(पोलादपूर / शैलेश पालकर)
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वरील पोलादपूर तालुक्यातील धामणदेवी गावाजवळील हॉटेल अन्नपूर्णा येथे पांढऱ्या रंगाच्या मारुती ब्रिजा कारमध्ये गांजा हा अंमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या तरूणास पोलादपूर पोलीसांसह स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी केलेल्या कारवाईत ब्रिझा कारसह गाडीतील सुमारे साडेचोवीस किलो गांजा जप्त करण्यात आला. यााप्रकरणी बुधवारी रात्री उशिरा साडेअकरा वाजता गुन्ह्याची नोंद पोलादपूर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून या छाप्यामुळे पोलादपूर तालुक्यात गांजा विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
मुंबई गोवा महामार्गावर पोलादपूर तालुक्यातील धामणदिवी गावानजिक अन्नपूर्णा हॉटेलजवळ बुधवारी सायंकाळी सव्वासात वाजण्याच्या सुमारास पांढऱ्या रंगाची मारुती ब्रिझा कार (क्रमांक 24 बी एच 1593) उभी होती. यावेळी नशाकारक अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी आलेला आरोपी विक्की विजय गोस्वामी उर्फ छोटया (रा.शाहूनगर, पाचगणी, जि. सातारा) याने पोलिसांची चाहूल लागताच गाडीची चावी घेत हॉटेल परिसरातून पलायन केले. पोलिसांकडून गाडीची पाहणी करीत असताना या गाडीत 22 किलो 435 ग्रॅम वजनाचा सुमारे 7 लाख 33 हजार 50 रुपये किंमतीचा हिरवट रंगाचा गांजा हा अंमली पदार्थ निळसर पांढऱ्या रंगाच्या गोणीमध्ये आढळून आला. याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींपैकी एका आरोपीला अटक केली. पोलिसांनी अंमली पदार्थासह 8 लाखाची कार असा एकूण 15 लाख 33 हजार 50 किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
स्थानिक गुन्हे अन्वेषण,अलिबाग-रायगडचे पोलीस कॉन्स्टेबल बाबासाहेब पिंगळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मंगेश मधुकर भिलारे (वय 27 रा. गुरेघर, ता. महाबळेश्वर,जि. सातारा) यास अटक करण्यात आली असून दुसऱ्या आरोपीचा शोध जारी आहे. याप्रकरणी पोलादपूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 802024 गुंगीकारक औषध द्रव्य आणि मनोव्यापारवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम 1985 चे कलम 8 (क) 20 निहाय कारवाई करण्यात आली आहे. घटनास्थळी पोलादपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल जाधव यांनी भेट दिली. या कारवाईमध्ये पोलादपूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरिक्षक शिंदे यांच्यासह जितेंद्र चव्हाण, प्रतिक सावंत, अक्षय पाटील, स्वप्नील कदम, संग्राम बामणे, कृष्णा जागडे, चंद्रकला भुरके, नारायण दराडे आदी पोलादपूर पोलीस ठाण्याचे कर्मचारी तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलादपूर कर्मचारी सहभागी झाले. या प्रकरणी अधिक तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उपनिरिक्षक नरे हे करीत आहेत.
पोलादपूर तालुक्यातील अनेक भागामध्ये सातारा जिल्ह्यातून गांजा या अंमली पदार्थाची आवक मोठया प्रमाणात होत असून पोलादपूर पोलीसांसह स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या या छाप्यामुळे गांजा तस्करांचे व किरकोळ विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.