(मुंबई)
कोकणात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला शिवसेना ठाकरे गटाने धक्का दिलाय. राजापूर लांजा साखरपा या विधानसभा मतदारसंघातील प्रमुख नेते अजित यशवंतराव यांचा उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेना युबीटी पक्षात प्रवेश झाला. यावेळी कोकणातील शिवसेना नेते, माजी खासदार विनायक राऊत आणि स्थानिक आमदार राजन साळवी यांच्यासह काही प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
अजित यशवंतराव यांचा ठाकरे गटात प्रवेश झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी त्याचं पक्षात स्वागत केलं. यावेळी उद्धव ठाकरे यांनी पक्षात येणाऱ्या उत्साही नेत्यांना कोपरखळी मारलीय. अनेकजण आमच्याकडे येऊ इच्छित आहेत पण त्यांना तिकीट पाहिजे, अजित यशवंतराव यांनी विदाऊट तिकीट प्रवेश केला. त्यामुळे त्यांचा पुढील प्रवास सुखकर व्हावा, यासाठी त्यांच्याकडे मोठी जबाबदारी दिली जाईल असं अश्वासन उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिलं. यावेळी बोलताना उद्धव ठाकरेंनी मशाल चिन्हाबाबत माहिती दिली. हा काळ संघर्षाचा आहे. आपलं सर्वकाही चोरलं गेलंय. हे मशाल चिन्ह आहे ते आता सर्वांपर्यंत पोहोचलेलं आहे. मात्र काही मतदारांमध्ये मशाल बाबत संभ्रम निर्माण झाला होता.
त्यावरुन बोलतांना उद्धव ठाकरे म्हणाले, आईस्क्रीमचा कोन आणि निवडणूक आयोगाने दिलेले मशालीचं चिन्ह हे काही प्रमाणात सम-समान दिसते. त्यामुळे हे चिन्ह संभ्रम करणारं असल्याचं उद्धव ठाकरेंचं म्हणणं होतं. पण आयोगाने त्यांची मागणी फेटाळली. त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले, अनेकांनी आपल्या चिन्हाचा संभ्रम निर्माण करून देखील याच मशालवर चिन्हावर आपले नऊ खासदार लोकांनी निवडून दिलेत.
आपल्याकडचा उमेदवार कोण हे सांगण्याची गरज नाहीये. कठीण काळात अनेकजण आपल्यासोबत राहिले म्हणून आपण ही लढाई लढतोय. जीवाला जीव देणारी माणस आहेत त्याच जोरावर मी निवडणूक लढायला तयार झालोय. त्यांच्याकडे सत्ता आहेत त्यांच्याकडे एजन्सी आहेत, पण माझ्याकडे जीवाला जीव देणारी माणसं आहेत. त्याच जोरावर मी ही लढाई लढायला मैदानात उतरलो असल्याचं उद्धव ठाकरे म्हणालेत.
दरम्यान लोकसभा निवडणुकांवेळी निवडणूक आयोगाने दिलेलं मशाल चिन्ह हे संभ्रम करणारे असल्याचे सांगत ठाकरे गटाने एक मशालीचे चिन्ह आयोगाला सूचवले होते. मात्र निवडणूक आयोगाने ते चिन्ह नाकारले. मशालीचं हे चिन्हच तुम्हाला वापरावं लागेल, असे आयोगाने स्पष्ट केले आहे. त्यावरुन आज उद्धव ठाकरेंनी मशालीचं चिन्ह दाखवत उमेदवार व शिवसैनिकांना याबाबत आवाहन केलं.