पाण्याशिवाय आवश्यक असलेले वेगवेगळे तेल, तुपासारखे आणखीही काही जे रस आहेत त्यालाही आप म्हणतात. ते ओलसर, मृदू, शीतल असतात आणि गार असतात. पाण्यासारखे पातळ असतात. रेत, रक्त, मूत्र, लाळ यांनादेखील आप म्हणतात. पातळ, मृदू ,गुळगुळीत, घाम कफ पडसे अश्रू हे सगळे आप आहे. आता तेजाची माहिती ऐका. चंद्र, सूर्य, तारांगणे, दिव्य सतेज देह त्याला तेज म्हणायचं.
अग्नि, मेघातून प्रगट होणारी वीज, सृष्टीचा संहार करणारा वन्ही, सागराला जाळणारा वडवानळ त्याला तेज म्हणतात. शंकराच्या डोळ्यातील अग्नी, भुकेचा अग्नि, काळाची भूक, पृथ्वीच्या वातावरणातील तेजाचे तत्व असं जे जे काही प्रकाशाचे रूप आहे त्याला तेजाचे स्वरूप जाणावे. शोषण करणारे, उष्ण असे तेज असते. वायू चंचल असतो, वायू चेतनामय असतो. बोलणे, चालणे हे सगळे वायूमुळे शक्य होतं. हलतो डोलतो त्याला पवन म्हणतात. पवनाशिवाय काही चालत नाही सृष्टीच्या चलनवलनासाठी वायू कारण असतो. चलनवलन आणि प्रसारण, आकुंचन, निरोध हे सगळं वायू घडवून आणतो. प्राण, अपान, व्यान, उदान, आणि समान, नाग, देवदत्त, धनंजय, जितके काही प्राण आहेत ते वायूचं लक्षण आहे. चंद्र, सूर्य, तारांगण या सगळ्यांचा धर्ता वायु आहे.
आकाश हे पोकळ असते. आकाश निर्मळ आणि निश्चळ असते. आकाशरूप म्हणजे पोकळी. आकाश सर्वांसाठी व्यापक आहे. आकाश एकमेव आहे. आकाशामध्ये चारही भुतांचे कौतुक सामावले आहे. आकाशासारखे श्रेष्ठ कोणी नाही, आकाशासारखे थोर कोणी नाही. त्याचा विस्तार स्वरूपासारखा आहे. तेव्हा शिष्यांनी प्रश्न विचारला, दोघांचे रूप सारखच आहे तर मग आकाशाला स्वरूप का म्हणू नये? आकाश आणि स्वरूप तर सारखेच दिसतात. त्यांच्यात काय भेद आहे? आकाश वस्तू स्वतःसिद्ध का म्हणू नये? वस्तू ही अचळ,अढळ असते, वस्तू निर्मळ, निश्चळ असते. तसे आकाश हे वस्तू सारखं आहे. ते ऐकून वक्ता म्हणतो वस्तू ही निर्गुण, पुरातन आहे. आकाशामध्ये सप्त गुण असल्याचे शास्त्रात सांगितले आहे. काम, क्रोध, शोक, मोह, भय, अज्ञान, शून्यत्त्व असा आकाशाचा सप्तविध स्वभाव आहे. हे त्यात गुण आहेत असं शास्त्रांमध्ये सांगितले म्हणून आकाश हे भूत मानायचे. त्याला कोणतीही उपमा देता येत नाही.
काचेची जमीन आणि पाणी हे सारखंच वाटतं, पण एक काच आणि एक पाणी असे शहाणे लोक जाणतात. कापसामध्ये स्फटिक पडला तो कापसासारखाच दिसतो, पण स्फटिकामुळे कपाळमोक्ष होतो, कापसामुळे होत नाही. तांदळामध्ये पांढरे खडे तांदळासारखेच दिसतात चावायला गेले तर दात पडायला लागतात. चुना, वाळू आणि ताग यांच्या मिश्रणामध्ये खडा असतो त्या सारखाच दिसतो पण शोधल्यावर मग कठीण असल्याने तो वेगळा पडतो. गुळ दगड गुळासारखा दिसतो पण तो कठीण असतो. तो तोडता येत नाही. नागकांडी आणि वेखंड एक म्हणू नये. सोने आणि सोनपितळ एकच वाटतं पण जाळ लावला की पितळ काळे पडते. अशा प्रकारचे हीन दृष्टांत आहेत. आकाश म्हणजे केवळ भूत. ते भूत आणि अनंत एक कसे असेल? अनंत वस्तूला रंग नाही तर आकाशाला शाम वर्ण आहे. दोन्ही मध्ये साम्य कसा असेल? श्रोते म्हणतात आकाशाला कुठे रुप आहे आकाश तर मुळातच अरूप आहे. आकाश वस्तूमध्ये भेद नाही. असे श्रोते विचारत आहेत, त्याचे उत्तर पुढच्या भागांमध्ये समर्थ देत आहेत.
जय जय रघुवीर समर्थ.
– पद्माकर देशपांडे
(निरूपणकार पत्रकार / लेखक)
मोबा. 9420695127