(आरोग्य)
दिव्य औषधी ‘गुळवेल’ ही आयुर्वेदातील महत्त्वाची वनस्पती आहे. गुळवेल या वनस्पतीस ‘अमृता’ हे नाव देखील आहे. कारण, ती अमृतासमान गुणकारी आहे. गुळवेल माणसाच्या अगणित व्याधींना दूर करून त्यास दीर्घायुषी करते. अशक्तपणा, कावीळ, कृमींचा त्रास, जुलाब, पोटातील मुरडा, मधुमेह, मूळव्याध, संधिवात, हगवण अशा निरनिराळ्या व्याधींमध्ये गुळवेलीचा उपयोग होतो.
गुळवेल ही अनेक वर्षे टिकणारी, एखाद्या झाडाच्या वा दुसर्या कोणत्याही आधाराला धरून वर चढणारी, नेहमी हिरवीगार राहणारी वेल आहे. दोन फांद्यामधून फुटणार्या बारीक दोर्यासारख्या तणावाच्या साहाय्याने आधाराला धरून गुळवेल वर चढते. गुळवेल ही दिसायला मनीप्लांटसारखी असते. परंतु, याची अतिशय दाट अशी विशाल वेल असते. पाने हृदयाच्या आकाराची असतात. यास पिवळी फुले येतात व लाल रंगाची छोटी छोटी गोल फळे झुबक्यांमध्ये लागतात. याचे कांड रसभरीत असते, ज्याचा औषधीकरिता उपयोग केला जातो. गुळवेलीची अमृतासमान, रसायनी वा वयस्था (तारुण्याचे रक्षण करून म्हातारपण व रोगाचा नाश करणारी) अशी आयुर्वेदीय समर्पक नावे आधुनिक संशोधनाने यथार्थ ठरली आहे. गुळवेलीच्या मोठ्या वेली मांसल असून, मोठ्या झाडांवर व कुंपणांवर पसरलेल्या असतात.
खोड – वेलीच्या खोडास लांब धाग्यांसारखी, हिरवी मुळे फुटून ती खाली लोंबत असतात. खोड बोटांएवढे जाड असून, त्यावरील साल पातळ, त्वचेसारखी असते, नंतर तिचे पापुद्रे निघतात. खोडांवर लहान-लहान छिंद्रे असतात. खोड आडवे कापल्यास आतील भाग चक्राकार दिसतो.
पाने – साधी, एक आड एक, हृदयाकृती. गडद हिरवी व गुळगुळीत असतात. पानांचे देठ लांब. पानांवर 7 ते 9 शिरा दिसतात व पानांची रुंदी 5 ते 10 सें.मी असते.
फुले – लहान पिवळसर-हिरवी नियमित व एकलिंगी असतात. पानांच्या बेचक्यातून आलेल्या लांब, नाजूक, खाली लोंबणाऱ्या पुष्पमंजिरीत येतात. नर व मादी फुले वेगवेगळ्या वेलींवर येतात. पुष्पमंजिरीत नरफुले गुच्छात तर मादी फुले एकांडी येतात. पाकळ्या सहा, पुंकेसर सहा, बीजांडकोश तीन कप्पी, पराग धारिणी तीन विभागी.
फळे – गोलाकार, मोठ्या वाटाण्याएवढी, कठीण कवची. पिकल्यावर लाल, गुच्छाने येतात. बी एक, खडबडीत कवच असणारी.
गुळवेलीला नोव्हेंबर ते जून या कालावधीत फुले, फळे येतात.
गुळवेल प्रतिकार शक्ती तंत्रास सशक्त करते :
शरीराचे प्रतिकार शक्ती तंत्र विकृत झाल्यास वारंवार सर्दी पडसे, ताप येणे, अशक्तपणा ही लक्षणे निर्माण होतात. गुळवेलच्या सेवनाने शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढते. वारंवार आजारी पडणार्या व्यक्तींना गुळवेलामुळे फायदा होतो. शरीरातील प्रतिकार शक्ती तंत्र विकृत झाल्यास अनेक व्याधी निर्माण होतात. विभिन्न एलर्जीजन्य आजार उदा. तसेच गुळवेल त्रिदोष शामक आहे. गुळवेल रोगप्रतिकार तंत्रास सामान्य करते. अशा व्याधींवर गुळवेल अतिशय उपयोगी आहे.
