला ताब्यात घेण्यात आले. येथे दोन एजंट होते, पैकी एकला पकडण्यात पोलिसांना यश आले असून एकजण फरार झाला. या घटनेने खळबळ उडाली आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांना माहिती मिळाल्यानुसार अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, पोलीस उपाधीक्षक राजेंद्र कुमार राजमाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र शिंदे व सहकारी सदर ठिकाणी गेले दोन दिवस पळत ठेऊन होते. पोलीस कर्मचारी व क्राईम ब्रँचच्या टीमने काल संयुक्त कारवाई केली असता ‘तिशा’मध्ये 27 व 30 वर्षे वयाच्या दोन पीडित महिला व एक पुरुष एका सदनिकेत सापडले.
पोलिसांनी त्यांना व एका एजंटला ताब्यात घेतले तर एक एजंट पळून जाण्यात यशस्वी झाला. येथे गेले चार महिने वेश्या व्यवसाय चालत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसांनी सर्वांना पोलीस स्टेशनला आणून चोकशी सुरु केली होती. रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. पोलीस निरीक्षक रवींद्र शिंदे, सहा.पोलीस निरीक्षक प्रवीण देशमुख, महिला पोलीस उपनिरीक्षक शिल्पा वेंगुर्लेकर, पोलीस उपनिरीक्षक अरुण जाधव, हवालदार वृशाल शेटकर, पो. कॉ. प्रमोद कदम, राहुल दराडे, श्री.आवळे यांच्या टीमने ही यशस्वी कामगिरी केल्याने त्यांचे कौतुक होत आहे.