(नवी दिल्ली)
आगामी लोकसभा निवडणूकीसाठी भाजपाने आपली पहिली यादी शनिवारी (2 मार्च) जाहीर केली. या यादीत भाजपाने अनेक जुन्या उमेदवारांसह अनेक मंत्र्यांची तिकिटे कापली आहेत. भाजपच्या पहिल्या यादीत 195 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली असून 34 विद्यमान केंद्रीय मंत्री आणि 2 मुख्यमंत्र्यांना संधी देताना 33 विद्यमान खासदारांची तिकिटे कापली आहेत. विशेष म्हणजे भाजपाच्या यादीत 57 ओबीसी चेहरे, 28 महिला आणि 50 वर्षांखालील 47 उमेदवार आहेत. त्यामुळे आता भाजपा लोकसभा निवडणुकीसाठी मास्टरस्ट्रोक खेळण्याच्या तयारीत असल्याचे दिसते.
भाजपाने दिल्लीत माजी केंद्रीय मंत्री हर्षवर्धन यांच्या जागी प्रवीण खंडेलवाल यांना चांदनी चौक लोकसभा मतदारसंघातून संधी दिली आहे. याशिवाय पश्चिम दिल्लीतून दोन वेळा खासदार राहिलेल्या परवेश साहिब सिंग वर्मा यांच्या जागी कमलजीत सेहरावत यांना तिकीट मिळाले आहे. तसेच विद्यमान खासदार आणि केंद्रीय मंत्री मीनाक्षी लेखी यांना उमेदवारी नाकारत त्यांच्या जागी भाजपाच्या दिवंगत नेत्या सुषमा स्वराज यांची कन्या बन्सुरी स्वराज यांना नवी दिल्लीतून उमेदवारी देण्यात आली आहे. तसेच बसपा खासदार दानिश अली यांच्या विरोधात संसदेत खोटी विधाने करणारे खासदार रमेश बिधुरी यांना दक्षिण दिल्लीतून तिकीट मिळालेले नसून त्यांच्या जागी पक्षाने रामवीर सिंह बिधुरी यांना उमेदवारी दिली आहे.
आसाम:
भाजपने आसाममध्ये 6 विद्यमान खासदारांसह 5 नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे. सिलचर लोकसभा मतदारसंघातून खासदार राजदीप रॉय यांच्या जागी परिमल शुक्लबैध्या, अमरसिंह टिसो यांच्या स्वायत्त जिल्हा (एसटी) या जागेवर खासदार होरेन सिंग बे, खासदार राणी ओजा यांच्या जागी बिजुली कलिता मेधी गुवाहाटी लोकसभा मतदारसंघातून, तर विद्यमान खासादर पल्लब लोचन दास यांच्या तेजपूर येथून रणजीत दत्ता, केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या जागी दिब्रुगडचे खासदार रामेश्वर तेली यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
झारखंड आणि पश्चिम बंगाल :
झारखंडमध्ये माजी केंद्रीय मंत्री जयंत सिन्हा यांच्या जागी मनीष जयस्वाल यांना हजारीबागमधून उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र, यादी जाहीर होण्यापूर्वीच सिन्हा यांनी राजकारणातून निवृत्ती जाहीर केली आहे. तर लोहरदगा (एसटी) येथे तीन वेळा खासदार सुदर्शन भगत यांच्या जागी समीर ओराव यांची वर्णी लागली. तर दुसरीकडे पश्चिम बंगालच्या अलीपुरद्वार मतदारसंघातून मनोज तिग्गा यांना उमेदवारी देण्यात आली असून, येथील खासदार जॉन बारला यांना उमेदवारी नाकारली आहे.
मध्य प्रदेश:
मध्य प्रदेशात भाजपाने सात नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. विद्यमान खासदार विवेक नारायण शेजवलकर यांच्या जागी भरतसिंह कुशवाह हे ग्वाल्हेर लोकसभा मतदारसंघातून, गुना येथील विद्यमान खासदार कृष्णपाल सिंह यादव यांच्या जागी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया, सागर लोकसभा मतदारसंघातून राजबहादूर सिंह यांच्या जागी लता वानखेडे हे वीरेंद्र खाटिक हे टिकमगड (SC) जागेवरून निवडणूक लढवणार आहेत. तर विदिशाचे खासदार रमाकांत भार्गव यांच्या जागी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, भोपाळमधून साध्वी प्रज्ञा ठाकूर यांच्या जागी आलोक शर्मा आणि रतलाम (एसटी) मतदारसंघातून खासदार गुमान सिंह डामोर यांच्या जागी अनिता नगर सिंह चौहान यांना तिकीट देण्यात आले आहे.
छत्तीसगड:
छत्तीसगडमध्ये रायपूरमधून विद्यमान सुनील कुमार सोनी यांच्या जागेवर भाजपाचे ज्येष्ठ नेते ब्रिजमोहन अग्रवाल, जांजगीर चंपा (SC) चे खासदार गुहाराम अजगल्ली यांच्या जागी कमलेश जांगडे, खासदार चुन्नीलाल साहू यांच्या जागी महासमुंदमधून रूप कुमारी चौधरी आणि कांकेर (एसटी) मतदारसंघातून मोहन मांडवी यांच्या जागी भोजराज नाग यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
गुजरात :
गुजरातमधील लोकसभेच्या 15 जागांसाठी उमेदवार जाहीर करताना भाजपाने 5 विद्यमान खासदारांची तिकिटे कापली आहेत. विद्यमान खासदार प्रभातभाई सावभाई पटेल यांच्या जागी बनासकांठा मतदारसंघातून रेखाबेन हितेशभाई चौधरी, अहमदाबाद पश्चिम (SC) जागेवरून तीन वेळा खासदार किरीट सोलंकी यांच्या जागी दिनेशभाई किदारभाई मकवाना, राजकोटमध्ये विद्यमान खासदार मोहनभाई कल्याणजी कुंडारिया यांच्या जागी केंद्रीय मंत्री परशोत्तम रुपाला, खासदार रमेशभाई लवजीभाई धाडुक यांच्या जागी पोरबंदर मतदारसंघातून केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया आणि विद्यमान खासदार रतनसिंह मगनसिंग राठोड यांच्या जागी राजपालसिंग महेंद्रसिंग जाधव पंचमहाल मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत.
त्रिपुरा आणि राज्यस्थान:
खासदार प्रतिमा भौमिक यांच्या जागी त्रिपुराचे माजी मुख्यमंत्री बिप्लब कुमार देब यांना त्रिपुरा पश्चिम मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. तर भाजपाने राजस्थानमध्ये लोकसभेच्या 15 जागांसाठी उमेदवार जाहीर करताना 5 विद्यमान खासदारांना काढून टाकले असून चुरू, भरतपूर, जालोर, उदयपूर आणि बांसवाडा येथून नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे.