जय जय रघुवीर समर्थ. धान्य भरपूर मोजलं पण त्या प्रमाणात ते भक्षण केले नाही त्या प्रमाणे लोकांकडून मनन केले जात नाही. पाठांतर म्हटलं तर भरपूर आहे पण अर्थ काय विचारला तर काही समजत नाही. अनुभव विचारला तर अंदाजपंचे काहीतरी सांगतात. शब्दरूपी रत्ने असतात त्यांची परीक्षा घेऊन त्याचा अनुभव घेऊन पहावा नाहीतर मग ते टाकून द्यावे. नाव रूप सगळं सोडावं आणि अनुभव मांडावा. सार आणि असार एकच मानायचं हा मूर्खपणा आहे. कुलकर्ण्याने कुळाला म्हणजे निरक्षर शेतकऱ्याला समजवावे. उगीचच वाचायच आणि दृष्टांत काही समजत नाही असं नको. जिथे काही समजत नाही तिथे काहीतरी सांगतो आणि विचारल्यावरती वक्ता वसवस करतो. नाना शब्द एकत्र केले, प्रचिती नसताना उपाय केले पण ते आणीबाणीच्या वेळेस वाया गेले. जातं घाईघाईने ओढलं आणि धान्य टाकत गेला त्याच्यामध्ये पीठ काही बारीक होत नाही. घासामागे घास घातला, चावायला अवकाश ठेवला नाही. सगळं बोकणा भरला तर पुढे काय होईल? सभेतल्या हिशेबी कारभाराचे लक्षण म्हणजे एक क्षण देखील वाया जाऊ देत नाही.
सगळ्यांचं अंतकरण सांभाळत जायचं. सूक्ष्म नावं सुखाने घ्यावी. तितकी रूप ओळखायची. ओळखून श्रोत्यांना समजावून सांगायची. समस्यापूर्ती करायची म्हणजे श्रोते आनंदीत होतात आणि क्षणक्षणाला गोसाव्याला वंदन करतात. समस्या सुटली तर वंदन करतात समस्यापूर्ती झाली नाही तर निंदा करतात. मग गोसाव्याने चिडचिड कशासाठी करायची? शुद्ध सोनं पाहून घ्यावं, कस लावून त्याची परीक्षा घ्यावी त्याची त्याप्रमाणे श्रवणमनन हे प्रत्यय घेऊन पाहावं. वैद्याची प्रचिती येत नसेल व्यथा दूर होत नसेल तर त्याने लोकांवर कशासाठी रागवायचे? खोटे कुठेच चालत नाही खोटे कोणाला आवडत नाही म्हणून खरं असेल, अनुभव असेल तो घ्यावा. लिहिणे येत नसताना व्यापार केला. काही दिवस चालला. पण जेव्हा हिशेब तपासनीस भेटला तेव्हा तो खोटा पडला. माहिती, अनुभवाने, साक्षीने बोलावं. तसं नसेल तर तपासनीसाने काय करायचे सांगा? स्वतः आपणच गुंता करायचा तर मग दुसऱ्याला काय समजावणार? माहिती नसेल तर कष्ट होतील. बळ नसताना युद्धावर गेला तर तो पराभूत होईल मग त्यांनी कोणाला दोष द्यायचा? अनुभव नसताना जी उत्तरे दिली जातात फोलपट समजावी.
शिकवल्यावर राग येतो पण पुढे अद्दल घडते. खोटा असतो तो लोकांमध्ये उघडा पडतो. खर सोडून खोटं घ्यायचं म्हणजे फजितीला पारावर राहत नाही.. नारायणाने त्रिभूवनात काय न्याय केला! तो न्याय सोडला तर सगळे जगच पाठीमागे लागले! भांडून भांडून किती शोभा करून घ्यायची? अन्याय अनेकांनी मान्य केले पाहिले नाही आणि ऐकले नाही. ते वेड्यासारखं होईल. असत्य म्हणजे पाप. सत्य हे स्वरूप. दोन्हीमध्ये काय निवडायचे ते निवडा. मायेमध्ये बोलणं चालणं, शब्द माया नसताना कसलं बोलणं? म्हणून निशब्दाचे मूळ शोधावं. वाच्च्यांश जाणून घेऊन सोडावा. लक्षांश विचारपूर्वक घ्यावा. निशब्द जे मूळ परब्रम्ह त्याच्याबद्दल काही घोटाळा होत नाही. अष्टधा प्रकृती हा पूर्वपक्ष आहे. तो सोडून अलक्षाकडे लक्ष लावावे. मनन करणारा आणि परमदक्ष असेल तोच हे करू शकतो. नाना कोंडा आणि कण हे एकच मानायचे हे चुकीचे आहे. रस आणि चोयट्या कोणत्या हे शहाणा मनुष्य ओळखतो. पिंडामध्ये नित्यानित्य विवेक, ब्रम्हांडामध्ये सारासार अनेक, हे सगळे शोधून सार आहे ते घ्यायचं. मायेकरता अन्वय आणि संहारणी आहे. माया नसताना विवेक कसा करायचा.. तत्त्वाने तत्व शोधावं महा वाक्यामध्ये प्रवेश करावा, आत्मनिवेदन करून समाधान प्राप्त करावं, असं समर्थ सांगत आहेत. इतिश्री दासबोधे गुरु शिष्य संवादे करंट परीक्षा निरूपण नाम समास पंचम समाप्त.
जय जय रघुवीर समर्थ.
पद्माकर देशपांडे
(निरूपणकार पत्रकार / लेखक)
मोबा. 9420695127