जय जय रघुवीर समर्थ. नाना लोक नाना स्थाने, चंद्र सूर्य तारांगणे सप्त द्वीप चौदा भुवने अलिकडे आहेत. शेष, कूर्म, सप्तपाताळ. एकवीस स्वर्ग, अष्टदिक्पाल. तेहतीस कोटी देव. बारा आदित्य, अकरा रुद्र, नऊ नाग, सप्तऋषि, नाना देवांचे अवतार आहेत. मेघ, मनु, चक्रवर्ती, नाना जीवांची उत्पत्ती आता किती विस्तार सांगू? सगळ्या विस्ताराचे मूळ केवळ मूळमायाच आहे. मागे पंचभौतिक सांगितली पण सूक्ष्म तत्त्वे म्हणतात ती देखील जडत्वास आलेली आहेत. त्याची माहिती पुढल्या समासात देणार आहे. पंचभूते ही वेगवेगळी सांगतो. ती श्रोत्यांनी श्रवण करावी.
पंचभौतिक ब्रह्मगोल, ज्याला समजतो त्याला दृश्य सोडून केवळ वस्तूच मिळते. महाद्वार ओलांडावे, मग देवदर्शन घ्यावे त्याप्रमाणे हे दृश्य सोडून द्यावे. दृश्याच्या पोटी पंचभुतांची दाटी झालेली आहे. अशाप्रकारे दृश्य पंच भुतांची मिठी पडलेली आहे. या पंचभुतांचेच दृश्य, ही सृष्टी सावकाश रचली गेली आहे, ती माहिती श्रोत्यांनी श्रवण करावी. इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे सूक्ष्म पंचभूते निरूपण नाम समास चतुर्थ समाप्त. जय जय रघुवीर समर्थ.
दशक 8 समास 5 स्थूलपंचभूत स्वरूप नाम समास
जय जय रघुवीर समर्थ. केवळ मुखाना माहिती नाहीत म्हणून पंच भूतांची लक्षणे विशद करून सांगावी लागत आहेत. पंच भूतांचा चिखल झाला, तो वेगळा करणे कठीण आहे, परंतु करीत आहे. पर्वत, पाषाण, शिळा, शिखरे, लहान थोर नानावर्ण, दगड गोटे म्हणजे पृथ्वी. नाना रंगांची माती, विविध ठिकाणी असलेली वाळवंटे मिळून पृथ्वी होते. त्याच्यामध्ये पुरे, नगरे, शहरे, नाना मंदिरे, रत्नखचित गोपुरे, नाना देवालये, शिखरे येतात. सप्त द्वीप, नऊ खंड अशी ही वसुंधरा आहे. नाना देव, नाना राजे, नाना भाषा, नाना रीती रिवाज, ८४ लक्ष जीवयोनी मिळून ही पृथ्वी बनली आहे. नाना राने, नाना झाडांची नाना वने, गिरीकंदरे, नाना स्थाने मिळून पृथ्वी बनली आहे. देवानेही केलेली नाना रचना आणि मानवाने निर्माण केलेली रचना मिळून जे आहे त्याला पृथ्वी म्हणतात हे श्रोत्यांनी जाणावे.
सुवर्णादिक नाना धातू, नाना रत्ने,नाना काष्ठ, वृक्ष हे सगळे मिळून पृथ्वी म्हटले जाते. याच्यामध्ये जड आणि कठीण गोष्टी आहेत त्यालाच पृथ्वी मानलं पाहिजे. पृथ्वीचे रूप वर्णन केले. आता द्रव पदार्थांचे रूप सांगतो. ते कसं आहे ते श्रोत्यांनी ऐकावं. तलाव, सरोवर, आड, विहीर, नद्या यांचे पाणी, मेघ आणि सप्तसागर मिळून तयार होणारे पाणी, क्षार समुद्र सगळ्या लोकांच्या दृष्टीने दिसतो. तिथे मीठ तयार होते तो क्षारसिंधू होय. एक दुधाचा सागर त्याचं नाव एक क्षीरसागर तो देवाने उपमन्यूला दिलेला होता.
एक मधाचा सागर, एक तुपाचा सागर, एक दह्याचा सागर आहे. एक उसाच्या रसाचा सागर आहे, एक शुद्ध पाण्याचा सागर आहे. अशा सात समुद्रांचा पृथ्वीला वेढा पडलेला आहे. या भूमंडळातील सर्व मिळून आहे त्याला आप असे जाणावे. पृथ्वीच्या गर्भामध्ये, पृथ्वीच्या तळाला आणि वातावरणामध्ये या तिन्ही ठिकाणी पाणी असतं त्याला आप म्हणतात. नाना वेली असतात, नाना प्रकारच्या झाडाझुडपांचे रस, मध, पारा, अमृत, विष हे सगळे मिळून त्याला आप म्हणजे द्रव पदार्थ म्हणतात. अशी पंचमहाभूतांची मनोरंजक माहिती समर्थ रामदास स्वामी महाराज देत आहेत. पुढील माहिती ऐकू या पुढील कथेमध्ये.
जय जय रघुवीर समर्थ.
पद्माकर देशपांडे
(निरूपणकार पत्रकार / लेखक)
मोबा. 9420695127