जय जय रघुवीर समर्थ. देह आहे म्हणून अवतारी आहेत. देह आहे म्हणून वेशधारी आहेत. नाना बंड पाखंडपणा देह आहे म्हणून आहे. देह आहे म्हणून विषयभोग आहेत. देह आहे म्हणून सगळे त्याग आहेत. देह आहे म्हणून नाना रोग होतात –जातात. देह आहे म्हणून नवविधा भक्ती आहे. देह आहे म्हणून चतुर्विध मुक्ती आहे. देह आहे म्हणून नाना युक्ती नाना मत आहेत. देह आहे म्हणून दानधर्म आहे. देह आहे म्हणून नाना गुपिते आहेत. देह आहे म्हणून पूर्व कर्म आहे असं लोक म्हणतात. देह आहे म्हणून नाना स्वार्थ आहेत. देह आहे म्हणून नाना अर्थ आहेत. देह नसेल तर सगळं व्यर्थ आणि देह असेल तर धन्य आहे. देह आहे म्हणून नाना कला आहेत. देह आहे म्हणून कमी जास्त आहे. देह आहे म्हणून भक्तिमार्गाचा जिव्हाळा आहे. सन्मार्गाची नाना साधन देहासाठी आहेत, त्याच्यामुळेच बंधन तुटतात.
देहामुळे आत्मनिवेदनाद्वारे मोक्ष लाभतो. देह सगळ्यांमध्ये उत्तम आहे. देहामध्ये आत्माराम राहतो. सगळ्यांमध्ये हा पुरुषोत्तम असल्याचे विवेकी लोक जाणतात. देह आहे म्हणून कीर्ती आहे, देह आहे म्हणून अपकीर्ती आहे. देह आहे म्हणून अवतार मालिका होऊन जातात. देह आहे म्हणून नाना भ्रम आहेत. देह आहे म्हणून नाना संभ्रम आहेत. देह आहे म्हणून उत्तम उत्तम पद भोगतात. देह आहे म्हणून सगळं काही आहे. देह नसला तर काहीच नाही. आत्मा गाठायचा तिथेच राहील. देह हे परलोकीचे तारू आहे. नाना गुणांचा सागर आहे. नाना रत्नांचा विचार देहामुळेच आहे. देहामुळे गायन कला आहे, देहामुळे संगीतकला आहे, देहामुळे मनातील भावना दृष्टीस पडते. पंचभौतिक ब्रम्हांडाच्या अंशरूपाने पिंड तयार होतो म्हणून ब्रह्मांडरुपी वृक्षाचे देह हे फळ होय. देहा हा केवळ दुर्लभ आहे. मग या देवाला समजून घ्या. देहासाठी लहान थोर आपले व्यापार करतात. त्यामध्ये किती एक आहेत जे जे देह धरून आले तेथे काहीतरी करून गेले.
हरी भजन करून किती एक जण पावन झाले. अष्टधा प्रकृतीचा मूळ संकल्प देहरूप घेऊन आले आहे. हरी संकल्प हा मूळ असेल तर आपल्या देहातही तोच मूळचा मीपणाचा संकल्प अंशरूपाने आहे. अनेक देह पाहिल्यानंतर आतमध्ये पाहिल्यानंतर मग हे तत्व समजते. हरीचा संकल्प मुळात होता तोच फळात पहावा. वेलाचे मूळ बिजामध्ये असते, उदक हे वेलीचे रूप आहे. पुढे फळांमध्ये बीज येतं आणि मुळाचा अंश त्याच्यामध्ये येतो. मुळामुळे फळ येत. फळामुळे मूळ होतं. त्याप्रमाणे हे भूमंडळ होत जातं. असो काही एक करायचं असेल तर देहाविना कसे घडेल? देह सार्थकी लावला म्हणजे बरं.
आत्म्यासाठी देह झाला. देहासाठी आत्मा आहे, दोन्हीमुळे व्यवहार होऊ शकतो. त्याचा कार्यभाग अशा तऱ्हेने उदंड चाललेला आहे. कितीही चोरून गुप्त रूपाने काहीही केलं तरी ते आत्म्याला माहिती होतं. याचं सगळं कर्तृत्व त्याला माहिती आहे. देहामध्ये आत्मा असतो. देहाचे पूजन केले की आत्मा संतोषतो. देहाला त्रास दिला तर आत्मा नाराज होतो. देहाशिवाय वेगळी पूजा उपयोगी ठरत नाही, तर देहाशिवाय पूजा होतच नाही, म्हणून लोकांना, जनता जनार्दनाला संतुष्ट करावं. उदंड विचार प्रगटला. त्याच्यानंतर धर्म स्थापना झाली. मगच पुण्य शरीराला पूजेचा अधिकार मिळाला. उगीचच भजन केलं तर मूर्खपण अंगी लागतं. गाढवाची पूजा केली तरी त्याला काय कळणार? जे पूज्य आहेत त्यांनाच पूजा घेण्याचा अधिकार आहे. इतरांना उगाचच खुश करायचं हे योग्य नाही, पण इतरांचं मन दुखवू नये म्हणजे बरं. सगळ्या जगदांतरीचा देव रागावला तर राहायला जागा राहणार नाही. माणसावाचून माणसाचं भागणार नाही. परमेश्वराचे गुण अनंत आहेत. माणसाचे परमेश्वरात रुपांतर झाले याची खुण काय सांगायची? परंतु अध्यात्म ग्रंथाचे श्रवण केलं तर ते समजेल. इतिश्री दासबोधे गुरु शिष्य संवादे देह दुर्लभ निरूपण नाम समास चतुर्थ समाप्त.
जय जय रघुवीर समर्थ.
पद्माकर देशपांडे
(निरूपणकार पत्रकार / लेखक)
मोबा. 9420695127