(संगमेश्वर / प्रतिनिधी )
शिक्षणासोबतच समाजप्रबोधन, ग्रामविकसन,स्त्रीशक्ती प्रबोधन,नेतृत्व संवर्धन अशा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये गेली पन्नास वर्षाहून अधिक काळ भरीव योगदान देणाऱ्या पुण्याच्या ज्ञानप्रबोधिनी संस्थेच्या क्रीडाकुल विभाग निगडी आणि ज्ञानप्रबोधिनी स्थायी संपर्क केंद्र चिपळूण यांच्यासोबत टाटा ट्रस्टच्या विशेष योगदानाने ग्रासरूट क्रीडाकुल प्रकल्पाअंतर्गत चिपळूण, खेड आणि संगमेश्वर परिसरातील सहा वेगवेगळ्या उपकेंद्रांवरती गेले वर्षभर ग्रामीण खेळाडू विकसनचे काम सातत्याने चालू आहे याच प्रकल्पाचा एक भाग म्हणून चिपळूण उपकेंद्रांवरील मुलांचे एकत्रित हिवाळी क्रीडा शिबिर २९ डिसेंबर २०२४ ते ०१ जानेवारी २०२५ या कालावधीत डेरवण येथे संपन्न झाले.
न्यू इंग्लिश स्कूल सती चिंच घरी, महादेवराव शिर्के माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय भोम, मोहन विद्यालय व कनिष्ठ महावीद्यालय आकले, न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज आंबडस, आर सी काळे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पेढे अशा शाळांमधील सुरू असणाऱ्या स्पोक्स मधील चिपळूण केंद्र म्हणून ५४ मुली व ७१ मुलगे असे १२५ आणि निगडी क्रीडाकुल विभागाच्या ११ मुली व १४ मुलगे मिळून २५ खेळाडू अशी एकूण १५० मुल या शिबिरात सहभागी झाली होती.
या शिबिरामध्ये आरोग्य सवयी ,जीवन कौशल्य प्रशिक्षण, आणि विद्यार्थ्यांना कब्बडी , मल्लखांब , ॲथलेटिक्स , जिमनॅस्टिकी, योगा , संचालन या सारख्या विविध खेळांचे प्रशिक्षण देण्यात आले. ज्याच्या उपयोगाने खेळाडूंना शारीरिक आणि मानसिक विकासासाठी महत्त्वपूर्ण कौशल्य शिकण्याची संधी मिळाली. या तीन दिवसीय शिबिरामध्ये उत्कृष्ट शिबिरार्थी मुलगा – सार्थक किशोर मोरे (सती) व मुलगी – खुशी राजन मोरे (आंबडस ), उत्तम खेळाडू मुलगा – साहिल कदम ( आंबडस ) व मुलगी सृष्टी शिंदे ( सती ) असे वयक्तिक तर शिस्तपालन करणारा सर्वोत्तम गट , उत्कृष्ट संचलन व उत्कृष्ट सूर्यनमस्कार करणारा गट अशी सांघिक बक्षीस देखील देण्यात आली.
या शिबिरामध्ये तीनही दिवस महिला पालकांचा सहभाग होता पालकांमधून कस्तुरी सुधीर कदम ( सती ), गौरी निलेश सुतार ( आकले ), रसिका रामचंद्र साळवी ( पेढे ) व जान्हवी सचिन मोहिते ( भोम ) यांनी या शिबिरात सहभाग घेतला. क्रीडा प्रात्यक्षिके व सहभागींची मनोगते, अनुभव कथने असे कार्यक्रमाचे समारोप सत्र संपन्न होत असताना निवृत्त एअर मार्शल श्री.हेमंतजी भागवत, निगडी केंद्रप्रमुख श्री मनोजराव देवळेकर व चिपळूण स्थायी संपर्क केंद्रप्रमुख श्री स्वानंद हिर्लेकर इत्यादी मान्यवर कार्यक्रमासाठी उपस्थित होते. कोकणात पहिल्यांदाच प्रयत्न म्हणून घडवून आणलेले हे क्रीडा शिबिर मुलांसाठी अत्यंत उत्साहवर्धक आनंददायी व प्रेरक होते सर्वच उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतांमधून या शिबिरासाठी आशीर्वाद पर शुभेच्छा दिल्या.