जय जय रघुवीर समर्थ. वायुचा असा विकार आहे, किंबहुना वायूचा विस्तार इतका आहे की तो सांगता येत नाही. सगळे चराचर वायूमुळे आहे. वायू हा स्तब्ध असतो तेव्हा सृष्टीला धारण करणारा आहे तर चंचल रूपामध्ये सृष्टीचा कर्ता आहे. इतके सांगून कळत नसेल तर त्याला प्रवर्ता असे म्हणावे म्हणजे कळेल. मुळापासून शेवटपर्यंत सगळं काही वायूच करतो. वायूपेक्षा वेगळे कर्तुत्व असेल तर मला सांगावे. जाणिवरूपी मूळ माया स्वरूपामध्ये लीन होते आणि गुप्त किंवा प्रकट होऊन विश्वामध्ये राहते. जीवनात भरती ओहोटी असते त्याप्रमाणे कुठे गुप्त तर कुठे प्रगट असे तिचे भूमंडळावरील स्वरूप असते. कुठे जोरदार वारा तर कुठे मंद झुळुका असे वायूचे दर्शन घडते.
अंगावरून वारे गेले की हातपाय वाळतात, वारा जोरात आला की पिके करपतात. नाना रोगांच्या साथी वायुमुळे येतात, पृथ्वीवर पीडा देतात. आकाशात वीज कडाडते तीही वायुमुळे. वायुमुळे रागदारी निर्माण झाली, स्वरज्ञान झाले, दीप राग, मेघमल्हार राग चमत्कार घडवतो तो वायुमुळे. वायूमुळे भूल पडते, वायू फुंकला की फोड, गळवे येतात,ती बरी होतात. नाना मंत्र वायुमुळे चालतात. मंत्रातून देव प्रकटतात. मंत्रामुळे होत भुते आकर्षित होतात. जादुगिरी, मंत्र तंत्र, चमत्कार करतात. राक्षसांची मायावी रचना ही देवादिकानाही समजत नाही. स्तंभन मोहन वगैरे, घटकेत शहाण्याला वेडे करावे, वेड्याला शहाणे करावे असे वायूचे नाना विकार किती म्हणून सांगावे! देव मंत्रांद्वारे संग्राम करतात, ऋषींचा अभिमान म्हणजे मंत्र, मंत्राने पक्षांचे जीव घेतात, उंदीर प्राणी यांना मंत्रामुळे बांधून ठेवता येते. मंत्रामुळे महासर्प खिळून राहतात आणि धनलाभही होतो. आता असो हा प्रश्न राहिला नाही. बद्धाचा जन्म प्रत्ययास आला. श्रोत्यांचा मागील प्रश्न सुटला. इतिश्री दासबोधे गुरुशिष्य संवादे देहांत निरूपणनाम समास अष्टम समाप्त. जय जय रघुवीर समर्थ.
दशक नऊ समास नऊ संदेहवारण नाम समास
जय जय रघुवीर समर्थ. ब्रम्हाला मारले तरी मारले जात नाही, ब्रह्माला दूर सारले तरी दूर होत नाही. ब्रह्म कमी होत नाही. ब्रह्माला भेदले तरी भेदले जात नाही. ब्रम्हाला छेदले तरी छेदले जात नाही. ब्रह्म निर्माण होत नाही आणि नाहीसे होत नाही. ब्रह्मा अखंड आहे, त्याचे खंडन होत नाही. ब्रह्मामध्ये दुसरे बंड नाही तरी मध्येच ब्रह्मांड कसं शिरलं? पर्वत, पाषाण, शिळा ,शिखरे, नाना स्थळे, धर्मस्थळे, भूगोल रचना ही कशी झाली आहे? ब्रह्मामध्ये भूगोल आहे, ब्रह्म भूगोलामध्ये आहे. पाहिल्यावर एकामध्ये एक प्रत्यक्ष दिसते. ब्रह्माने भूगोलाला छेद दिला आणि भूगोलाने ब्रह्म भेदले.
विचार केल्यावर त्याचा प्रत्यक्ष प्रत्यय आला. ब्रह्माने ब्रह्मांड भेदले हे पाहिले तर ठीकच झाले पण ब्रह्माला ब्रम्हांडाने भेटले हे विपरीत दिसतं. भेदले नाही असे म्हणावे तरी ब्रह्मात ब्रह्मांड असल्याचे अनुभवाने दिसत आहे. आता हे कसं झालं याचा विचार करून बोलायला पाहिजे. असा श्रोत्यांनी प्रश्न विचारला आहे. याचे उत्तर सावधपणे ऐका म्हणजे मग तुमचा संदेह दूर होईल. ब्रम्हांड नाही म्हटले तरी दिसते आणि दिसले म्हटले तरी नसते! आता हे श्रोते कसे जाणतील? तेव्हा श्रोते उत्साहीत झाले आणि आम्ही सावध आहोत असे म्हणाले. उचित प्रत्युत्तर बोला, असे म्हणाले. हा भाग इथेच संपला असून पुढील कथा ऐकू या पुढील भागात.
जय जय रघुवीर समर्थ.
पद्माकर देशपांडे
(निरूपणकार पत्रकार / लेखक)
मोबा. 9420695127