( लांजा )
जातीवाचक शिवीगाळ करत बेदम मारहाण केल्याची फिर्याद लांजा तालुक्यातील साटवली येथील ३५ वर्षीय तरुणाने दिली आहे. या फिर्यादीनुसार हर्चे येथील सहा जणांवर अँट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
साटवली बौद्धवाडी येथील संदीप राजाराम जाधव यांनी हर्चे येथील विठ्ठल धोंडू शिर्सेकर यांच्याकडून गायी विकत घेतल्या होत्या. त्या आणण्यासाठी ते आपल्याच गावातील अजय नारायण तरळ यांची बोलेरो पिकअप गाडी घेऊन दि. २३ जानेवारी रोजी दुपारी हर्चे येथे गेले होते. मात्र, चरण्यासाठी गेलेल्या गायी येण्यास उशीर झाला त्यामले शिर्सेकर यांनी संदीप जाधव व गाडीचालक तरळ यांना जेवायला जाण्यास सांगितले. जेवण आटोपून ते साटवलीकडे जाण्यासाठी निघाले.
रात्री १०:३० वाजण्याच्या सुमारास हर्चे फाटा येथे रस्त्यावर दगड ठेवून तो बंद करण्यात आला होता. हे दगड बाजूला करण्यासाठी संदीप जाधव गाडीतून खाली उतरले असताना दबा धरून बसलेले हर्चे येथील अभिषेक तेंडुलकर, लांजा येथील भैरू भंडारी व अन्य अनोळखी चार जणांनी त्यांना काठ्या, बांबूने मारहाण केली. तसेच जातीवाचक शिवीगाळही केली.
गायी कोठून आणल्या हे विचारल्यानंतर मारहाण करणाऱ्यांनी शिर्सेकर यांनाही तेथे बोलावून घेतले. त्यानंतर शिर्सेकर संदीप जाधव व तरळ अशा तिघांनाही मारहाण करत दीड लाख रुपयांची मागणी केली, पैसे दिले नाहीत म्हणून पुन्हा मारहाण करण्यात आली, असे जाधव यांनी आपल्या फिर्यादीत म्हटले आहे.
संदीप जाधव यांनी या प्रकाराची माहिती समाजातील कार्यकर्त्यांना दिली. समाजाच्या वतीने उपविभाग पोलिस अधिकारी यशवंत केडगे यांना निवेदन देऊन संबंधित लोकांवर अँट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. त्यानुसार संदीप जाधव यांच्या फिर्यादीवरून अभिषेक तेंडुलकर, भैरू भंडारी व अन्य चार जणांवर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपविभागीय पोलिस अधिकारी यशवंत केडगे करत आहेत