(चिपळूण)
परशुराम घाटात शनिवारी झालेल्या अपघातप्रकरणी चिपळूण पोलिस स्थानकात दुचाकीस्वारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुलफाम खुर्शिद अन्सारी असे त्याचे नाव आहे.
या अपघाताची फिर्याद चारचाकी गाडीवरील चालक इलियास इसाक धामसकर यांनी दिली. या अपघातात गुलफाम अन्सारी व गुफराज खुर्शिद अन्सारी हे दोघेजण जखमी झाले आहेत. मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटातील सवतसडा परिसरापासून काही अंतरावरच्या वळणावर इलियास धामसकर हे बोलेरो घेऊन लोटेच्या दिशेने जात होते. याचवेळी गुलफाम अन्सारी दुचाकीने भरधाव वेगात चिपळूणच्या दिशेने प्रवास करत होता. ट्रकला ओव्हरटेक करत असताना रस्त्याचा अंदाज न आल्याने दुचाकीची समोरून येणाऱ्या बोलेरोला जोरदार धडक बसली.
या अपघातात दोन्ही वाहनांचे नुकसान झाले तर गुलफाम अन्सारी व दुचाकीच्या मागील सीटवर बसलेले गुफराज अन्सारी हे दोघेही जखमी झाले. त्यांना रुग्णवाहिकेतून उपचारासाठी चिपळुणातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. अधिक तपास चिपळूण पोलिस करत आहेत