(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड येथील कवी केशवसुत स्मारक सार्वजनिक वाचनालयात ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा ‘या उपक्रमांतर्गत ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. मालगुंड येथील कवी केशवसुत स्मारक सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय समिती यांचे विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमामध्ये मालगुंड येथील कवी केशवसुत प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी विशेष सहभाग घेतला.
महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि ग्रंथालय संचालनालय मुंबई यांच्या परिपत्रकानुसार शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांमध्ये दिनांक १ जानेवारी ते 15 जानेवारी या कालावधीत वाचन संकल्प महाराष्ट्राचा उपक्रम राबविणेबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. या निर्णयानुसार सूचित करण्यात आले आहे की, वाचन संस्कृतीच्या विकासाने तरुणांच्या व्यक्तिमत्त्वाचे भरण पोषण होण्यास तसेच सामाजिक प्रबोधन होण्यास मदत होते. परंतु अलीकडच्या काळात देशाचा तरुण वाचन संस्कृतीपासून दुरावत चालला असल्याचे आढळून येत आहे. त्यामुळे तरुण पिढीला प्रत्यक्ष ग्रंथ वाचनाकडे आकर्षित करण्याची आवश्यकता आहे. त्या दृष्टीने उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या अधिपत्याखालील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांमध्ये वाचन संकल्प महाराष्ट्राचा उपक्रम राबविणेबाबत सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत.
त्यानुसार मालगुंड येथील कवी केशवसुत स्मारक सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय समिती यांचे वतीने मालगुंड येथील कवी केशवसुत स्मारक येथे हा उपक्रम राबविण्यात आला. शासन निर्णयानुसार या उपक्रमामध्ये सामूहिक वाचन,वाचन कौशल्य कार्यशाळा, वाचन संवाद, पुस्तक परीक्षण व कथन स्पर्धा घेण्याबाबत सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. तसेच वाचन पंधरवड्यात सार्वजानिक ग्रंथालयांनी ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करून या कालावधीत अधिकाधिक विद्यार्थ्यांची सभासद नोंदणी करण्याचा प्रयत्न करावा आणि ग्रंथ कार्यक्रमांमध्ये ग्रंथांचे वाचन करण्याचा अहवाल संबंधीत जिल्हा ग्रंथालय कार्यालयाकडे पाठविण्यात यावा अशा सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. त्यानुसार या उक्रमाअंतर्गत मालगुंड येथील कवी केशवसुत प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी ग्रंथ प्रदर्शनाचा लाभ घेताना.यावेळी पुस्तक वाचन करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांना ग्रंथ प्रदर्शनाविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
या प्रसंगी मालगुंड येथील कवी केशवसुत स्मारक सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय समितीचे कोषाध्यक्ष रवींद्र मेहेंदळे, कोकण मराठी साहित्य परिषद मालगुंड शाखेचे सदस्य रमानंद लिमये यांनी विद्यार्थ्यांना ग्रंथ प्रदर्शनाबद्दल मौलिक मार्गदर्शन केले. याप्रसंगी मालगुंड येथील कवी केशवसुत प्राथमिक शाळेच्या शिक्षिका श्रीमती सोनावणे मॅडम व श्रीमती सावंत मॅडम, मालगुंड येथील कवी केशवसुत स्मारक सार्वजनिक वाचनालय कर्मचारी वर्ग उपस्थित होते. या ग्रंथ प्रदर्शनाचा लाभ वाचनालयाचे वाचक, ग्रामस्थ, विद्यार्थी व पर्यटकांनी घेतला. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी मालगुंड येथील कवी केशवसुत स्मारक सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय कार्यालयाचे सर्व कर्मचारी वर्ग यांनी विशेष मेहनत घेतली.