(रत्नागिरी / प्रतिनिधी)
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून हजारोंच्या संख्येने अनुयायी रत्नागिरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ दाखल झाले होते. मध्यरात्री १२ वाजताच रत्नागिरी तालुक्यातील दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष अनंत सावंत, जिल्हा पदाधिकारी विजय जाधव आणि सहकारी प्रदीप जाधव यांच्या हस्ते आधुनिक भारताचे निर्माते, विश्वरत्न, भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. विशेष म्हणजे यंदा नागरिकांनी “वही-पेन आणि शैक्षणिक साहित्य” देऊन बाबासाहेबांना वैचारिक अभिवादन केले.
गुरुवारी ५ डिसेंबरच्या रात्री ११ वाजल्यापासूनच गाव-वाड्यामधून अनुयायी रत्नागिरी येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ दाखल होण्यास सुरुवात झाली होती. तान्हुल्यापासून वयोवृद्धांपर्यंत सर्व वयोगटांतील अनुयायांच्या पुतळ्याजवळ लांबच-लांब रांगा लागल्या होत्या. शुक्रवारी मद्यरात्री ठीक १२ वाजता डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने जिल्हाध्यक्ष अनंत सावंत यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच संयुक्त समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पुतळ्यास पुष्पहार आणि पुष्पचक्र अर्पण केले. त्यानंतर पंचशील ग्रहण करून भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने भावपूर्ण अभिवादन करण्यात आले. रत्नागिरीच्या दिशेने येणारे अनुयायांचे जथ्थेच्या जथ्थे व त्यांना शिस्तीने सोडणारे समता सैनिक दलाचे सैनिक, चळवळीतील कार्यकर्ते, डॉ बाबासाहेब आंबेडकर मार्ग ते पुतळा परिसराच्या दिशेने अत्यंत शिस्तीने चालणारे हजारो अनुयायी पोलिसांना सहकार्य करताना पाहायला मिळाले.
दरवर्षी प्रमाणे यावर्षीही डॉ बाबासाहेब आंबेडकरांना मध्यरात्री बारा वाजण्याच्या सुमारास नियोजनानुसार विविध संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, धम्म बांधव अभिवादन करण्यासाठी दाखल होतात. जवळपास एक ते दोन तास शिस्तबध्द पध्दतीने डॉ. बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी रांगा लागली होती. वाहतुकीसोबतच कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी रत्नागिरी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. रत्नागिरी येथे दाखल होणाऱ्या अनुयायांची वाढती संख्या लक्षात घेता धम्म बांधवांना दर्शन घेणे सुकर होण्यासाठी समता सैनिक दलाच्या सैनिकांनी पोलिसांना उत्तम सहकार्य केले.
समता सैनिक दलाची मानवंदना
भारतीय बौद्ध महासभाप्रणीत समता सैनिक दलाच्या तुकडीने पुतळा परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला सलामी व मानवंदना दिली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांसोबत समता सैनिक दलाचे सैनिक ही कार्यरत असतात. दीक्षाभूमी, चैत्यभूमी अशा महत्वाच्या ठिकाणी होणाऱ्या सोहळ्यात समता सैनिक दलाचे कार्यकर्ते निळ्या टोपीत नेहमीच दिसतात. हे सैनिक मोठ्या संख्येत लक्ष वेधून घेत असतात.
शहर पोलीस निरीक्षकांचे अभिवादन
रत्नागिरी पुतळा परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मध्यरात्री एक वाजता शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीश शिवरकर पुतळा परिसरात दाखल झाले. पोलिसांशी संवाद साधण्यापूर्वीच आधी डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून सलामी देऊन अभिवादन केले. यावेळी त्यांच्यासमवेत पोलीस कर्मचारी होते.
वैचारिक अभिवादनाला मोठा प्रतिसाद
महामानवास अभिवादन करण्यासाठी जिल्ह्याच्या कोनाकोपऱ्यांतून अनुयायी रत्नागिरीत येत राहतात. या महामानवाची ओळख ‘सिम्बॉल ऑफ नॉलेज’ अशी आहे. सावित्रीबाई फुले बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने यंदा “वही पेन आणि शैक्षणिक साहित्य अभियान” राबविले गेले आहे. त्यासाठी गाव-वाड्यामधून जनजागृती मोठ्या प्रमाणात करण्यात आली होती. परंतु अभियानाला मोठा प्रतिसाद मिळत असून यंदा दरवर्षीप्रमाणे अभिवदनासाठी मेणबत्त्या अगरबरत्यासह पुष्पहार, फुले अर्पण न करता डजनभर वह्या पेन अर्पण करून अनेकांनी वैचारिक व कृतिशील अभिवादन केले आहे. हे अभियान राबविणाऱ्या युवा तरूण-तरुणीचे नागरिकांकडून कौतुक केले जात आहे.