(रत्नागिरी / जिमाका)
‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ ही राज्यातील महिलांसाठी ऐतिहासिक योजना आहे. या योजनेच्या लाभापासून जिल्ह्यातील एकही वंचित राहणार नाही, ही सर्वांची जबाबदारी आहे. ही पारदर्शक योजना असून, कोणीही पैसे मागितल्यास पोलीसांकडे तक्रार करा, अशांना थेट तुरुंगात टाकण्याचे आदेश पोलीसांना दिले आहेत, असे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.
चिपळूण येथील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र नाट्यगृहात ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ या योजनेचा शुभांरभ श्रीफळ वाढवून करण्यात आला. यावेळी आमदार शेखर निकम, प्रांताधिकारी आकाश लिगाडे, जिल्हा माहिला व बाल विकास अधिकारी श्रीकांत हावळे, तहसिलदार प्रविण लोकरे, मुख्याधिकारी विशाल भोसले आदी उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. सामंत म्हणाले, महिला समुदाय संसाधन व्यक्तींसाठी मोबाईल देण्यात आला असून, त्यासाठी साडेतीन कोटी निधी दिला आहे. सर्व योजना तुमच्यासाठी आहेत. त्यांचा जास्तीत जास्त लाभ घेतला पाहिजे. लेक लाडकी योजनेत लेकीची नोंद झाल्यानंतर तिच्या नावावर 5 हजार रुपये ठेवण्यात येतात. 18 वर्षानंतर 1 लाख 5 हजार जमा होतात. या योजनेत पुढाकार घ्या. महिला भगिनींना नेहमीच गॅस सिलेंडरची चिंता असते. वर्षाला 3 सिलेंडर मोफत देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला. 6 हजार, 8 हजार आणि 10 हजार विद्यावेतन तरुणांना देणारी योजना सुरु केली आहे. शुभमंगल योजनेचे अनुदान 10 हजारावरुन 25 हजार केले आहे. वयोश्री योजनेत 65 वर्षापुढील ज्येष्ठ व्यक्तींना एकावेळी 3 हजार देण्याची योजना आहे. महिला भगिनींच्या पर्समध्ये महिन्याला 1500 रुपये देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला. राज्यात या योजनेला उदंड प्रतिसाद मिळाला आहे.
ही योजना लागू झाल्यापासूनचे पैसे खात्यात जमा होणार आहेत, त्यासाठी 46 हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. अंगणवाडी सेविकांच्या समस्या सोडविल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असे सांगून पालकमंत्री म्हणाले, मानधनापेक्षा या योजनेचे काम करणे हे अंगणवाडी सेविकांसाठी पुण्याचे काम आहे. हे पुण्य तुमच्या कुटुंबाला लाभो. अंगणवाडी सेविका, मदतनीस, बचतगट या सर्वांना न्याय देण्याची आमची भूमिका आहे. चिपळूण तालुक्यात होणाऱ्या पहिल्या 5 बचत गटांसाठीच्या ग्रामभवनसाठी जिल्हा नियोजनमधून 1 कोटी रुपये दिले जातील, अशी घोषणाही पालकमंत्र्यांनी केली.
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणासाठी शैक्षणिक अर्हतेनुसार 6 हजार, 8 हजार आणि 10 हजार मिळणार आहेत. तुमच्या मुलांसाठी या योजनेचा लाभ घ्या. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही पारदर्शक आहे. या योजनेसाठी कुणीही पैसे मागत असेल, तर थेट पोलीसांत तक्रार करा. अशा भ्रष्टाचारी प्रवृत्तींना तुरुंगात टाकण्याचे आदेश पोलीस अधीक्षकांना दिले आहेत. या योजनेपासून एकही लाभार्थी वंचित राहणार नाही, ही सर्वांची जबाबदारी आहे, ती यशस्वीपणे पूर्ण करुन जिल्ह्याला राज्यात प्रथम क्रमांकावर आणा, असेही पालकमंत्री म्हणाले.
आमदार श्री. निकम म्हणाले, महाराष्ट्र शासनाची अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना आहे. तळागळातील महिलांसाठी लाभ देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी क्रांतिकारक निर्णय घेतला. सर्व महिलांना याचा लाभ मिळाला पाहिजे, त्यासाठी त्यामध्ये सुधारणाही करण्यात आल्या आहेत. फोटो वरुन फोटो काढण्याची मुभाही आता देण्यात आली आहे. या योजना जाणीवपूर्वक, लक्षपूर्वक लोकांपर्यंत पोहोचवा. शासनाच्या सर्वच फायदेशीर योजनांचा लाभ सर्वसामान्य भगिनिंनी घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी प्रातनिधिक स्वरुपात महिला लाभार्थ्यांना मंजुरीची पत्रे देण्यात आली. नागरी जीवनोन्नती अभियान उमेदमधून गोवळकोट येथील महिला बचत गटाला धनादेश देण्यात आला.