(संगमेश्वर)
ओव्हरटेक करताना एसटी बसची रिक्षाला धडक बसून रिक्षा उलटल्याची घटना रविवारी सकाळी सह्याद्रीनगर येथे घडली. या घटनेनंतर बसचालकाला मारहाण केल्याचा प्रकार घडला. या प्रकारानंतर देवरुख आगारातील बसचालकांनी काम बंद आंदोलन पुकारले होते. त्यामुळे देवरुख आगारात गाडीच्या प्रतीक्षेत असलेल्या प्रवाशांना तिष्ठत बसावे लागले.
सदर घटना रविवारी सकाळी ६:३० वाजता घडली. देवरुख एसटी आगारातून सुटलेली देवरुख-उजगाव बस ओव्हरटेक करत असताना बसची मागील बाजू रिक्षाला लागल्याने रिक्षा उलटली. ही रिक्षा गोपीनाथ पवार (रा. मुरादपूर) हे चालवत होते. या अपघातात रिक्षामधील प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली. या अपघाताची माहिती देण्यासाठी बसचालक सुनील आनंदा पाटील हे देवरुख पोलिस स्थानकात आले होते. ते पोलिस स्थानकाजवळ आले असता, एका चारचाकी गाडीच्या चालकाने त्यांना घटनास्थळी जाऊया, असे सांगून गाडीतून नेले त्यानंतर मराठा भवन परिसरात त्यांना मारहाण केली. या मारहाणीनंतर देवरुख आगाराचे प्रभारी कैलास साबळे यांनी मारहाण करणाऱ्याविरोधात गुन्हा नोंद करा, अशी मागणी केली.
या मारहाण प्रकरणाच्या निषेधार्थ एसटीच्या सर्व संघटना एकवटल्या व जोपर्यंत मारहाण करणाऱ्याविरोधात गुन्हा नोंद होत नाही तोपर्यंत बसफेऱ्या बंद ठेवू, असा पवित्रा घेतला. त्यानंतर सकाळी ११ वाजल्यापासून गुन्हा दाखल होईपर्यंत दुपारी तीन वाजेपर्यंत बसफेऱ्या बंद ठेवण्यात आल्या होत्या. रविवारी बाजाराचा दिवस असल्याने देवरुखात प्रवाशांची गर्दी होती. या प्रवाशांना काम बंदचा फटका बसला. बंद फेऱ्यांचा साखरपा, संगमेश्वर विभागातील प्रवाशांना फटका बसला. या प्रकरणी देवरुख पोलिस स्थानकात वाहन अधिनियम ३५३, ३२४,५०४ अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास देवरुखचे पोलिस निरीक्षक संजय पाटील करत आहेत