- गुळवेल हे संधीवात व अन्य वात व्याधींवर उपयोगी आहे.
- गुळवेल शक्तिवर्धक व वाजीकर आहे.
- विभिन्न चर्मरोग वर प्रभावी आहे.
- मूळव्याध, महिलांचे विकारावर उपयोगी आहे
- मानसिक व्याधींवर उपयोगी आहे.
- गुळवेल रक्तातील कोलेस्टेरॉल व रक्तशर्कराचे प्रमाण कमी करते.
उपयुक्तता :
- गुळवेल ही महत्त्वाची औषधी वनस्पती आहे. तिचे खोड अनेक रोगांवरील औषधांत वापरतात.
- गुळवेल कुटुपौष्टिक, पित्तसारक, संग्राहक, मूत्रजनन, ज्वरहर व नियतकालिक ज्वरनाशक गुणधर्माची आहे.
- ही वनस्पती ताप, तहान, जळजळ, वांती यावर उपयुक्त आहे.
- ती रक्तसुधारक असून, पित्तवृद्धीच्या काविळीत गुणकारी व त्वचारोगात उपयोगी आहे.
- मधुमेह, वारंवार मूत्रवेग तसेच प्लिहावृद्धीत उपयुक्त आहे. मूत्रमार्गातील संसर्ग दूर करते.
- गुळवेल कुष्ठ व वातरक्त विकारातही उपयुक्त आहे.
- गुळवेलीचे सत्त्व व काढा वापरतात. गुळवेलीचा पाण्यातील अर्क ज्वरनाशक म्हणून वापरतात.
- गुळवेलीचा काढा शक्तिवर्धक असून, दुर्बल करणारे रोग, खंडित ताप आणि अपचनात वापरतात.
- गुळवेल सत्त्व दीर्घकालीन आम्ल अतिसारात वापरतात. आतड्यांचा प्रक्षोम आणि शक्ती क्षीण झालेली असताना तसेच संधिवाताची लक्षणे दूर करण्यासाठी ही औषधी वनस्पती महत्त्वाची मानली जाते.
- सौम्य विषमज्वरात आणि जीर्णज्वरात गुळवेलीचा चांगला उपयोग होतो.
- गुळवेलीने भूक लागते, अन्नपचन चांगले होते, रोग्याचा फिक्कटपणा कमी होतो, अशक्तपणा कमी होऊन शक्ती वाढते. कुपचन, पोटदुखी व काविळीत गुळवेल गुणकारी आहे.
- ही वनस्पती त्वचारोगातही उपयुक्त आहे, यामुळे खाज व दाह कमी होतो.
- शरीरातील टॉक्सीन काढून टाकते.
- वंध्यत्व दूर करण्यास मदत करते.
- यकृताशी संबंधित आजारांशी लढत राहाते.
मधुमेहासाठी गुळवेल गुणकारी
ज्या रुग्णांना टाईप-२ प्रकारचा मधुमेह आहे त्यांनी गुळवेलीच्या रसाचं नियमित सेवन केल्याने खूप प्रमाणात लाभ मिळू शकतो. गुळवेलीत पुष्कळ प्रमाणात हायपोग्लेमिक एजंट असतात, ज्यांमुळे रक्तशर्करेवर नियंत्रण ठेवायला मदत मिळते. रक्तातील शर्करेवर नियंत्रण मिळवण्यसाठी डॉक्टर गुळवेलीच्या रसाचं सेवन करण्याचा सल्ला देतात. बाजारात गुळवेलीचा रस उपलब्ध आहे, तो रस विकत आणून तुम्ही नियमितपणे त्याचे सेवन करू शकता.
