जय जय रघुवीर समर्थ. नदी समुद्राला मिळाली तर ती वेगळी कशी करता येईल? लोखंडाचे सोने झाले तर ते पुन्हा लोखंड कसे करता येईल? काळिमा येणार नाही का? त्याप्रमाणे एकदा भगवंताला प्राप्त झाला की त्याला वेगळे करता येणार नाही. देव आणि भक्त एकच झाला तो विभक्त होत नाही. देव आणि भक्त हे दोन्ही एक आहे घडवून आणले तोच साधू; तोच जणांमध्ये मोक्षदायक जाणावा. आता हे बोलणे असू द्यावे. भक्ताच्या रूपात देव पहावा. त्यामुळे त्याचं ऐश्वर्य तात्काळ अंगामध्ये येते. देहाचे बनून राहिले तर देहाचे दुःख भोगावे लागते. देहातीत झाले तर परब्रम्ह होता येते. देहातीत होण्याची लक्षणे कोणती? ब्रह्म पावणे कसे असते? ऐश्वर्याची लक्षणे कोणती? असा प्रश्न श्रोत्यांनी विचारला. त्याचे उत्तर मी सांगतो. लक्ष देवून ऐकावे.
देहातीत वस्तू म्हणजे परब्रम्ह ते तू पहा. विदेही असल्याने तुला देहाचा संग योग्य नाही. ज्याची अशी बुद्धी होते त्याचे वेद वर्णन करतात. नानाशास्त्रांना शोध घेतल्यावरही ते सापडत नाही. असं ऐश्वर्य देहबुद्धी सोडल्यानंतरच प्राप्त होतं. मी देह असं म्हटलं तर अधोगती होते. म्हणून साधुसंतांचे वचन अप्रमाण मानू नये, खोटे मानल्यास दोष लागतो. साधूचे वचन विश्वासपूर्वक का धारण करावे? ते एकवेळ मला सांगा. यावर वक्ता म्हणतो, स्वानंदघन सोहम आत्मा अजन्मा असून तो तूच आहेस हे जाण! हे साधूचे वचन सुदृढ धरावे. यातील गुप्त अर्थ म्हणजे तूच ब्रह्म आहेस. निरंतर ब्रम्ह आहेस या वचनाचा विसर पडू देऊ नकोस. देहाचा अंत होईल, मग मी अनंत होईल असं बोलणं मानू नये. मूर्ख लोक तसं म्हणतात. कल्पांत झाल्यावर मायेचा नाश होईल मग आम्हाला ब्रह्म प्राप्त होईल तोवर होणार नाही, मायेचा कल्पांत होईल अथवा देहाचा अंत होईल तेव्हा मी निवांतपणे परब्रह्म होईन, हे बोलणे अयोग्य आहे. त्यामुळे समाधान होणार नाही. समाधानाचे लक्षण वेगळेच आहे.
सर्व सैन्य मारावे मग राज्यपद प्राप्त व्हावे? की सैन्य असतानाच राज्य करावे हे समजत नाही! माया असली तरी नाहीये, देह असला तरी विदेही आहे यातच समाधान आहे हे ओळखावे. तेव्हा राज्यपद हातात आले आहे मग परिवाराने काय केलं? परिवाराकडे पाहताना राज्य गेले हे तर घडत नाही. आत्मज्ञान प्राप्त झाल्यावर दृश्य देहभान दृष्टीस पडले तरी समाधान जाणार नाही. रस्त्यामध्ये सापाच्या आकाराची मुळी पडलेली असते ती पाहिल्यावर भीती वाटते मात्र ती मुळी असल्याचे लक्षात आलं की कशाला मारायचे? तशी मायिक विचार केल्यावर माया भयानक दिसते मग तिथे धाक कशासाठी धरायचा? मृगजळाचे पूर पाहून तो कसा पार करता येईल असं वाटतं पण ते मृगजळ असल्याचे लक्षात आल्यानंतर साकडे पडत नाही.
भयानक स्वप्न पाहिल्यानंतर खूप भीती वाटते पण जागे झाल्यावर मग कशासाठी साशंक व्हायचं? माया कल्पनेमध्ये दिसते, आपण कल्पनातीत असतो मग निर्विक्ल्पाच्या ठायी उद्वेग कशासाठी? शेवटच्या क्षणी जशी मती असेल तीच गती मिळते असं सर्वत्र बोललं जातं पण तुझ्या मी पणाचा अंत झाल्यावर सहजच तुझी प्राप्ती होईल! चारी देहादी दृश्य प्रपंचाचा अंत झाल्यावर मूळ मायेचाही अंत होईल. कारण आत्मा हा अंत आणि प्रांतापासून अलिप्त आहे. ज्याला हे असं समजतं त्याला ज्ञानाने आत्मगती प्राप्त होते गती आणि अवनती याच्यापासून तो वेगळाच आहे. असं समर्थ सांगत आहेत. पुढील कथा ऐकूया पुढील भागात.
जय जय रघुवीर समर्थ.
पद्माकर देशपांडे
(निरूपणकार पत्रकार / लेखक)
मोबा. 9420695127