(राजापूर)
देवगड समुद्रात मच्छिमारी नौका समुद्रात बुडल्याची दुदैवी घटना रविवारी ३१ मार्च रोजी रोजी पहाटे साडेपाचच्या सुमारास घडली आहे. या नौकेवरील ८ पैकी ७ खलाशांना वाचविण्यात यश आले असून एक खलाशी अद्याप बेपत्ता आहे.
तुषार दिगंबर पारकर यांच्या मालकीची विशाखा नौका देवगड समुद्रात १० वाव पाण्यात बुडाली. या नौकेतील नितीन जयवंत कणेरकर (४३, रा. कणेरी, राजापूर) असे बेपत्ता खलाशाचे नाव आहे. या बाबत मिळालेली माहिती अशी की, देवगड बंदरातील तुषार दिगंबर पारकर यांच्या मालकीची विशाखा ही नौका मच्छीमारीसाठी रविवारी पहाटे ५ च्या सुमारास देवगड बंदरातून समुद्रात जाण्यासाठी निघाली होती. देवगड किल्ल्यासमोर १० वाव पाण्यात बोटीच्या तळातील जॉईंटच्या फटीतून पाणी शिरु लागल्याने ती बुडू लागली. बोट बुडत असल्याने बोटीवरील तांडेल व खलाशी यांनी पाण्याची कॅन रिकामी करून जीव वाचविण्यासाठी समुद्रात उड्या मारल्या. यावेळी मच्छीमारीसाठी गेलेल्या अनंत नारकर यांच्या इंद्रायणी नौकेवरील तांडेल व खलाशी यांनी बुडत असलेल्या बोटीवरील खलाशांना वाचविले.
मात्र, या बोटीवरील नितीन जयवंत कणेरकर याच्या हातातील कॅन सुटून गेल्याने तो पाण्यात बेपत्ता झाला. या दुर्घटनेत नौकेला जलसमाधी मिळाल्याने नौका मालक तुषार पारकर यांचे सुमारे २० लाखांचे नुकसान झाले आहे.