जय जय रघुवीर समर्थ. वैश्वानर म्हणजे अग्नि हा धन्य आहे. खरी सीता अपहरणापूर्वीच अग्नीत ठेवली होती. ती अग्नी दिव्याच्या वेळी परत मिळाली. असा अध्यात्म रामायणात उल्लेख आहे. त्यामुळे अग्नी हा सीतेचा पिता व रामाचा सासरा आहे म्हणून रामदास स्वामी म्हणतात, धन्य धन्य हा वैश्वानरु, रघुनाथाचा श्वशुरु, विश्वव्यापक विश्वंभर पिता जानकीचा! ज्याच्या मुखाच्या माध्यमातून भगवंत हा भोक्ता आहे. तो ऋषींना फळ देणारा आहे. तम म्हणजे अंधार, हिम म्हणजे थंडी आणि रोग यांचे हरण करणारा, विश्वजनांचा भर्ता असा अग्नी आहे.
नाना वर्ण, नाना भेद असले तरी सगळ्या जीवमात्रांना अग्नी अभेद आहे. ब्रह्मादिकाना तो अभेद आणि परमशुद्ध आहे. अग्नीमुळे सृष्टी चालते. अग्नीमुळे लोक सुखी होतात. अग्नीमुळे सगळे लहान थोर आहेत. अग्नीमुळे पाणी शोषून घट्ट झाले आहे. लोकांना राहण्यासाठी जागा अग्नीमुळे निर्माण झाली आहे. दीप, दीपिका नाना ज्वाला सर्वत्र आहेत. पोटामध्ये जठराग्नी आहे, त्याच्यामुळे लोकांना भूक लागते. अग्नीमध्ये अन्न शिजवलं जातं. त्याच्यामुळे भोजनाला रुची येते. अग्नी सर्वांगांमध्ये व्यापक आहे. सर्व लोक उष्ण असतात. शरीर उष्ण नसले तर लोक मरून जातात. आधी अग्नि मंद होतो, पुढे तो प्राणी नष्ट होतो असा अनुभव प्राणीमात्रांना आहे. अग्नीचे बळ असेल तर शत्रूला तात्काळ जिंकता येते.
अग्नी आहे म्हणून जीवन आहे. नाना रस अग्नीमुळे निर्माण झाले. रोग्यांना अग्नीमुळे तत्काळ आरोग्य प्राप्त झाले. सूर्य सर्वांपेक्षा विशेष आहे. त्यानंतर अग्नीचा प्रकाश आहे. रात्रीच्या वेळी अग्नी माणसाला सहाय्य करतो. एखाद्या सामान्य माणसाकडून अग्नी आणला तरी त्याला दोष नाही. सगळ्या घरांमध्ये अग्नी हा पवित्र आहे. अग्निहोत्र, नाना याग, अग्नीला प्रसन्न करण्यासाठी केले जातात. त्यासाठी अनेक पूजापाठ केले जातात. देव दानव मानव हे सगळे अग्नीमुळे आहेत. सगळ्यांना अग्नी गरजेचा असतो. मोठ्या प्रमाणावर लग्न करतात, नाना शोभेच्या दारूचे प्रकार उडवतात, भूमंडळामध्ये यात्रा करतात त्याला शोभेची दारू वापरतात. नाना लोक रोगी होतात, त्यांना उष्ण औषध दिले जातात. त्याच्यामुळे लोकांचे आरोग्य वाढते. ब्राह्मणासाठी शरीर,मन म्हणजे सूर्यदेव आणि हुताशन म्हणजे अग्नी याविषयी काहीच संशय नाही. लोकांमध्ये जठरानळ, सागरामध्ये वडवानळ, भूगोलाच्या बाहेर आवर्णानळ, शिवाच्या नेत्रात विद्युल्लता. काचेच्या भिंगापासून अग्नी होतो. उंच अशा दर्पणापासून अग्नी निघतो. काष्टाचे मंथन केले असता चकमक करून अग्नी निर्माण होतो.
अग्नि सगळ्यांच्या ठाई आहे. कठीण घासल्यावर तो प्रगट होतो. मुखातून जाळ काढणाऱ्या सर्पामुळे गिरीकंदर देखील जळून जातात. अग्नीसाठी नाना उपाय केले जातात. अग्नीमुळे नाना अपाय होतात. विवेक वापरला नाही तर सगळं निरर्थक आहे. भूमंडळावर लहानथोर आहेत. सगळ्यांना अग्नीचा आधार आहे. अग्नीच्या मुखामुळे परमेश्वर संतुष्ट होतो. असा अग्नीचा महिमा आहे. जितकं बोलेल तितकं उपमा कमी पडेल. उत्तरोत्तर अग्निपुरुषाचा महिमा अगाध आहे. अग्नि जिवंत असेल तर तो सुखी करतो. मेलेल्या प्रेताला भस्म करतो. सर्वभक्षक असं त्याला म्हणतात. त्याची थोरवी काय सांगावी! सगळ्या सृष्टीचा संहार करून वैश्वानर हा प्रलय घडवून आणतो. वैश्वानर किंवा अग्नीमुळे पदार्थमात्र काहीच उरत नाही. नाना उदंड होम करतात, घरोघरी वैश्वदेव चालतात, नाना क्षेत्री दीप जळतात, देवापाशी दिवे लावतात, निरंजन लावतात, देवांना ओवाळतात. अग्नीदिव्य करून खरे खोटे परीक्षा घेतात. अष्टधा प्रकृती, तिन्ही लोक, सर्वत्र अग्नी व्यापून उरलेला आहे. असा अग्नीचा आघात महिमा आहे त्याला मुखाने किती म्हणून सांगायचं? चारी शृंगे त्रिपदी जात दोन्ही शिरी सप्त हात असा शास्त्रार्थ आहे. त्याचा अर्थ असा, चार शृंगे म्हणजे धर्म अर्थ काम आणि मोक्ष, तीन पदे म्हणजे कर्म उपासना आणि ज्ञान, दोन शिरे म्हणजे प्रवृत्ती आणि निवृत्ती आणि सात हात म्हणजे सात व्याव्ह्रूत्ती. शेवटी अग्नी सर्व विश्वात व्यापक आहे. असा अग्नी हा उष्ण मूर्ती आहे. त्याची मी यथामती माहिती दिली. त्याच्यामध्ये कमी जास्त झाले असेल तर श्रोत्यांनी क्षमा केली पाहिजे. असं समर्थ सांगतात. इतिश्री दासबोधे गुरु शिष्य संवादे अग्नीनिरूपण नाम समास पंचम समाप्त.
जय जय रघुवीर समर्थ.
पद्माकर देशपांडे
(निरूपणकार पत्रकार / लेखक)
मोबा. 9420695127