जय जय रघुवीर समर्थ. चारही भूतांना नाश आहे. आकाश आकाश कसे नष्ट होईल? आकाशाला रंग आणि दृश्यत्व हे विकार दिसत नाहीत. आकाश अचळ दिसते त्याच्यामध्ये नष्ट होणारे काय आहे? असे विचारले जातं. आमच्या मते आकाश शाश्वत आहे. असा प्रश्न श्रोत्यांनी विचारला. त्यावर वक्ता बोलतो आहे. आकाशाचे लक्षण ऐका. आकाश हे तमापासून झालेले आहे म्हणून त्याला काम क्रोधाने वेष्टन घातले आहे.
अज्ञान आणि शून्यत्व हे त्याचे दुसरे नाव आहे. अज्ञानामुळे काम, क्रोध, मोह, भय आणि शोक असे तयार होतात. आकाशाच्या गुणांमुळे अज्ञान निर्माण होते. नास्तिकता, नकारवचन हे शून्याचे लक्षण आहे. त्याला हृदयशुन्य असे अज्ञानी प्राणी म्हणतात. आकाश हेच स्तब्धपणाने शून्य असते. शून्य म्हणजे अज्ञान म्हणजे कठीण असे त्याचे रूप आहे. कठीण, शून्य म्हणजे विकार असलेले त्याला संत कसे म्हणायचे? मनाला स्वरूपासारख ते वाटतं पण ही वरवर पाहण्याची दृष्टी आहे. त्याच्यामध्ये अज्ञान मिसळले असल्यामुळे ज्ञानाचा नाश होतो म्हणून आकाशाला नाश आहे. आकाश आणि स्वरूप एकरूप वाटलं तरी दोन्ही मध्ये शून्यत्वाचा फरक आहे. आकाश एक कल्पना आहे. ती खरी असल्यासारखी वाटते पण आकाश आणि स्वरूप याच्यामध्ये भेद आहे. उन्मनी आणि सुशुप्ती अवस्था ही तत्त्वतः सारखीच वाटते परंतु अधिक विचार केला असता त्याच्यामध्ये भेद लक्षात येतो.
खोटं खऱ्यासारखं दाखवतात पण तरीसुद्धा जे जाणकार असतात तेथे खोटे आणि खरे ओळखतात, मृग मृगजळाला भुलतात तसे ते भुलत नाहीत. अशा प्रकारचा हा दृष्टांत आहे हा माहिती होण्यासाठी दिला. तात्पर्य म्हणजे भूत आणि अनंत हे एक नाहीत. आकाशाचे वेगळेपण पहावं आणि स्वरूप जे आहे ते जाणण्यासाठी स्वरूप व्हावं लागत. वस्तूचे जे पाहणे असेच असते. अशा तऱ्हेने आकाशासंदर्भातली शंका होती ती फिटली. संदेह दूर झाला आणि नव्याने स्वरूपाची स्थिती अनुभवली. आकाश हे अनुभवला येते पण स्वरूप अनुभवाच्या ही पलीकडचे आहे म्हणून आकाश आणि स्वरूपाच्या मध्ये साम्य नाही. राजहंस दूध आणि पाणी याच्यातून दूधच निवडतात त्याप्रमाणे स्वरूप आणि आकाश याच्यातील भेद संत जाणतात. अशा तऱ्हेने मायेचे हे सगळे खेळ संताच्या सहवासामधूनच तुम्हाला जाणता येतील, आणि संतांच्या सहवासामुळेच तुम्हाला मोक्षाची पदवी मिळू शकेल. असं समर्थ सांगत आहेत. इतिश्री दासबोधे गुरु शिष्य संवादे स्थूलपंच महाभूते स्वरूपाकाश भेदो नाम समास पंचम समाप्त. जय जय रघुवीर समर्थ.
दशक आठ समास 6 श्रीराम दुश्चित निरूपण नाम समास
श्रीराम. श्रोता वक्त्याला विनंती करतो, सत्संगाचा महिमा कसा असतो? मोक्ष हा किती दिवसांमध्ये मिळतो ते मला सांगा. साधूची संगत धरल्यावर किती दिवसांमध्ये मुक्ती होते ही माहिती कृपामूर्ती माझ्या मला गरिबाला द्यावी. यावर वक्ता सांगत आहे, निरुपणावर विश्वास ठेवल्यास मुक्ती ताबडतोब मिळते. भांबावलेपण किंवा अनिश्चितपणा असेल तर त्याच्यामुळे हानी होते. एका ठिकाणी एकाग्र झालेले मन अचानक दुसरीकडे वळते, मग काहीही करून त्याला पुन्हा ठिकाणावरती आणायला पाहिजे. मनाची जी ओढ आहे ती बाजूला सारून आवडीने श्रवण करण्यासाठी बसावे. सावधपणाने घडीभर बसून काळ सार्थक करावा.
अर्थ आणि प्रमेय हे ग्रंथामध्ये कुठे आहे ते शोधून त्याचा विचार करावा, नीट समजावून घ्यावे. थोडसं चित्त विचलित झालं तरी पुन्हा ऐकावं, ते त्याचा अर्थ नीट पहावा. अर्थ पाहिल्याशिवाय तो उगीच ऐकतो तो श्रोता नसून मनुष्य वेशातील दगड आहे! असा श्रोते त्याला शीण मांडतील, आम्हाला पाषाण केलं म्हणतील, तर मग पाषाणचे लक्षण ऐका. वाकडातिकडा असलेला पाषाण फोडला, तो घडवून नीट केला तरी दुसऱ्या वेळी पाहिलं तरी तो तसाच असतो. त्याची खपली टाकीने फोडली ती पुन्हा जोडता येत नाही. माणसाची जी वाईट बुद्धी असली तरी ती नीट करता येते. पण दगडाला नीट करता येत नाही. अवगुण सांगून गेला पण पुन्हा जडला म्हणून तो पाषाणापेक्षा उणा. त्याच्यापेक्षा दगड कोटी गुणांनी चांगला.ते कसे ते श्रोत्यांनी सावध होऊन ऐकावं, असं समर्थ सांगत आहेत. हा भाग इथे समाप्त झाला असून पुढील कथा ऐकूया पुढील भागात.
जय जय रघुवीर समर्थ.
पद्माकर देशपांडे
(निरूपणकार पत्रकार / लेखक)
मोबा. 9420695127