(रत्नागिरी)
एका तरुणाने आपल्या बहिणीच्या प्रियकराला मारहाण केल्याची घटना शहरानजीकच्या कर्ला येथे गुरुवारी दुपारी घडली. त्या तरुणीनेही आपल्या प्रियकराला मारहाण केली. या मारहाणीत आफताब सादीक मुकादम (२५, रा. मिरकरवाडा, पांजरी मोहल्ला, रत्नागिरी) जखमी झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी तरुणीसह तिच्या भावाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी आफताब मुकादम याने फिर्याद दिली आहे. त्यानुसार त्याचे कर्ला येथील एका तरुणीसोबत प्रेमसंबंध आहेत. मात्र, तो दुसऱ्या मुलींना गाडीवरून फिरवतो, असा संशय घेऊन तरुणीने त्याच्याशी वाद घातला. हा वाद मिटवण्यासाठी आफताब, त्याची आई व वहिनी तरुणीच्या घरी गेले होते. यावेळी ती तरुणी, तरुणीची मामी आणि मैत्रिणही तिथे होती. त्याचवेळी त्या तरुणीचा भाऊ सलमान शबीर मुल्ला (रा. राजापूरकर कॉलनी, उद्यमनगर, रत्नागिरी) हा तिथे आला. त्याने आफताबला शिवीगाळ करून मारहाण केली. आफताबची आई व वहिनी मध्ये आली असता त्यांनाही मारहाण करण्यात आली. तसेच तरुणीनेही आफताब याला बेदम मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.