(राजापूर / वार्ताहर)
रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर- लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघात भाजपने प्रथमच २०१४ ला निवडणूक लढवली होती. त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूका झाल्या, त्यातून मतदारांमध्ये कमळ चिन्हाची व्यवस्थित ओळख झाली व भाजपसाठी मतदानाची टक्केवारीसुद्धा वाढली. त्यानंतर बहुतांश ग्रामपंचायतीमध्ये भाजपची ताकद वाढली आहे आणि त्याचाच परिणाम म्हणजे लोकसभा निवडणूकीत भाजपला भरघोस मतदान झाले आहे. केंद्रात व राज्यात भाजप सरकार असल्याने विधानसभेत भाजपचा उमेदवार पाठविण्याची ही एकमेव संधी आहे.
सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. रवींद्र चव्हाण, खासदार श्री. नारायण राणे, आमदार श्री. निरंजन डावखरे व राज्य सरकारच्या माध्यमातून विविध विकासकामे या मतदारसंघात झाली आहेत. माजी खासदार श्री. निलेश राणे यांनी आपल्या आक्रमक कार्यशैलीने कार्यकर्त्यामध्ये सतत ऊर्जा निर्माण करुन संघटनात्मक ताकद वाढवली आहे. मतदार संघात निधी मिळवण्यासाठी माजी आमदार श्री. प्रमोद जठार, जिल्हा अध्यक्ष श्री. राजेश सावंत, माजी जिल्हा अध्यक्ष श्री. दीपक पटवर्धन, जिल्हा सरचिटणीस श्री. रवींद्र नागरेकर, विधानसभा निवडणूक प्रमूख सौ. उल्का विश्वासराव, राज्य महिला मोर्चा सचिव सौ. शिल्पा मराठे व इतर भाजप पदाधिकाऱ्यांनी राज्य शासनकडे पाठपुरावा करुन भरीव निधी मतदारसंघात आणला आहे, तसेच मतदारसंघात प्रवास करुन खूप मोठया मेहनतीने पक्षाची बांधणी केली आहे.
पिण्याच्या पाण्यासारखा अतिसंवेदनशील विषय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्वाकांक्षी योजना “जल जीवन मिशन” याच्या माध्यमातून सुटला आहे. कृषी सन्मान योजना, प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजना, प्रधानमंत्री आवास विकास योजना अश्या केंद्र सरकारचे अनेक लोकप्रिय योजनांच्या माध्यमातून भाजप प्रत्येक कुटुंबात पोहचला आहे. मोबाईल नेटवर्क व इंटरनेट अगदी दैनंदिन जीवनातील अभिवाज्य घटक आहे आणि खूपच गंभीर समस्या संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात आहे. त्यासाठी मागील पाच ते सहा वर्षे केंद्रीय स्तरावर पाठपुरावा करीत आहे. त्यामुळे जिल्ह्यात १९० मोबाईल टॉवर्सना मंजूर झाली असून, ६५ मोबाईल टॉवर्स अपग्रेट करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. असे सांगताना संतोष गांगण यांनी पुढे म्हटले आहे की मी स्वतः राजापूर – लांजा – साखरपा विधानसभा क्षेत्रात सर्वात जास्त नवीन टॉवर्स मंजूर करुन घेतले आहेत व नियमित साईटनिहाय कामाचा आढावा घेत आहे. रत्नागिरी जिल्ह्यात काम सुरु असलेल्या १९० नवीन मोबाईल टॉवर्सपैकी सर्वात प्रथम राजापूरातील पांगरे (बु), लांज्यातील कोल्हेवाडी व हर्दखळे येथील नवीन मोबाईल टॉवर्स कार्यान्वित होत आहेत. यातून जनतेची मुख्य समस्या सुटत असल्याने त्यातून पक्षाची ताकद वाढत आहे. आपण स्वतः रेल्वे मंत्रालय व कोंकण रेल्वेच्या माध्यमातून राजापूर पोष्ट ऑफिसमध्ये रेल्वे तिकीट आरक्षण सेवा (पीआरएस) सुरु करून घेतली, त्याचा जनतेला खूप मोठा लाभ होत आहे. राजापूर तालुका क्रीडा संकुल मागील दहा ते बारा वर्षे प्रलंबित होते, त्यासाठी देखील आपण स्वतः भाजपच्या विविध आमदार व मंत्र्यांच्या माध्यमातून प्रयत्न केले असून तत्कालीन क्रीडामंत्री श्री. गिरीश महाजन यांनी त्याला निधी मंजूर केला असेही ते म्हणाले.
भाजपच्या माध्यमातून विविध स्तरावर जनतेच्या सर्वांगीण विकासाची कामं झाली आहेत, त्यामुळे राजापूर लांजा साखरपा विधानसभा मतदारसंघ भाजपलाच मिळाला पाहिजे असे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले. मागील काही महिन्यापासून सहयोगी पक्षाकडून जिल्हा नियोजन निधी वाटपात भाजप कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय होत आहे. युतीचे प्रोटोकॉल डावलून काही भाजप कार्यकर्त्यांचा तर आमिष देऊन प्रवेश करुन घेतला जात आहे. मित्र पक्षाकडून असंच चालू राहिलं तर मतदारसंघात पक्षाचे भवितव्य धोक्यात येऊ शकते. भाजपचा सर्वसामान्य प्रामाणिक कार्यकर्ता या परिस्थितीमुळे उद्विग्न झाला असून त्याची मुस्कटदाबी होत आहे. पक्षाचे मतदारसंघातील अस्तित्व मजबुतीने टिकवण्यासाठी एखादा स्वाभिमानी भाजप कार्यकर्ता बंडखोऱी करुन विधानसभा निवडणूकीच्या रिंगणात उतरला तर आश्चर्य वाटयला नको असं परखड मतं त्यांनी यावेळी व्यक्त केलं.