जय जय रघुवीर समर्थ. जिथे वेदांची मती खुंटली तिथे गती आणि अवगती कशाची? आत्मशास्त्र आणि गुरुची प्रचिती यांचे ऐक्य झाले, त्यामुळे जीवनाची भ्रांती फिटली आत्म प्रचिती झाली. मनुष्य प्राण्याला सद्गुरु बोधामुळे उत्तम गती मिळाली. सद्गुरुचा बोध झाला तेव्हा चारही देहांचा अंत झाला त्यामुळे स्वस्वरूपाचा निजध्यास लागला. त्या निजध्यासामुळे प्राणी निश्चयपूर्वक निर्वाणाच्या दिशेने गेला आणि सायुज्यमुक्तीचा धनी होऊन बसला. दृश्यपदार्थ नाहीसे झाल्यावर सगळा आत्माच आहे लक्षपूर्वक विचारपूर्वक पाहिले असता दृश्य मुळीच नाही. खोट्या गोष्टीकडे खोटेपणाने पाहिले की त्याचे खोटेपण अनुभवास येते.
श्रोत्यांनी जे पाहिलेही नाही आणि ऐकलेही नाही त्याचं नाव आहे मोक्ष. सद्गुरुचे वचन हृदयात धरले तोच मोक्षाचा अधिकारी. श्रवण आणि मनन अत्याधराने केलेच पाहिजे. जेथे अज्ञानाचा पूर्व पक्ष आणि ज्ञानाचा उत्तर पक्ष असे दोन्हीही नाहीसे होतात तिथे लक्षही नसतं आणि अलक्षही नसतं त्याला मोक्ष असं म्हणतात. त्यालाच नेमस्त आत्मा असे म्हणतात. जिथे ध्यानधारणा संपून जाते, कल्पनाही निर्वीकल्प होते, केवळ अस्तित्वाने सूक्ष्मब्रम्ह उरते. भवरूपी मृगजळ आटले, खोटे बंधन सुटले, अजन्मा असलेल्यास जन्माच्या दुःखापासून मुक्त केले. मुळात निःसंग असलेल्यास संगाची व्याधी जडते, विदेही असलेल्यास देहबुद्धी येते, विवेकाने ही प्रपंचाची उपाधी तोडून टाकली अद्वैताच द्वैत तोडलं जात. एकांताला एकांत दिला, अनंताला अनंताचा अंत दिला, जागृतीला जागृत केले, जागे झालेल्यास सावध केले, त्याला आत्मज्ञान म्हणतात. अमृताला अमर केले, मोक्षाला मुक्तीचे घर दिले, मूळची ऐक्यता अखंडपणे अनुभवली आणि निरंतर योग केला.
निर्गुणाला निर्गुण केले, सार्थकाचे सार्थक झाले, खूप दिवसांनी आपल्याला आपण भेटलो. द्वैताचा पडदा तुटला. भेदाला भेदाने तोडून टाकले, पंचमहाभूतांची बाधा निरसून गेली, निघून गेली. साधनेचे फळ मिळाले. शांततेला शांत केले, निर्मळ असलेल्याचा मळ विवेकाच्या साह्याने काढून टाकला. जवळ होते, त्याचं त्याला प्राप्त झालं. आपल्या स्वतः स्वरूपाला पाहता क्षणी जन्माचे दुःख नष्ट झाले. दुष्ट स्वप्नांनी त्रासलेला ब्राह्मण नीच जातीमध्ये जन्मला होता पण तो जागृत झाल्यावर पुन्हा शुद्धीवर आला त्याप्रमाणे स्वतःला स्वतः सापडला. असं ज्ञान ज्याला झालं त्या पुरुषाचं लक्षण पुढच्या समासामध्ये निरूपण करीत आहे. असं समर्थ सांगत आहेत. इतिश्री दासबोधे गुरु शिष्य संवादे आत्मदर्शन नाम समास अष्टम समाप्त. दशक आठवे समास नववा सिद्ध लक्षण नाम समास
जय जय रघुवीर समर्थ. अंतरामध्ये अमृत गेल्यावर बाहेरची काया लखलखीत होते. आंतरस्थिती निर्माण झाल्यावर संतांची लक्षणे कशी असतात ते सांगतो. एखाद्या व्यक्तीला आत्मज्ञान झाले हे कसे जाणावे? या प्रश्नाचे उत्तर देत आहे. याला साधूची लक्षणे असे म्हणतात. सिद्धांची लक्षणे ऐका. सिद्ध म्हणजे स्वरूप जाणावे. तिथे वेगळेपण मुळीच नाही. स्वरूप होऊन राहिले त्याला सिद्ध असे म्हणतात. सिद्धस्वरूप म्हणजेच सिद्धपण. वेद आणि शास्त्रांमध्ये ज्याचं वर्णन केलेलं आहे जे स्वरूप स्वतः सिद्ध आहे, त्यालाच त्याला सिद्ध म्हणतात. इतरत्र सिद्ध याचा प्रयोग करता येत नाही मात्र साधकांना विवेक समजावा म्हणून सिद्धलक्षणाचे कौतुक सांगतो. अंतरात्म्याची जाणीव झाल्यावर शरीर कसे होते? स्वप्नामधील खोट्या स्वप्नरचनेप्रमाणे होते. सिद्धांचे लक्षण ही परमार्थाची अंतर्खूण आहे. सदा स्वरूपानुसंधान हे साधूचे मुख्य लक्षण आहे. लोकांमध्ये असूनही लोकांपेक्षा वेगळा. स्वरूपावर दृष्टी पडल्यावर संसाराची चिंता नष्ट होते आणि निरूपणाची आवड वाटते, असं सिद्धांचे लक्षण समर्थ सांगत आहेत. पुढील लक्षणे ऐकूया पुढील भागात.
जय जय रघुवीर समर्थ.
पद्माकर देशपांडे
(निरूपणकार पत्रकार / लेखक)
मोबा. 9420695127