जय जय रघुवीर समर्थ. आत्मा शरीरामध्ये वास्तव्य करतो. अवघं ब्रम्हांड व्यापून राहतो. वासना, भावना परोपरीने व्यापून असतात त्यात आत्मा असतो हे किती म्हणून सांगायचं? मनाच्या अनंत वृत्ती, अनंत कल्पना आहेत. अनंत प्राणी आहेत त्याची किती माहिती देणार? अनंत राजकारण धरणे, कुबुद्धी, सुबुद्धीचे विवरण करणे, कळू न देणे, चुकवणे, सगळं प्राणीमात्रांना आहे. एकाला एक जपतात, टपतात, एकाला एक खपतात, लपतात. शत्रूपणाची स्थिती गती चहूकडे आहे. पृथ्वीवर परोपरीने एकाला एक फसवतात. कित्येक भक्त आहे ते परोपरीने परोपकार करतात.
एक आत्मा, अनंत भेद. देहानुसार वेगवेगळे अनुभव घेतात. आत्मा मात्र मुळचा अभेद असतो तो भेद देखील धरतो. पुरुषाला स्त्री पाहिजे, स्त्रीला पुरुष पाहिजे. नवरीला नवरी पाहिजे असे साधारणतः घडत नाही. पुरुषाचा जीव स्त्रियांच्या जीवात अशी उठाठेव शक्यतो नसते. विषयसुखात गोवले जाते तेथे भेद आहे. ज्या प्राण्याला जो आहार तोच त्याला लागतो. पशुच्या आहाराबद्दल माणूस अनादर बाळगतो. आहारभेद, देहभेद, गुप्त प्रकट उदंड भेद आहेत. त्याप्रमाणे प्रत्येकाचा आनंद वेगळा आहे. सिंधू म्हणजे सागर, भूगर्भामधले पाणी त्या पाण्यामधली शरीर वेगळी, त्याच्यामध्ये जळचरही अत्यंत मोठी असतात. सूक्ष्मदृष्टी मनात आणली तर शरीराचा अंत लागत नाही. मग तो अंतरात्मा तिथे कसा येतो हे अनुमान कसे करणार? देहात्मयोग शोधून पाहिला तिथेही काही त्याचा अनुमान आले नाही. स्थूल, सूक्ष्म गोंधळ निर्माण होतो. हा गोंधळ सोडवण्यासाठीच नाना निरूपण केली जातात. असे अंतरात्मा कृपाळूपणे अनेक मुखांनी बोललेला आहे. असं समर्थ सांगतात. इतिश्री दासबोधे गुरु शिष्य संवादे आत्माराम निरूपण नाम समास अष्टम समाप्त. जय जय रघुवीर समर्थ.
दशक 16 समास 9 नाना उपासना निरूपण नाम समास
जय जय रघुवीर समर्थ. पृथ्वीवर नाना लोक आहेत. त्यांच्या नाना प्रकारच्या उपासना आहेत. वेगवेगळ्या प्रकाराने ते ठाई ठाई भजन करतात. आपल्या देवाचे भजन करतात, नाना स्तुती स्तवन करतात. उपासनेसाठी ते निर्गुण म्हणतात. याच्यामध्ये काय भाव आहे, मला त्याबद्दल अभिप्राय सांगावा. अरे हा स्तुतीचा स्वभाव असा आहे. निर्गुण म्हणजे मायेमुळे शक्य होते पण ती बहुगुणी असल्याने निर्गुणच बहुगुण आहे असं म्हटलं जातं. वास्तविकता चंचल अंतरात्माच बहुगुणी आहे. सगळ्या लोकांनी ते मानावं. एका आत्मा अंतरात्म्याला मिळतो हे अधिकारानुरूप सगळ्यांचा अंतरात्मा एकच आहे की नाही हे पटेल. श्रोता म्हणाला हे अनुमान म्हणजे मुळाला पाणी घातले की ते पानोपानी पसरते त्याप्रमाणे रोकडी प्रचीती आहे. त्यावर वक्ता म्हणाला तुळशीला भांड भरून पाणी घातलं तर ते तिथे थांबत नाही, भूमीच्या भेदानुसार ते क्षणभरात जिरून जाते. तर मोठ्या झाडाला कसं करावं, ते शेंड्यापर्यंत कसे न्यायचं? याचा अभिप्राय देवाने मला सांगावा.
पावसाचं पाणी पडतं ते मुळाकडे येतं. तिथे काय होतं ते काही समजत नाही. सगळ्यांना मूळ सापडावे असं पुण्य कसं घडेल? साधूजनांचे पोवाडे विवेकी मन कसे गातील? तथापि वृक्षाच्या या दृष्टांतावरून जीवनामध्ये पाणी कुठे घातला तर कुठे पडतं त्या गोष्टीचे साकडं पडत नाही. या मागील जी शंका निर्माण झाली होती तिचं समाधान झालं. आता गुणाला निर्गुण कसं म्हणतात? चंचलपणाने विकार निर्माण झाले त्याला सगुण असं म्हणतात उरलेले जे आहे ते गुणातीत, निर्गुण. यावर वक्ता म्हणाला, हा विचार तू सारासार शोधून पहा. अंतरामध्ये निर्धार केला तर निर्गुण असं नावही मग उरणार नाही. विवेकामुळे तो मुख्य राजा होतो आणि सेवकाचं नाव राजा आता याचा विचार समजा, यावर विवाद करणे खोटे. कल्पांत प्रलयाच्या वेळी जे उरलं ते निर्गुण. बाकी सगळे मायेमध्ये आले. सेना, शहर, बाजार, नाना लहान थोर यात्रा, नाना शब्द निर्माण होतात त्याच्यातून कसं काय निवडायचं ते तुम्ही शोधायला हवं. असं समर्थ सांगत आहेत.
जय जय रघुवीर समर्थ.
पद्माकर देशपांडे
(निरूपणकार पत्रकार / लेखक)
मोबा. 9420695127