ज्याला विद्या नाही तो करंटा, विद्या असेल तो भाग्यवान हे तर लोकांत पाहिले तर प्रत्यक्षच दिसते. आपली विद्या शिकली नाही तर काही भीक मागणार का? असं सर्वत्र वडील आपल्या मुलांना सांगतात असं आपण ऐकत असतो. कधी कधी वडील भाऊ करंटा निघतो आणि धाकटा भाऊ समर्थ होतो का कारण विद्येने तो मोठा असतो म्हणून. विद्या नाही, बुद्धी नाही, विवेक नाही, साक्षेप नाही, कौशल्य नाही व्याप नाही म्हणून प्राणी करंटा. हे सगळे जिथे असते तिथे वैभवात काही कमी पडत नाही. वैभव नाहीसे झाले की दुर्दैव पाठीशी लागते.
एखाद्या ठिकाणी वडील समर्थ तर धाकटा भिकारी असे आढळते, कारण वडिलांसारखां व्याप वाढवता आला नाही म्हणून ते होतं. जशी विद्या तशी त्याची मजल. जसा व्याप तसं वैभव. सामर्थ्यानुसार लोक वर्तन करतात. विद्या नसेल, वैभव नसेल तिथे निर्मळपणा कसा असेल? करंटेपणामुळे वाईट, गलिच्छ आणि विकारीपणा मागे लागतो. पशुपक्षी गुणवंत असले तरी त्याच्यावरती समर्थ लोक कृपा करतात पण गुण नसताना प्राणिमात्रांचे जीवन व्यर्थ आहे. गुण नाही, गौरव नाही, सामर्थ्य नाही, महत्त्व नाही, कुशलता नाही, तर्क नाही, त्यामुळे उत्तम गुण हे भाग्याचे लक्षण असते. लक्षण चांगलं नसेल तर अवलक्षण होते. लोकांमध्ये जो जाणकार आहे त्याला मान्यता आहे. काही वेगळ्या प्रकारची विद्या असेल तर त्याला महत्त्व मिळते. प्रपंच आणि परमार्थ यामध्ये जाणता तोच समर्थ! ज्याला जाणता येत नाही त्याचं जीवन व्यर्थ, निष्कारण आहे. नेणत्या माणसाला विंचू, साप चावतो, नेणत्या माणसाच्या जिवाचा घात होतो. काहीतरी होऊन नेणत्या माणसाचं काम अयशस्वी होत. नेणता प्राणी फसतो, नेणतेपणामुळे त्याला वेगवेगळे त्रास होतात, ठकवलं जात, कधी काही विसरतो. नेणत्याचे वैरी जिंकतात, नेणत्याला अपाय करतात आणि त्याचा संहार घडतो, जीवाचा नाश होतो. आपले स्वहित लोकांना कळत नाही त्यामुळे यातना भोगाव्या लागतात.
ज्ञानाला अज्ञानाने घेरले जाते त्यामुळे अधोगती होते. मायाब्रह्म जीवशिव सारासार भावाभाव जाणल्याने जन्म मरण सोपे होते. कोण कर्ता आहे, बंधन आणि मोक्ष कोणाला आहे याबाबत निश्चय केला तर प्राण्याची सुटका होते. देव निर्गुण आहे हे जाणावे, मी कोण आहे हे जाणावे, अनन्य लक्षण जाणावे म्हणजे मुक्त व्हाल. जितके जाणून सोडले तितके दृश्य ओलांडले, मी पणाचे बंधन तुटून गेले. न जाणता कोट्यवधी जन्मसाधन केली तरी तो मोक्षाचा अधिकारी होणार नाही. माया-ब्रह्म ओळखावे, आपल्याला आपण जाणावे, इतके केले की जन्म चुकेल.
समर्थांचे मन जाणून प्रसंगाला सामोरे गेले तर भाग्यवैभव तुम्हाला बघायला मिळेल. म्हणून जाणणे हे काही सामान्य नाही, जाणकार सर्वमान्य असतो. काहीही माहिती नसेल तर त्याचे कोणी ऐकत नाहीत. ज्ञान पाहून भूत पळून जातात, नेणत्याला पछाडतात. व्यर्थ उठाठेवी खोट्या आहेत हे जाणणारे जाणतात. जाणत्याला मर्म समजते, नेणत्याचे कर्म खोटे. सगळे धर्मअधर्म जाणत्याला समजतात. नेणत्याला यमयातना भोगाव्या लागतात, जाणत्याला काही त्रास होत नाही हे सगळं जाणून योजना करतो तो मुक्त होतो. राजकारण जाणले नाही तर अपमान करून प्राण घेतात, वर्तमान जाणले नाही तर कठीण काळ येतो. म्हणून अज्ञान खोटे, अज्ञानी प्राणी करंटे. जाणले आणि त्याचे विवरण केले तर जन्म मरण दूर राहते, म्हणून दुर्लक्ष करू नये. जाणणे हाच उपाय, जाणून घेतल्यावर परलोकाची सोय सापडते. असं समर्थ सांगत आहेत. पुढील कथा ऐकूया पुढील भागात.
जय जय रघुवीर समर्थ.
-पद्माकर देशपांडे
(निरूपणकार पत्रकार / लेखक)
मोबा. 9420695127