(संगमेश्वर)
दिनांक 26 नोव्हेंबर रोजी साडवली शाळा क्रमांक १ येथे ग्रामपंचायतच्या सभागृहात संविधान दिवस मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला. चक्रभेदी सोशल फाउंडेशन, देवरुख या संस्थेच्या वतीने कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सदर कार्यक्रमाला साडवली शाळा क्रमांक १ मधील विद्यार्थी तसेच पालक, शिक्षक वृंद उपस्थित होते. यामध्ये महिलांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती.
दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. नंतर भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पगुच्छ देऊन उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. शाळेच्या मुख्याध्यापिका सायली त्रिभुणे यांनी प्रस्तावनेत संविधान दिवसाच्या औचित्य साधून “जीवन कौशल्य कार्यशाळा” हा नावीन्यपूर्ण उपक्रम चक्रभेदी सोशल फाउंडेशनच्या वतीने आयोजित होत असल्याचे सांगितले. तर नंतर संस्थेच्या वैदेही सावंत यांनी विद्यार्थी व पालक यांना उदबोधन केले. मुलांनी मोबाईल पासून दूर राहावे मोबाईलचे दुष्परिणाम विविध उदाहरणांमधून पटवून सांगितले. मुलांनी अभ्यासाच्या पद्धती कोणत्या वापराव्यात, शेअरिंग केअरिंग काय आहे? गुड टच बॅड टच कशा पद्धतीने ओळखावा? शिव्या देणे कसे वाईट आहे. भावभावनांवर नियंत्रण कसे ठेवावे, पुस्तक वाचणे किती गरजेचे आहे याबद्दल जाणीव जागृती केली.
पालकांनाही मुलं ही आपली सर्वात मोठी प्रॉपर्टी आहे आणि त्यांच्याकडे कशा पद्धतीने आपण लक्ष दिले पाहिजे त्यांना आपण आपला वेळ दिला पाहिजे हे पटवून सांगितले. भारतीय संविधान आपल्या सर्वांसाठी कसे मोलाचे आहे हे सांगून प्रत्येकाकडे भारतीय संविधान आपल्या घरात असलेच पाहिजे हे समजावून सांगितले. पालकांनीही चांगली चर्चा केली आणि प्रत्येक ग्रामपंचायतीला सध्या बालस्नेही गाव करायचे आहे यामध्ये बालकांसाठी अजून काय काय करता येईल अशा पद्धतीची चर्चा पालक, शिक्षक आणि संस्था यांनी मिळून केली. त्याचबरोबर पालकांनी पुन्हा एकदा मुलांसाठी काय चांगले करता येईल या संदर्भातली चर्चा करण्यासाठी परत एकत्र येण्याचे ठरवले.
कन्या शाळा देवरुख मधील शाळा क्रमांक ४ येथे देखील जीवन कौशल्य शाळा घेण्यात आली होती. आजकाल मुलं मोबाईल मध्ये खूप गुंग होत आहेत गुंतून जात आहेत आणि त्याचे दुष्परिणाम हळूहळू दिसायला लागलेले आहेत. विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर, अभ्यासावर मोबाईलचा खूप विपरीत परिणाम होताना दिसत आहे. यामधून त्यांना बाहेर काढून वाचनाकडे वळवणे, मैदानी खेळाकडे वळवणे गरजेचे आहे हीच काळाची गरज ओळखून चक्रभेदी सोशल फाउंडेशन संस्था “जीवन कौशल्य कार्यशाळा” हा नाविन्यपूर्ण उपक्रम शाळांमध्ये राबवत आहे. पण यासाठी कोणताही निधी संस्थेला नाही. तरी सुजाण व संवेदनशील व्यक्तींनी या उपक्रमासाठी संस्थेला कोणत्याही प्रकारची मदत करण्याचे आवाहन केले आहे.
सदर कार्यक्रमाचा व्हिडिओ हा वैदेही सावंत चक्रभेदी या यूट्यूब चैनल ला अपलोड केलेला आहे. बालस्नेही गाव करण्यासाठी ग्रामपंचायतीची भूमिका देखील तेवढीच महत्त्वाची आहे. बालकांच्या शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी त्यांचे पुढील भविष्य चांगले जाण्यासाठी आजच आपण प्रयत्न केले पाहिजे असे संस्थेच्या वैदेही सावंत यांनी पालकांना सांगितले.सदर कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्ष सौ.रिया सासवडे उपस्थित होत्या. तसेच कर्यक्रमाला गौरी घोगले राजेश्री सावंत, शिल्पा धने, भोजने बाई, सलोनी पवार, स्नेहा सपकाळ गोखले यांनी मोलाचे योगदान दिले. शेवटी पालकांनी पुन्हा एकत्र येण्याचे निश्चित करून आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.