जय जय रघुवीर समर्थ. अहो या शहाणपणासाठी अनेकांसाठी खूप कष्ट करावे लागतात. पण शहाणपण शिकणे हे सर्वात उत्तम असते. जो अनेकांना मानतो तो शहाणा झाला असं ओळखावं. शहाण्या माणसाला जगामध्ये काहीही कमी पडत नाही. आपले हित लौकिक जीवनात करीत नाही तो आत्मघातकी जाणावा. त्या मुर्खाइतका पापी दुसरा कोणी नाही. आपण संसारामध्ये कष्ट घेतो, लोकांकडून राग ओढवून घेतो, जनांमध्ये शहाणा असतो तो असं करीत नाही. साधकाला काही शिकवले. जमेल तेवढं सुखाने घ्याव. जे पटणार नाही ते सोडावे. श्रोत्यानो तुम्ही परमदक्ष आहात. अलक्षाकडे लक्ष लावता, हे मी सामान्यपणे प्रत्यक्ष जाणतो. इतिश्री दासबोधे गुरु शिष्य संवादे श्रेष्ठ अंतरात्मा निरूपण नाम समास तृतीय समाप्त. जय जय रघुवीर समर्थ.
दशक 15 समास 4 शाश्वत ब्रम्हनिरूपण नाम समास
जय जय रघुवीर समर्थ. पृथ्वीपासून झाडे झाली. झाडांपासून लाकडे निर्माण होतात. लाकडांची राख होऊन पुन्हा पृथ्वीत तिचे रूपांतर होते. पृथ्वीपासून वेल होतात, नाना जिन्नस वाढतात, वाळतात, कुजतात, पुन्हा त्याची माती होते, पृथ्वी होते. नाना धान्याचे नाना अन्न तयार होते. मनुष्य भोजन करतो. नाना विष्ठा नाना वमन होते आणि त्याची पुन्हा पृथ्वीच होते. नाना पक्षी आदींनी भक्षण केले तरी पुन्हा तसेच झाले. वाळवून भस्म होऊन गेले पुन्हा पृथ्वीचे रूप त्याला आले. माणसं मरतात, कृमी लागतात, भस्म होते पुन्हा पृथ्वीचे रूप घेतात. अशा अनेक काया पडतात पण पुढे त्याचं रूपांतर पृथ्वीमध्ये होतं.
नानात लाकडं गवत कुजले जातात त्याची माती होते नाना किडे मरून जातात पुढे त्याचे पृथ्वी होते. पदार्थ अनेक दाटलेले. किती विस्तार सांगायचा? पृथ्वीवाचून कोणालाही थारा आहे का? झाड-पाले आणि गवत, पशूंनी भक्षण केले की त्याचे शेण होतं. खत मृत भस्म मिळून पुन्हा त्याची पृथ्वी होते माती होते. उत्पत्ती स्थिती संहार झाल्यानंतर सगळे काही पृथ्वीला मिळून जातं. जितकं होतं तितकं जात. पुन्हा पृथ्वी. नाना बिजांच्या राशी या उगवतात, वाढतात आणि गगनापर्यंत जातात आणि पुन्हा पृथ्वीला मिळून जातात. लोक नाना धातू पुरतात त्याची माती होते. सुवर्ण पाषाणाची गती तशीच आहे. मातीचे होते सुवर्ण आणि मृत्तिकेचे होती पाषाण. अग्नीच्या संगतीने भस्म होते. सुवर्णाची जर असते ती देखील शेवटी कुजून जाते. रस होऊन वितळते पुन्हा पृथ्वी होते. पृथ्वीपासून धातू निर्माण होतात. अग्नीमुळे रस तयार होतात. त्या रसाचे जगात पुन्हा कठीण रूप तयार होते. नाना पाण्याला गंध सुटतो पुन्हा तिथे पृथ्वीचे रूप प्रकट होते. दिवसेंदिवस जळ म्हणजे पाणी आटून जातं. पुढे पृथ्वी होते.
पत्रे पुष्पे फळे उगवतात, नाना जीव खाऊन जातात. ते जीव मरतात, जगतात जितका काही आकार झाला जितक्या सर्वांना पृथ्वीचा आधार असतो. सगळ्यांना हे किती म्हणून सांगायचं? विचारपूर्वक जाणावे. सगळ्यांनी बेरीज वजाबाकीचे मूळ कसे येते त्याप्रमाणे समजावे. पाणी आटून पृथ्वी झाली. पुन्हा पाण्यात मिळून गेली. अग्नीच्या योगाने भस्म होऊन पुन्हा पृथ्वी झाली. तेजापासून पाणी झालं, पुढे तेजाने ते शोषून घेतलं. तेज झाले वायूपासून. पुढे वायुच त्याला व्यापून उरतो. वायू आकाशामध्ये निर्माण झाला आणि पुन्हा गगनामध्ये विरला. अशा प्रकारची बेरीज वजाबाकी कशी होते पहा. जे जे जिथे जिथे निर्माण होते तेथे तिथे लयाला जाते. अशा तऱ्हेने ही पंचभुते नाश पावतात. भूत म्हणजे निर्माण झाले, पुन्हा ते नष्ट झाले. पुन्हा शाश्वत उरले परब्रम्ह. अशा प्रकारचे परब्रम्ह जे आहे ते ज्याला कळत नाही त्याला जन्ममृत्यू चुकत नाही. चत्वार खाणीत जन्म घ्यावा लागतो. जडाचे मूळ चंचळ असतं, चंचलाचं मूळ निश्चल असतं. निश्चलाला मूळ नाही. जगत झाले असून ते सत्य आहे हा पूर्वपक्ष व मिथ्या आहे हा सिद्धांत. या दोन्ही पक्षाहून जे अलिप्त , जेथे काहीच झाले नाही ते परब्रह्म.
जय जय रघुवीर समर्थ.
पद्माकर देशपांडे
(निरूपणकार पत्रकार / लेखक)
मोबा. 9420695127