जय जय रघुवीर समर्थ. चार प्रकारचे प्राणी असतात. सगळे पाण्यामुळे वाढतात निर्माण होतात आणि जातात असे असंख्य असतात. तत्त्वांपासून शरीर झालं. अंतरात्म्यासकट वाढलं. त्याचं मूळ शोधलं तर ते पाणीच आहे. शरद काळी घामरूपाने तसेच सर्वांगातून पाणी झिरपते त्याप्रमाणे सर्वांगात पुरुष वीर्य व स्त्री रेत रक्त एकत्र मिसळतात. अन्नरस, देहरस,रक्तरस याच्यामुळे शरीराची बांधणी होते. या दोन रसांमुळे सावकाश वाढ होते. वाढता वाढता वाढतात. कोमल असतात ते कठीण होतात. पुढे नाना अवयवांमध्ये पाणी शिरते. ते वाढते. ते पाणी जास्त झालं तर बाहेर पडून जाते. भूमीवर पडता मग ते रडतं. सगळ्याचे सगळे असे आहे. शरीर वाढतं, कुबुद्धी वाढते, मुळापासून सगळंच घडतं. सगळं मोडत आणि वाढतं. पाहता पाहता शरीर दिवसेंदिवस मोठ होत जाते. काही विचार सुचायला लागतात.
फळांमध्ये बी झालं त्याप्रमाणे इथे झालं. पाहिल्यावर ऐकल्यावर काही समजायला लागतं. बीज पाण्यामुळे अंकुरतात. पाणी नसेल तर ती उडून जातात. उदक म्हणजे पाणी आणि माती असेल तर ते वाढतात. दोन्हीमध्ये बीज असेल तर भिजून सहजपणे अंकुर फुटतात. वाढता वाढता पुढे उदंड वाढतात. तर खालच्या बाजूला मुळ्या धाव घेतात. तिकडे वर त्याची टोक वाढतात. मुळे आणि अग्र एकमेकांपासून दूर होत जातात. मुळ्या पाताळात जातात. अग्र अंतराळतात जातात. मध्ये नाना फुल पान ही झाडाला लगडतात. फळांच्या पूर्वी फुलं, फुलांच्या आधी पान, पानांच्या पेक्षा अधिक काष्ठ जुनी. काष्ठापेक्षा मुळ्या बारीक. मुळ्यांपेक्षा पाणी आधीचे. आणि पाण्याच्या आधी कौतुक आहे ते भूमंडळाचे! अशी प्रचिती आहे. तेव्हा जगामध्ये सगळ्यात वडील आपोनारायणाची मूर्ती आहे. त्याच्यापेक्षा वडील जो आहे तो अग्नीदेव आहे. अग्नीपेक्षा वायुदेव वडील आहे. वायू देवापेक्षा वडील स्वभाव अंतरात्म्याचा आहे. सगळ्यांपेक्षा अंतरात्मा हा वडील आहे. त्याला जो जाणत नाही तो दुरात्मा. म्हणजे दूर आत्मा. आत्म्यापासून दूर असलेला. जवळ असून देखील त्याला माहिती होत नाही. अनुभव नसल्यामुळे सवय होत नाही. ज्यांना अनुभव नाही ते उगीच आले आणि गेले, म्हणून सगळ्यात श्रेष्ठ अश्या अंतरात्म्याशी अनन्य झालं म्हणजे देहस्वभाव पालटायला लागून बाहेरच्या विषयाचे आकर्षण कमी होऊ लागते आणि तो जास्त अंतर्मुख होऊ लागतो. मग आपल्या आपण व्यासंग करावा कधीही ध्यानभंग होऊ नये.
बोलणं चालणं याच्यामध्ये फरक पडू देऊ नये. जे वडिलांनी निर्माण केलं ते पाहिलं पाहिजे. काय काय वडिलांनी केलं? किती पाहायचं तर तो अंतरात्मा म्हणजे वडील ज्याचा जागृत झालेला आहे तोच भाग्याचा पुरुष आहे. त्याला अल्प चेतनेमुळे भाग्य निर्माण झाले त्या नारायणाचे मनी अखंड ध्यान करावं. मग त्याच्यापासून लक्ष्मी दूर जात नाही. विश्वामध्ये नारायण आहे त्याची पूजा करीत जावी. त्याच्यासाठी आपले शरीर वापरावे. उपासना म्हणजे विश्वरूप अंतरात्म्याची सेवा असे समजते त्याचे पालन विश्व करते. त्याची लीला कोणालाही समजत नाही. देवाची लीला देवाशिवाय दुसरा कोण पाहील? जितकं आपण पाहावे तितके आपण देवच होऊन जातो. उपासना ही सगळ्यांच्या ठाई आहे, मात्र आत्माराम कुठेच नाही म्हणून ठाई ठाई रामाने जागा घेतली, अशी माझी उपासना आहे. तिच्या व्यापकतेचे अनुमान बुद्धीला होत नाही. ती निरंजनाच्या पलीकडे घेऊन जाते.
अंतरात्म्यांमुळे कर्म चालतात. अंतरात्म्यांसाठी उपासक होतात. आत्म्यासाठी कित्येक ज्ञानी असतात. नाना शास्त्र नाना मत हे देवाने स्वतः सांगितली. ती नेमकी व्यवस्थित कर्मानुसार होतात. देवाला सगळं करावं लागतं. वंद्य आणि निंद्य सर्व देवाने केलं असलं तरी त्यातून योग्य तेच घ्यावं. आपल्या अधिकाराप्रमाणे चालावं म्हणजे बरं. उभारणी आणि विसर्जन असं विधान बोललेलं आहे. उपासना अशी द्वैतमय असल्याने ती पूर्व पक्षातच मायेमध्ये येते. वेदांत सिद्धांत धादांत त्रिविद्या प्रतीत स्वानुभव हा मुख्य होय. पंचीकरण आदि उभारणी संहारणीच्या पलीकडे जाऊन या महावाक्याचा लक्षार्थ अनुभवावा. इतिश्री दासबोधे गुरुशिष्य संवादे पिंडोत्पत्ती निरूपण नाम समास नवम समाप्त.
जय जय रघुवीर समर्थ.
पद्माकर देशपांडे
(निरूपणकार पत्रकार / लेखक)
मोबा. 9420695127