(रत्नागिरी)
जिल्ह्यात १० व १० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांवर डी.एड्. बी.एड्. पात्रताधारकांची नियुक्ती कंत्राटी तत्त्वावर करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला होता. या निर्णयाची अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी बुधवारी डी.एड्., बी.एड्. अर्हता धारक उमेदवारांनी रत्नागिरी जिल्हा परिषदेसमोर भर पावसात धरणे आंदोलन केले.
या आंदोलनामध्ये शेकडो डी.एड्. आणि बी. एड्. धारक सहभागी झाले होते. मुसळधार कोसळणाऱ्या पावसाची तमा न बाळगता डी. एड्., बी. एड्. धारक उमेदवार जिल्हा परिषदेच्या गेटबाहेर उभे होते. भर पावसामध्ये करण्यात आलेल्या आंदोलकांची बाजू ऐकून घेण्यासाठी शिक्षणाधिकारी एस. बी. कासार आंदोलकांना सामोरे गेले. या उमेदवारांची नियुक्ती सुरुवातीला एका वर्षासाठी करून गुणवत्ता आणि योग्यतेच्या आवश्यकतेनुसार वाढीव कालावधीसाठी दरवर्षी नूतनीकरण करता येईल, त्यासाठी दरमहा १५ हजार रुपये मानधन दिले जाणार आहे. अन्य कोणतेही लाभ त्यांना लागू असणार नाहीत. या नियुक्तीसाठी कमाल आणि किमान वयोमर्यादा लागू करण्यात आली आहे.
१० व १० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांवर डी.एड्., बी.एड्. धारकांची नियुक्ती करण्याची प्रक्रिया सुरू करण्याची प्रक्रिया तत्काळ सुरू करावी. तसेच मागील २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात ज्या शिक्षकांनी मानधन तत्त्वावर काम केले आहे त्यांना प्राधान्याने घ्यावे, असे निवेदन या आंदोलनाच्या वेळी शिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आले.