जय जय रघुवीर समर्थ. पृथ्वीचे मूळ पाणी आहे. पाण्याचे मूळ अग्नी आहे. अग्निचे मूळ वारा किंवा पवन आहे हे मागे सांगितलं. आता पवनाचे मूळ ऐका. सर्वांमध्ये चंचळ असलेला केवळ अंतरात्मा हेच वायूचे मूळ आहे. तो येतो जातो पण दिसत नाही. स्थिर होऊन बसत नाही. त्याचं रूप हे वेदश्रुतीनाही अनुमानता येत नाही. ब्रह्माचे आद्य मूळ स्फुरण म्हणजे अंतरात्म्याचं लक्षण. जगदीश्वरापासून त्रिगुण पुढे झाले. त्या त्रिगुणापासून भूते झाली; नंतर ती स्पष्ट दशेला आली. त्या भूतांचे स्वरूप विवेकाने ओळखावं. त्यामध्ये मुख्य आकाश चारही भूतांमध्ये विशेष आहे. त्याच्या प्रकाशामुळे सगळीकडे प्रकाश पसरतो.
विष्णू हा महाअद्भुत असा भूतांचा संकेत आहे परंतु त्याचा अनुभव घेतला पाहिजे. भूतांची माहिती विस्ताराने सांगितली, त्या भूतांमध्ये व्यापक काय आहे ते पाहून त्याचा प्रत्यय घेता येतो. आत्म्याच्या चपळपणापुढे वायु हा किती बापडा आहे! आत्म्याचं चपळपण हे समजून घ्यावे. आत्म्याशिवाय काम चालत नाही. आत्मा दिसत नाही किंवा आढळत नाही. गुप्तरूपाने नाना विचार पाहून सोडतो. त्याने पिंड ब्रम्हांड व्यापून धरलं. नाना शरीरात तो विराजमान झाला, विवेकी जनांना तो जगाच्या आतबाहेर असल्याचे लक्षात आलं. आत्म्याशिवाय देह चालेलं हे कल्पनेत देखील घडणार नाही. अष्टधा प्रकृती त्याच्यामुळेच व्यक्त रूपाला आलेल्या आहेत. मुळापासून शेवटपर्यंत सगळं काही आत्माच करतो. आत्म्याच्या पलीकडे निर्वीकारी परब्रह्म आहे. आत्मा शरीरामध्ये राहतो. इंद्रियांचे ग्राम असतं ते जागृत करतो, देह आणि अंतरात्मा यांच्या संयोगामुळे नाना सुख दुःखे भोगतो. सात आवरणाचे ब्रह्मांड, त्यात सात आवरणांचा पिंड त्या पिंडामध्ये सर्वश्रेष्ठ असा आत्मा आहे, तो विवेकाने ओळखावा. शब्द ऐकल्यावर समजतो, समजल्यावर प्रत्युत्तर देतो. त्वचेद्वारे कठीण आणि मृदू, शीत उष्ण जाणतो, नेत्राद्वारे पदार्थ पाहतो, नाना पदार्थांचे परीक्षण करतो. मनाद्वारे उच्च नीच जाणून घेतो.
क्रूरदृष्टी, सौम्यदृष्टी, कपटदृष्टी, कृपादृष्टी, नाना प्रकारच्या दृष्टी आहेत. हा भेद जाणवतो. जिभेमध्ये नाना स्वाद असतात. त्याच्यातील भेदाभेद निवड करता येते. जे जे जाणलं ते विशद करून बोलतो. उत्तम अन्नाचा सुगंध, नाना सुगंध परिमळ, नाना फळांचे वास हे नाक जाणते. जिभेने स्वाद घेणे, हाताद्वारे देणे घेणे, पायामुळे सर्वकाळ जाणे येणे. शिस्नाद्वारे सुरतभोग भोगतो. गुदद्वाराने मल-मूत्र त्याग करतो. मन सगळं काय आहे त्याची कल्पना करते. असा त्रिभुवनमध्ये एकटा आत्माच व्यापार करीत असतो. त्याचे वर्णन करण्यास त्याच्याशिवाय थोर दुसरा कोणीही नाही. ज्याचा महिमा सांगेल असा दुसरा कोण आहे? आत्म्याचा व्याप न भूतो न भविष्यति आहे. चौदा विद्या चौसष्ट कला, धूर्तपणाच्या नाना कला, वेद-शास्त्र पुराण सोहळा त्याच्याविना कसा राहील? इहलोकाचे वर्तन, परलोकी सारसार विचार हे सगळं आत्माच करत असतो. नाना मते, नाना भेद, नाना संवाद-विवाद तो करतो. मुख्य तत्त्वविचार तो करतो. त्यामुळे त्याला सर्वसृष्टीच्या व्यापाचे रूप आले. त्यामुळे सगळं काही सार्थक झालं. लिहिणं, वाचणं पाठांतर करणे, विचारणे, अर्थ सांगणे, अर्थ करणे, गाणे वाजवणे नाचणे हे आत्म्यामुळेच होते. नाना सुखांमुळे आनंद होतो. नाना दुःखांमुळे कष्टी होतो. देह धरतो आणि सोडतो असे नाना प्रकार आहेत. अश आत्म्याची माहिती समर्थ देत आहेत.
जय जय रघुवीर समर्थ.
पद्माकर देशपांडे
(निरूपणकार पत्रकार / लेखक)
मोबा. 9420695127