जय जय रघुवीर समर्थ. कविता म्हणजे शब्द सुमनांच्या माळा. त्यातून आगळावेगळा अर्थाचा सुगंध पसरतो त्यामुळे संतांच्या विविध कुळांना आनंद प्राप्त होतो. अशा माळा अंतकरणांमध्ये गुंफून रामचरणी पूजा अर्पण करावी. ओंकारतंतू अखंड राहावा, तो खंडित होऊ नये. परोपकारणासाठी कवित्व जरूर करावे. त्या कवित्वाची लक्षणे सांगत आहे. ज्यामुळे भगवदभक्ती घडते, ज्यामुळे विरक्ती निर्माण होते, अशा कविताची युक्ती आधी वाढवावी. कृतीशिवाय शब्दज्ञान सज्जन मानत नाहीत, म्हणून कृपा करून देव प्रसन्न करावा. देवाच्या प्रसन्नतेमुळे जे जे बोलणे घडेल तेथे अत्यंत चांगले व प्रासादिक असे राहील. धीट पाठ, प्रासादिक असे अनेक प्रकार आहेत तरी त्या संदर्भात विवेक बोलला पाहिजे.
धीट म्हणजे जे जे आपल्या मनाला वाटले तेथे धीटपणे केले, बळजबरीने कवित्व रचले याला धीट म्हणावे. पाठ म्हणजे पाठांतर. अनेक ग्रंथ पाहिले, त्यासारखेच आपणही रचले, शीघ्र कवित्व जोडले, डोळ्यांना दिसले तेच वर्णन केले. भक्ती नसताना जे केले त्याला धीट पाठ असं म्हणतात. कामुक, रसिक, शृंगारिक, वीर, हास्य, प्रास्तविक, कौतुक, विनोद अशा अनेक प्रकारच्या काव्याला धीट पाठ असे म्हणतात. मन कामातूर झाले की तसेच उद्गार निघतात. त्यामुळे भवसागरापासून मुक्ती मिळत नाही. पोटाची शांती करण्यासाठी नरस्तुती करावी लागते, त्यासाठी जी विद्वत्ता वापरली जाते त्याचे नाव धीट पाठ. कवित्व धीट पाठ नसावे, कवित्व खटपटीने रचलेले नसावे, कवित्व उद्धट, पाखंडी मत नसावे. कवित्व वादंग असलेले नसावे. रसभंग करणारे नसावे. दृष्टांत नसलेले, रंगभंग करणारे कवित्व नसावे. कवित्व म्हणजे पाल्हाळ नसावे, कवित्व बाष्कळ नसावे, एखाद्या व्यक्तीला समोर ठेवून त्याची निंदा करणारे कवित्व नसावे. कवित्व हीन नसावं, बोललेले पुन्हा बोलत राहू नये, छंदभंग करू नये, लक्ष न देण्यासारखे कवित्व नसावे.
उत्पत्तीहीन, तर्कहीन, कलाहीन, शब्दहीन, भक्ती ज्ञान वैराग्यहीन कवित्व नसावे. भक्तीहीन कावित्व म्हणजे बिनकामाचे आवड नसलेले वक्तृत्व, ते कंटाळवाणे असते. भक्ती नसलेला अनुवाद म्हणजे विनोद जाणावा. प्रीती नसेल तर संवाद कसा घडेल? असे धीट पाठ कवित्व अहंकाराचे वेड लागलेले असते. आता प्रासादिक कवित्व कस असते ते सांगतो. वैभव, कांता. कांचन हे ज्याला वमन वाटते, मनामध्ये सर्वोत्तमाचे ध्यान लागलेले असते, ज्याला घडी घडी क्षणोक्षणी भगवंताची आवड असते, भगवद भजनाची चढती वाढती गोडी निर्माण होते. जो भगवदभजनाशिवाय एक क्षणही जाऊ देत नाही.
सर्वकाळ भक्तीच्या रंगात रंगलेले अंतकरण असते. ज्याच्या अंतरंगात भगवंत अचलपणे निवांत राहिलेला असतो. तो सहजतेने जे बोलतो ते ब्रम्ह निरूपण होऊन जाते. अंतरामध्ये गोविंद बसलेला आहे त्यामुळे भक्तीचा छंद लागला. भक्तीशिवाय आणखी काहीही तो बोलत नाही. मनामध्ये आवड निर्माण झाली असेल तसेच वैखरी म्हणजे मुखातून बाहेर पडते. तो भावपूर्ण करुणा कीर्तन करतो, प्रेमभराने नाचतो. भगवंताच्या ठाई मन लागले. त्यामुळे देहभान आठवत नाही. शंका लज्जा पळून दूर निघून गेले. तो प्रेमाच्या रंगामध्ये रंगला. तो भक्तीच्या मधामध्ये मातला. त्याने अहंकार पायाखाली तुडवला. गात नाचत नि:शंकपणे भक्ती करतो त्याला लोक कसे दिसतील? त्याच्या दृष्टीमध्ये त्रैलोक्यनायक बसलेला आहे. अशातऱ्हेचं कवित्वाचं वर्णन समर्थ करीत आहेत. पुढील कथा ऐकू या पुढील भागात.
जय जय रघुवीर समर्थ.
पद्माकर देशपांडे
(निरूपणकार पत्रकार / लेखक)
मोबा. 9420695127