(संगमेश्वर)
कडवई पंचक्रोशी शिक्षण मंडळाच्या भाईशा घोसाळकर हायस्कूल, कडवई येथे विद्यार्थ्यांना भविष्यकाळात करिअर निवडणे सोपे व्हावे यासाठी व्यवसाय मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या मार्गदर्शन शिबिरात एकूण सात वक्त्यांनी मार्गदर्शन केले.
इयत्ता दहावी आणि बारावीनंतर करिअर निवडणे सोपे जावे यासाठी विविध करिअर पर्यायांची माहिती होणे गरजेचे असते यासाठी कडवई येथे व्यवसाय मार्गदर्शन शिबिराचे आयोजन पालक शिक्षक संघाच्या करण्यात आले होते. शिबिराची सुरुवात समुपदेशक विश्राम सूर्यवंशी यांच्या ‘करिअर सप्तसूत्रीतून स्व ची ओळख आणि विविध करियर मार्ग’ या सत्राने झाली. त्यांनी करिअर निवडीचे तीन टप्पे,करिअर सप्तसूत्रीतील आवड, क्षमता, अभियोग्यता, परिस्थिती, शैक्षणिक संपादणूक, बुद्धिमत्ता, समायोजन याबद्दल सविस्तर माहिती देऊन त्यानुसार करिअर पर्यायांची माहिती दिली.
दुसऱ्या सत्रात ऍडव्होकेट राकेश सत्वे यांनी स्पर्धा परीक्षांना सामोरे जाताना या विषयावर मार्गदर्शन करताना स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असलेल्या बाबींवर चर्चा करतानाच धोपट मार्गाने न जाता स्वतःचा मार्ग तयार करण्याचा सल्ला दिला.प्रा.संतोष रहाटे यांनी तंत्र शिक्षणातील संधी या विषयावर मार्गदर्शन करताना आयटीआय व इंजिनियरिंग करून कसे यशस्वी होता येते ते समजावले. चौथ्या सत्रात मंथन कॉलेज ऑफ आर्टच्या संदेश पालये यांनी चित्रकला, ऍनिमेशन, जाहिरात व लेखन क्षेत्रात असलेल्या संधींची माहिती देताना यशस्वी व्यक्तींची उदाहरणे दिली.प्रा.सुनिल जावीर यांनी कला शाखेच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षा देणे कसे सोपे जाते हे सांगितले. तसेच कला शाखेतून उपलब्ध करिअर पर्यायांची माहिती दिली.शेवटच्या सत्रात प्रा.सुभाष गोरिवले व राज बोथरे यांनी आयटीआय प्रवेश प्रक्रिया, विविध कोर्सेस व उपलब्ध संधी यावर मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाला संस्थेचे सचिव वसंत उजगावकर, मुख्याध्यापक शेषेराव अवघडे, पर्यवेक्षक संतोष साळुंके, तानाजी दोरखडे, आबासाहेब शेंडगे, सिध्दी सुर्वे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश कुंभार यांनी केले. प्रास्ताविक मिलिंद कडवईकर यांनी केले तर आभारप्रदर्शन समीर भालेकर,नयना गुजर, भाग्यदेवी चौगुले यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सौजन्या महाडिक, सोमनाथ कोष्टी, सायली कुंभार, शुभम शिंदे, संजय घोसाळकर, अरविंद सुर्वे यांनी मेहनत घेतली.