(मुंबई)
मुंबईत एकीकडे नवरात्रोत्सवाचा उत्साह असताना चेंबूरच्या सिद्धार्थनगरमध्ये भल्यापहाटे घराला लागलेल्या भीषण आगीत एकाच कुटुंबातील सात जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या दुर्घटनेत गुप्ता कुटुंबातील दोन मुली, एक मुलगा, दोन महिला आणि एका ज्येष्ठाचा मृत्यू झाला. यात तीन अल्पवयीनांचा समावेश आहे. गाढ झोप असतानाच कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. ही घटना रविवारी पहाटेच्या सुमारास घडली.
आग लागलेली ही दोन मजली इमारत गुप्ता परिवाराची असून, खालच्या मजल्यावर दुकान आणि वर कुटुंबाचे वास्तव्य आहे. दुकानातील इलेक्ट्रिक वायरमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने ही आग लागली असण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. आग लागल्यानंतर क्षणातच ती वरच्या मजल्यापर्यंत पसरली, अशी माहिती पोलिसांनी दिली. आगीत गंभीररीत्या होरपळलेल्या सर्व सातही जणांना राजावाडी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या, वॉटर टँकर तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि आग आटोक्यात आणली.
चेंबूर पूर्व, ए. एन. गायकवाड मार्ग, प्लॉट नंबर 16/1 सिद्धार्थ कॉलनी येथील चाळीत रविवारी पहाटे 5 वाजताच्या सुमारास गुप्ता कुटुंबाच्या दुकान आणि घर असलेल्या वरील भागात अचानकपणे आग लागली. या आगीत दुकानातील इलेक्ट्रिक वायरिंग, इलेक्ट्रिक उपकरणे आदी सामानामुळे आग वेगाने भडकली. या आगीत गुप्ता कुटुंबातील सात सदस्य अडकले होते. आगीमुळे प्रचंड आरडाओरडा झाल्याने काही स्थानिक लोक मदतीला धावले. या आगीची माहिती अग्निशमन दलाला देताच त्यांनी तातडीने दाखल होत बचावकार्य सुरू केले. अग्निशमन दलाच्या जवानांनी 4 फायर इंजिन, 2 जम्बो वॉटर टँकर यांच्या सहाय्याने आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. सकाळी 9.15 वाजता सदर आगीवर नियंत्रण मिळवून आग संपूर्णपणे विझविण्यात आली.
प्रेम चेडीराम गुप्ता (वय वर्ष, 30), मंजू प्रेम गुप्ता (वय वर्ष, 30), प्रेसी प्रेम गुप्ता (वय वर्ष, 06), नरेंद्र गुप्ता (वय वर्ष, 10) , गीतादेवी धरमदेव गुप्ता (वय वर्ष, 60) अनिता धरमदेव गुप्ता (वय वर्ष, 39) आणि विधी चेडीराम गुप्ता (वय वर्ष, 15) अशी या घटनेतील मृतांची नावे असल्याचे सांगण्यात आले आहे. तर या घटनेत गंभीर जखमी झालेल्या दोघांवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान, या आगीतून गुप्ता कुटुंबातील गंभीर जखमी सात सदस्यांना बाहेर काढून तत्काळ राजावाडी रुग्णालयात नेण्यात आले, मात्र तेथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. ही आग नेमकी कशामुळे लागली याचा तपास अग्निशमन दल आणि स्थानिक पोलीस करीत असल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन विभागाकडून देण्यात आली.
सदर आग कशी काय लागली, त्यामध्ये गुप्ता कुटुंबातील सातही व्यक्तींचा मृत्यू कसा काय झाला?, याबाबत स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दलाचे संबंधित अधिकारी अधिक तपास करीत आहेत. पहाटे गाढ झोपेत असताना गुप्ता कुटुंबियांवर काळाने घाला घातल्याने याबाबत परिरसरातील नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आगीच्या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. तसेच जखमींवर शासनाच्या खर्चाने उपचार केले जातील, असे जाहीर केले. मुख्यमंत्री शिंदे यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. ही अतिशय दुर्दैवी घटना आहे. या दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी केली जाईल, असे त्यांनी सांगितले.