(जाकादेवी / संतोष पवार)
मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियान’ टप्पा -२ चा निकाल जाहीर करण्यात आला असून रत्नागिरी तालुक्यातून मालगुंड एज्युकेशन सोसायटीच्या जाकादेवी येथील तात्यासाहेब मुळ्ये माध्यमिक विद्यालय व बाबाराम पर्शराम कदम कनिष्ठ महाविद्यालय जाकादेवी विद्यालयाने प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. या उज्ज्वल यशाबद्दल जाकादेवी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयावर रत्नागिरी पंचायत समिती शिक्षण विभागासह पालक वर्गातूही अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा हा एक अनोखा उपक्रम आहे, जो महाराष्ट्रातील शालेय शिक्षणात सुधारणा करण्याच्या दृष्टीने ही स्पर्धा अतिशय महत्त्वपूर्ण मानली जाते. शाळांमध्ये स्पर्धात्मक वातावरण निर्माण होऊन विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा तसेच आनंददायी आणि प्रेरणादायी वातावरण निर्माण व्हावे, म्हणून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेंतर्गत ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियान राबविण्यास मान्यता देण्यात आली. शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी या अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याची यशस्वी पूर्तता जाहीर केली, मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियान २९ जुलै ते १५ सप्टेंबर २०२४ पर्यंतच्या कालावधीत राबविण्यात आले. या उपक्रमात राज्यातील विविध शाळांनी सक्रियपणे विविध गटात सहभाग घेतला. गतवर्षीपेक्षा या वर्षी या अभियानात आपला नंबर येण्यासाठी अनेक शाळांनी जोरदार कृतीयुक्त उपकम हाती घेतले होते. मात्र या स्पर्धात्मक अभियानात मालगुंड एज्युकेशन सोसायटीच्या जाकादेवी येथील तात्यासाहेब मुळ्ये माध्यमिक विद्यालय व बाबाराम पर्शराम कदम कनिष्ठ महाविद्यालयाने अतिशय यशस्वीपणे नियोजनबद्ध उपक्रम राबवून रत्नागिरी तालुक्यात प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळवून देदिप्यमान यशाचे मानकरी ठरले.
गतवर्षी याच विद्यालयाने या अभियानात तालुक्यात तृतीय क्रमांक पटकावला होता.स्पर्धेच्या निमित्ताने गटशिक्षणाधिकारी मान.प्रेरणा शिंदे यांनी प्रत्यक्ष हायस्कूलला भेट दिली तेव्हा शिक्षकांची एकजूट आणि शिक्षण संस्थेचे चेअरमन सुनिल उर्फ बंधू मयेकर यांनी शिक्षकांना दिलेली उचित प्रेरणा आणि बंधू मयेकर यांचा उत्साह पाहून गटशिक्षणाधिकारी शिंदे मॅडम यांनी मनापासून शिक्षक आणि शिक्षण संस्थेविषयी मनस्वी समाधान व्यक्त केले.स्टाफच्या एकजुटीचे कौतुक केले.कृती उपक्रमांची पाहणी करून शिष्यवृत्ती स्पर्धा परीक्षेत अधिक विद्यार्थी गुणवत्ता यादीत येण्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा स्पर्धेचा पारितोषिकाचे वितरण रत्नागिरी जिल्हा परिषद लोकनेते शामरावजी पेजे सभागृहात रत्नागिरी जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. कीर्ती किरण पुजार यांच्या हस्ते करण्यात आले , यावेळी गटविकास अधिकारी श्री जे.पी.जाधव रत्नागिरी तालुक्याच्या कर्तृत्ववान गटशिक्षणाधिकारी श्रीम. प्रेरणा शिंदे, प्राथमिक शिक्षणाधिकारी श्री.बी.एम. कासार, विस्तार अधिकारी श्री. एस.जे. मुरकुटे ,खालगाव बीटच्या विस्तार अधिकारी सौ. सशाली मोहिते, विषय तज्ज्ञ अश्विनी काणे, तरवळ केंद्राचे. केंद्रप्रमुख श्री.प्रकाश कळंबटे ,जाकादेवी प्रशालेचे मुख्याध्यापक नितीन मोरे, ज्येष्ठ शिक्षक केशव राठोड आदी उपस्थित होते.
हे यश संपादन करण्यासाठी महाविद्यालयाचे मुख्याध्यापक नितीन मोरे, पर्यवेक्षक शाम महाकाळ, शिक्षण संस्थेचे चेअरमन सुनिल उर्फ बंधू मयेकर यांनी अतिशय उत्तम अशा प्रकारचे नियोजनात्मक दृष्टीने नेतृत्व केले. संपूर्ण स्टाफने एकजुटीने अभियानात काम प्रथम क्रमांक पटकावला याबद्दल जाकादेवी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षण संस्थेचे उपक्रमशील व धडाडीचे चेअरमन सुनिल उर्फ बंधू मयेकर, शिक्षण संस्थेचे सर्व पदाधिकारी, संचालक, निमंत्रित संचालक सल्लागार शिक्षणप्रेमी नागरिक पालक यांनी खास अभिनंदन केले आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री माझी शाळा,सुंदर शाळा स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ झाल्याबरोबर मालगुंड शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मान.बंधू मयेकर यांनी प्रथम क्रमांकाचे मानाचे आणि प्रतिष्ठेचे प्रेरणादायी पारितोषिक पटकावल्याबद्दल जाकादेवी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक, शिक्षकेतर विद्यार्थी यांचे भरभरून कौतुक करून अभिनंदन केले. हा विजय एकजुटीचा, जिद्दीचा, यशस्वीपणे उपक्रम राबवून तालुक्यात आपल्या शाळेचे, शिक्षण संस्थेचे नाव उंचावले आहात. आता लक्ष जिल्ह्याच्या आणि राज्याच्या स्पर्धेकडे असले पाहिजे, असेही बंधू मयेकर म्हणाले.