(संगमेश्वर / एजाज पटेल)
शहरात दोन गुरांची झुंज सुरु झाली, अन् पाहता-पाहता बघ्यांची तोबा गर्दी झाल्याचे अनोखे चित्र मुंबई -गोवा मुख्य मार्गांवरील सोनवी चौकातून बाजारात जाणाऱ्या रस्त्यावर दिसून आले. दरम्यान, मोकाट गुरांच्या झुंजीमुळे काहीवेळ भितीचे वातावरण निर्माण झाले होते. वाहन वर्दळीच्या रस्त्यावर झुंज लागल्याने वाहनचालक सैरवैर झाले. एवढेच नव्हे तर काही दुचाकींचे अपघात होता होता वाचले. सुदैवाने ते दुचाकींसोबत गर्दीत घुसले नाहीत. काही नागरिकांनी गुरांना हुसकावण्याचा प्रयत्न केला, मात्र मस्तावलेली ही जनावरे मागे हटली नाहीत. बऱ्याच वेळेनंतर नागरिकांना त्या जनावरांची झुंज सोडविण्यास यश आले, अन् सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
मोकाट गुरांच्या या झुंजीनिमित्त संगमेश्वर शहरातील मोकाट जनावरांचा प्रश्न चांगलाच ऐरणीवर आल्याचे वास्तव समोर आले आहे. शहरात मोकाट जनावरांचा प्रश्न सतत गाजतो आहे. मोकाट जनावरांच्या सैरवैर भटकंतीमुळे तसेच वाहन वर्दळीच्या ठिकाणी कळपा कळपाने ठिकठिकाणी ठाण मांडून बसण्यामुळे किरकोळ अपघाताच्या घटना घडल्या आहेत. काही दिवसांपूर्वी अंधारातून अचानक धावत आलेल्या गुरांनी महामार्गावरून जाणाऱ्या रिक्षाला जोरदार धडक दिल्याने रिक्षा पलटी होता-होता वाचली असली जबरदस्त बसलेल्या धडकेने रिक्षाचे मोठ्या प्रमाणत नुकसान झाले. अशा अनेक घटना या पूर्वी झाल्या आहेत.
एवढेच नव्हे तर मोकाट वावरणारे गुरे व लहान -लहान वासरे सुसाट येणाऱ्या वाहनांच्या समोर येऊन जखमी व जायबंदी झाल्याच्या घटना सुद्धा घडल्या आहेत. शहरातील अंतर्गत रस्त्यावर तसेच मुंबई -गोवा महामार्ग व सोनवी चौकातून देवरुखकडे जाणाऱ्या विविध रसत्यावर मोकाट जनावरे मोकाट भटकंती करण्याबरोबरच वाहतूक वर्दळीच्या ठिकाणी ठाण मांडून बसतात त्यांना कोणी वाली नाही. ज्यांची जनावरे आहेत ते त्यांना सर्रास मोकाट सोडतात. या निष्काळजी प्रका मुळे जनावरे मस्तवाल झाली आहेत. त्यांचा तत्काळ बंदोबस्त स्थानिक प्रशासनाने करून भविष्यात या मोकाट जनावरांपासून मोठी दुर्घटना होण्यापासून बंदोबस्त करण्याची मागणी जनतेतून केली जात आहे.