जय जय रघुवीर समर्थ. मातीच्या मूर्तीचे पूजन करावे आणि नंतर विसर्जन करावे हे काही मनाला पटत नाही. देव पूजावा आणि टाकावा हे जीवाला प्रशस्त वाटत नाही. याचा अंतर्यामी विचार करावा. देव करतो असं नाही, टाकतो असंही नाही म्हणून याचा विचार पहावा. देव नाना शरीरे धरतो. धरून मागे सोडतो. तर तो देव कसा आहे? हे विवेकाने ओळखावे. देव शोधण्यासाठी नाना साधने, निरूपणे आहेत. हे सगळ आपल्या अंतःकरणाला समजलं पाहिजे. एखादा पदार्थ दिला घेतला जातो त्याप्रमाणे ब्रह्मज्ञानाचा उपदेश योग्य अधिकारी असल्याशिवाय देता येत नाही. सगळ्या लोकांच्या अंतरीचा भाव मला देव प्रत्यक्ष भेटवावा असा असतो. परंतु विवेकाचा उपाय आहे तो वेगळाच आहे. विचार पाहिला तर ते टिकत नाही. त्याला देव असं म्हणवत नाही, परंतु जन लोक ऐकत नाहीत; त्याला काय करायचं? थोर लोक मरून जातात, त्यांच्या समाध्या स्थापून त्यांची पूजा करतात. तशीच उपासनेची गती आहे. लोकांना मोठा व्यापार करता येत नाही म्हणून शाईचा व्यापार कागदोपत्री केला जातो. त्यामुळे राजसंपदा कशी प्राप्त होईल? म्हणून जितका भोळाभाव तितका अज्ञानाचा स्वभाव, अज्ञानामुळे देवाधिदेव कसा पावेल? अज्ञानाला ज्ञान मानू नका. ज्ञानी माणूस अनुमान मानत नाही. म्हणून सिद्धांच्या मार्गाने साधकाने गेले पाहिजे.
माया सोडून मुळापर्यंत जावं तरच समाधान मिळेल. असं न होता इकडे तिकडे गेलं तर वाट चुकेल. मायेचे उल्लंघन करण्यासाठी, देवाच्या प्राप्तीसाठी अथवा अंतरात्म्याला आपली माया ममता सोडण्यासाठी नाना साधनं करावी लागतात. अनुभव घेऊन अध्यात्म श्रवणपंथ धरावा लागतो. असे केलं नाही तर लौकिक गोष्टींत देखील चुकामुक होते. खरी आणि खोटी स्थिती ओळखावी. खोट्याच्या वाटेला जाऊ नये. खोट्याची संगत धरू नये. कोणताही खोटा संग्रह करू नये. शेवटी खोटं ते खोटं! ते कणभर देखील खऱ्याची बरोबरी करू शकत नाही. मन हे मायीक असल्याने स्वाभाविक त्याची प्रवृत्ती अधोमुख म्हणजे माया निर्मित दृश्याकडे असते. साधकाने ही प्रवृत्ती बदलून त्याला ब्रह्मअभ्यासाला लावले पाहिजे. अध्यात्म श्रवण करीत जावे म्हणजे सगळं काही मिळतं. नाना प्रकारचे गोंधळ निघून जातात. सुताचा गुंता झाला तर ते आपण उलगडतो तसं मन मोकळं करायचं आणि हळूहळू मुळाकडे जायचं.
सतराव्या दशकात सांगितलेल्या सकळं, सर्व तत्वांचे मिश्रण होऊन हे सगळं पिंड ब्रह्मांड झालं आहे. हे पिंड ब्रम्हांड ही नानाशरीर रूपी स्थूल विभागाने नटलं आहे. काय आहे ते या शरीरातच पाहावे. कसे ते इथेच शोधावे, सूक्ष्म अशा मूळ मयेची १४ नावे ही सांगितली आहेत ती समजून घ्यावी. निर्गुण निर्विकारी एक आहे, ते सगळ्यांच्या ठायी व्यापक आहे. देहामध्येही ते निष्कलंक आहे की नाही? मूळमाया ही संकल्परूप आहे. ते अंतकरणाचं स्वरूप आहे. जडाला चेतवविणारे चैतन्यरुप तेही शरीरामध्ये आहे. समान गुण, गुण साम्य, हा सूक्ष्म विचार आहे. तो सूक्ष्म विचार जाणते साधुच जाणतात. त्या सर्वाना प्रणाम. शरीर दोन भागातील भासते. उजवे डावे अंग असा विचार आहे. तोच पिंडातील अर्धनारीनटेश्वर असं ओळखायचं. त्यालाच प्रकृती पुरुष असं म्हणायचं शिवशक्ती म्हणून ओळखायचं. षडगुणेश्वर त्या कर्दमालाच म्हणायचं. त्यालाच महतत्त्व म्हणायचं.
जिथे त्रिगुणाचं गुणत्व आहे, अर्धमात्रा शुद्ध सत्व आहे तिला गुणक्षोभिणी म्हणतात. त्रिगुणांमुळे शरीर चालतं हा प्रत्यक्ष दिसणारा विचार आहे. हे मूळमायेच्या कर्दमाचे शरीर आहे असं जाणावं. मन, माया आणि जीव हाही स्वभाव दिसतो. त्या चौदा नावांचा अभिप्राय पिंडात पहावा. पिंड म्हणजे शरीर पडल्यानंतर सगळे जातं परंतु परब्रम्ह शाश्वत राहतं. मग ते शाश्वत परब्रम्ह मनात दृढ धरावे. इतिश्री दासबोधे गुरु शिष्य संवादे सूक्ष्म निरूपण नाम समास नवम समाप्त.
जय जय रघुवीर समर्थ.
पद्माकर देशपांडे
(निरूपणकार पत्रकार / लेखक)
मोबा. 9420695127