जय जय रघुवीर समर्थ. नाभीपासून उन्मेश वृत्ती त्यालाच परा असे म्हणतात हे श्रोत्यांनी जाणावे. ध्वनीरूपी पश्यंती हृदयामध्ये वास करते. कंठापासून नाद झाला त्याला मध्यम वाचा असं म्हणतात. अक्षराचा उच्चार होतो त्याला वैखरी म्हणतात. नाभीस्थानी परावाच्या म्हणजे अंतःकरणाचा ठाव होय. अंतकरण पंचकाचा निर्णय असा आहे. मनात काहीही कल्पना नसताना सहजच जे स्फुरण होतं, शांत असताना आठवण होते, ते अंतकरणा हे जाणीवमय असतं. अंतःकरणाला आठवलं, पुढे होईल की नाही असं वाटलं, करू की नको असं वाटलं त्याला मन म्हणायचं. संकल्प विकल्प म्हणजे मन. ते अंदाज घेत राहते. पुढे बुद्धीच रूप असलेला निश्चय आहे. करीनच अथवा करणार नाही असा निश्चय करतो ती बुद्धी असते असे जाणावे.
ज्या वस्तूचा निश्चय केला तेच पुढे चिंतन करायला लागला त्याला चित्त म्हणायचं. पुढे कार्याचा अभिमान धरणे, हेच कार्य अगत्याने करणे, कार्याला प्रवृत्त होणे हा अहंकार. असे आहे अंत:करणपंचक. पाच वृत्ती मिळून एक होतं. कार्याचे वेगवेगळे भाग होऊन पाच वेगळे प्रकार होतात. पाच प्राण असतात त्याप्रमाणे कार्याच्या अनुसार हे वेगळे होतात अन्यथा वायूचे लक्षण एकच. सर्वांगांमध्ये व्यान, नाभीमध्ये समान, कंठामध्ये उदान आणि गुदामध्ये अपान, मुख व नाकामध्ये प्राण असतो असे जाणावे. असं हे प्राण पंचक आहे. आता ज्ञानेन्द्रिय पंचक पाहू. श्रोत्र, त्वचा, चक्षु, जीभ, नाक अशी ही ज्ञानेंद्रिय आहेत. वाचा, हात, पाय, शिस्न, गुद ही कर्मेद्रिय आहेत. शब्द स्पर्श रूप रस गंध असे हे विषय पंचक आहे. अशा तऱ्हेची ही पाच पंचके आहेत असे हे २५ गुण मिळवून सूक्ष्म देह होतो. त्याचे मिश्रण होते ते श्रवण केलं पाहिजे.
अंत:करण, व्यान, श्रवण, वाचा शब्द हे आकाशाचे विषय. पुढे वायूचा विस्तार बोललेला आहे. मन समान, त्वचा पाणी, स्पर्श रूप हा पवनाचा विषय. असे आडाखे साधून कोष्टक तयार करावं म्हणजे पंचीकरण नीट समजेल. बुद्धी उदान, नयन चरण, रूप हे तेज विषयाचे दर्शन. संकेताने बोललेलं मन घालून पाहावे. चित्त अपान, जिव्हा,शिस्न, रस हे आप म्हणजे पाण्याचे विषय. अहंकार, प्राण, घ्राण, गुद, गंध हे पृथ्वीचे विषय आहेत, असं शास्त्राच्या मताद्वारे निरूपण केलं आहे. असा हा सूक्ष्मदेह आहे तो पाहिल्यावर निसःन्देह होतो. मन घालून पाहील त्यालाच ते उमजेल. असे सूक्ष्मदेह सांगितले. पुढे स्थूल देह सांगतो. आकाशाचे पाच गुण वर्तले ते स्थुलामध्ये कसे आले? काम क्रोध शोक मोह भय हा पंचविध आकाशाचा गुण आहे. पुढे पंचविध वायू सांगतो.
चलन, वलन, प्रसारण विरोध आणि आकुंचन हे वायूचे पाच लक्षण. क्षुधा, तृषा, आलस्य, निद्रा, मैथुन हे तेजाचे पाच गुण. आता पुढे पाण्याचे गुण सांगतो. शुक्लीत, श्रोणीत, लाळ, मुत्र, स्वेद हे पाच आपलक्षणे आहेत. पुढे पृथ्वीचे गुण सांगितले पाहिजेत. अस्थी, मांस, त्वचा, नाडी, रोम हे पृथ्वीचे पंचविध धर्म आहेत. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश या पाचाचे प्रत्येकी पाच मिळून पंचवीस मिळून स्थूल देहाला बोलले जाते. तिसरे देह कारण अज्ञान, चौथे देह महाकारण ज्ञान हे चारी देह निरसन केले की विज्ञान आणि परब्रम्ह. विचारपूर्वक हे चारी देह वेगळे केले, मी पण तत्त्वाबरोबर गेले तर ते आत्मनिवेदन होऊन परब्रम्ह प्राप्त होतं. विवेकद्वारे जन्ममृत्यू चुकला. नरदेहाने महत्कृत्य साधले. भक्ती योगाने कृतकृत्य, सार्थक झाले. असं हे पंचीकरण विवरण केलं. ते ऐकल्याने ज्याप्रमाणे लोहाचं सुवर्ण होतं तसं झालं आहे. मात्र हाही दृष्टांत पूर्ण नाही. परिसाकडून परीस केला जात नाही पण साधूला शरण गेल्यावर साधूच होता येते! इतिश्री दासबोधे गुरु शिष्य संवादे समास अष्टम समाप्त.
जय जय रघुवीर समर्थ.
पद्माकर देशपांडे
(निरूपणकार पत्रकार / लेखक)
मोबा. 9420695127