जय जय रघुवीर समर्थ. आत्म्याला शरीराच्या योगाने उद्वेग, चिंता करावी लागते. शरीराच्या योगाने आत्मा जगतो हे तर स्पष्टच आहे. देहाने अन्न खाल्ले नाही तर आत्मा कदापि जगणार नाही. तर आत्म्याशिवाय देहाला चेतना नाही. एकामुळे दुसऱ्याचे अस्तित्व आहे. यापैकी कोणी एक नसेल तर कार्य चालणार नाही. देहाला चेतना नाही आणि आत्म्याला पदार्थ उचलता येणार नाही. स्वप्नाच्या भोजनामुळे पोट भरत नाही. आत्मा स्वप्नावस्थेत जातो आणि देहामध्येपण असतो आणि अर्धवट झोपेत खाजवतो देखील.. चमत्कार बघा!
अन्न रसामुळे शरीर वाढतं. शरीर वाढीबरोबर विचार वाढतात. वृद्धपणी दोन्ही क्षीण होतात. उन्मत्त द्रव्य देह खातो. देहाच्या योगामुळे आत्मा भुलतो. विस्मरणामुळे शुद्धता सोडतो. देहाने विष घेतलं तर आत्मा सावकाश जातो. वाढणं मोडणं आत्म्याला आहे. वाढणं, मोडणं, येणं, जाणं, सुखदुःख देहामुळे नाना प्रकारे आत्म्यास भोगावे लागतं. वारूळ पोकळ असते,तो मुंग्यांचा मार्ग.. त्याप्रमाणे शरीर पोकळ जाणावे. शरीरामध्ये नाड्यांचा गुंता आहे. नाड्यामध्ये पोकळ वाटा आहेत. लहान थोर सर्व नाड्या भरलेल्या आहेत. शरीरामध्ये प्राणी अन्न, पाणी वगैरे घेतो त्याचा अन्नरस होतो. त्याला श्वासोच्छवासातून मिळणारा वायू गती देतो. नाडीद्वारे पाणी वाहते, पाण्याबरोबर वारा खेळतो. त्या वाऱ्याबरोबर आत्माही सगळीकडे वावरतो. तहानेने शरीर त्रासले, हा विचार आत्म्याला कळतो. मग शरीर उठवून पाण्याकडे तो नेतो. पाणी हा शब्द बोलतो, मार्ग पाहून शरीर चालवतो. संपूर्ण शरीर प्रसंगानुसार हलवतो. भूक लागली, असे जाणतो, मग देहाला उठवतो, याला त्याला अचावाचा बोलवतो.
बायकात म्हणे देह झाले झाले, देह सोवळे करून आणले. पायात भरून भर भर चालू लागला. त्याला पानावर बसवले, डोळ्यांनी भरलेले पात्र पाहिले, हाताने आपोशन घेतले, हातात घास घेऊन तो तोंडाकडे नेऊन तोंड पसरून दाताकरवी चावून नीट नेटाने जेवण करू लागतो. केस, काडी, खडा त्याला सापडतो ते त्याला समजते मग तो तत्काळ थुंकतो. आळणी वाटले तर मीठ मागतो, बायकोला आगे कागे म्हणतो.. डोळे ताणून रागाने पाहतो. गोड लागले तर आनंद होतो, गोड नसले तर वाईट वाटते. वाकडी गोष्ट असेल तर आत्म्याला त्रास होतो. नाना प्रकारच्या अन्नाची गोडी त्याला वाटते. नाना रसांचा स्वाद निवडतो. तिखट लागल तर मस्तक झाडतो आणि खोकतो. मिरपूड जास्त घातली असे सांगतो. बायकोवर खापर फोडतो आणि कठीण बोलून बायकोवर राग काढतो. भरपूर जेवण केलं लगेच तांब्या उचलला आणि घटघटा पाणी पिऊ लागला. सुखदुःखाचा भोक्ता देह आहे. एक आत्मा हाच पाहणारा आहे.
आत्म्याशिवाय देह वृथा म्हणजे मढे आहे. मनाच्या अनंत वृत्ती जाणणे हीच आत्मस्थिती आहे. त्रैलोक्यमध्ये जितके व्यक्ती असतील तितक्यात आत्मा आहे. जगामध्ये जगदात्मा, विश्वामध्ये विश्वात्मा, सगळं सर्वात्मा नाना रूपांनी चालवितो. तो हुंगतो, चाखतो, ऐकतो, पाहतो, मृदु, कठीण ओळखतो, शीत उष्ण त्याला ठाऊक असते, सावधपणे अनेक उठाठेवी करतो. अशा धुर्तांची परीक्षा धूर्तच करतात. अशी माहिती समर्थ देत आहेत. अधिक माहिती ऐकू या पुढील भागात.
जय जय रघुवीर समर्थ.
पद्माकर देशपांडे
(निरूपणकार पत्रकार / लेखक)
मोबा. 9420695127