रयूमेटाइड आर्थराइटिससाठी गुळवेल
रयूमेटाइड आर्थराइटिस याला मराठीमध्ये आमवातीय संधि्शोथ म्हणतात. हा एक प्रकारचा ऑटो इम्यून आजार आहे. गुळवेलीच्या रसाचे नियमितपणे सेवन केल्याने रयूमेटाइड आर्थराइटिसचे कित्येक रुग्ण लवकर बरे होताना दिसतात. गुळवेलीत ऍन्टी ऑर्थराइटिक आणि ऍन्टी इंफ्लेमेट्री गुण आढळून येतात. रयूमेटाइड आर्थराइटिसच्या उपचारांसाठी गुळवेलीचा रस आल्याच्या रसात मिसळून त्याचे रुग्णाला सेवन करण्यास सांगितलं जातं. मात्र सांध्याच्या दुखण्याच्या उपचारासाठी गुळवेलीचं चूर्ण दुधामध्ये उकळून पिण्याचा सल्ला दिला जातो.
इम्यूनिटीमध्ये वाढ
कोणी व्यक्ती जर वारंवार आजारी पडत असेल तर त्याचे मुख्य कारण मंदावलेली रोगप्रतिकार क्षमता हे असू शकते. ह्या समस्येच्या उपचाराकडे ताबडतोब लक्ष पुरवलं पाहिजे. रक्ताचं शुद्धीकरण, वाईट जीवाणूंचा नायनाट करून, चांगल्या जीवाणूंना पुष्टी मिळेल अशी व्यवस्था करताना शरीराला अपायकारक ठरणाऱ्या फ्री रॅडिकल्सशी लढून इम्यूनिटी वाढवता येणं शक्य आहे. या प्रकारच्या समस्यांशी लढताना वेळ आणि पैसा खर्च करण्याऐवजी आपण गुळवेलीचा रस नियमितपणे सेवन करायला सुरुवात करावी हे उत्तम.
सेवन विधी :
गुळवेलचे खोड औषधीकरिता उपयोगात आणतात. करंगळीएवढ्या जाडीचे एक फूट लांब कांड घेऊन त्यास कुटावे. त्यात ५-१० तुळशीची पाने घालावी व २ कप पाण्यात उकळावे. १/४ म्हणजेच १/२ कप होईपर्यंत आटवावे, नंतर गाळून १ चमचा मध घालून प्यावे. दिवसातून एक किंवा दोन वेळा घ्यावे.
बाजारामध्ये गुळवेल सत्व, अमृतारिष्ट इत्यादी नावाने गुळवेल उपलब्ध आहे, परंतु ताजी गुळवेल वनस्पती अधिक प्रभावी आहे.
मोसमी फ्लूसारख्या तापांकरिता ५-७ दिवस व अन्य व्याधींसाठी ३ आठवडे ते १/२ महिने किंवा अधिक काळाकरिता सेवन करावे.
गुळवेलीच्या भाजीचे औषधी गुणधर्म :
गुळवेलीच्या कोवळ्या पानांपासून भाजी करतात. या भाजीने शरीरातील अग्नीचे वर्धन होते, त्यामुळे शरीरातील पचनाचे कार्य अधिक चांगले होते. कोणत्याही प्रकारच्या तापामध्ये ताप येऊन गेल्यानंतर गुळवेळीची भाजी खाणे फायद्याचे ठरते. कावीळ कमी होण्यास मदत होते. मधुमेहामध्ये ही भाजी पथ्यकर आहे. साखरेचा इष्टानिष्ट परिणाम शरीरावर होतो, त्यामुळे थकवा येतो, अशा अवस्थेत ही भाजी वरचेवर खावी. वरचेवर येणारी सर्दी, खोकला, ताप यासाठी गुळवेळीची भाजी हितावह ठरते. त्वचेच्या विकारांचे मूळ कारण अनेक वेळा रक्तात असते. रक्तातील दोष नाहीसे करून, त्वचारोग कमी करण्यासाठी ही भाजी उपयोगी आहे. कामाचा अधिक ताण पडून शारीरिक थकवा येतो. तो दूर करण्यासाठी गुळवेलीची भाजी उपयोगी पडते.