जय जय रघुवीर समर्थ. भिक्षा मागितली पाहिजे ही ब्राह्मणाची मुख्य दीक्षा आहे. ओम भवती भिक्षांदेही या धर्माचे रक्षण केले पाहिजे. जो भिक्षा मागून जेवण करतो त्याला निराहारी असं म्हणतात. भिक्षा मागणारा दानात येणाऱ्या संस्कारापासून अलिप्त राहतो. संत-असंत जन असतील तिथे कोरान्न मागून भोजन करतो ते दररोज अमृतप्राशनासमान असते.
भिक्षाहारी निराहारी भिक्षा नैव प्रतीग्रह
असंतो वापी संतो वा सोमपान दिने दिने
असा भिक्षेचा महिमा आहे. भिक्षा ही सर्वोत्तम आहे. ईश्वराचा अगाध महिमा आहे, पण तो देखील भिक्षा मागतो. दत्त, गोरक्ष आदि सिद्ध देखील लोकांमध्ये जाऊन भिक्षा मागतात. भिक्षेमधून निस्पृहता प्रकट होते. वार लावून जेवला तो पराधीन झाला त्याप्रमाणे रोज जर खानावळीत जाऊन जेवत असेल तर त्याला स्वतंत्रता कशी राहील? आठ दिवसांचे धान्य मिळवले तरी ते कंटाळवाणे झाले, नित्य नूतनते पासून लोक दूर गेले. नित्य नूतन हिंडावे, उदंड देशाटन करावं आणि भिक्षा मागत फिरावे म्हणजे बरे. अखंड भिक्षेचा अभ्यास झाला की त्याला कुठलाही भाग परदेश वाटत नाही. जिकडेतिकडे तिन्ही भुवनामध्ये स्वदेशच वाटतो. भिक्षा मागताना चिडू नये, भिक्षा मागताना लाजू नये, भिक्षा मागताना पळू नये. परिभ्रमण करीत राहावे. भिक्षा आणि चमत्कार त्याच्यामुळे लोक चकित होतात.
भगवंताची निरंतर कीर्ती वर्णन करावी. भिक्षा म्हणजे कामधेनु. भिक्षेचे फळ सामान्य नाही. जो भिक्षेला अमान्य करतो तो जोगी करंटा होय. भिक्षेने ओळखी होतात. भिक्षेने भ्रम दूर होतात. सगळे लोक सामान्यतः भिक्षा मान्य करतात. भिक्षा म्हणजे निर्भय स्थिती. भिक्षेमुळे महंत प्रगट होतो आणि स्वतंत्रता आणि ईश्वर प्राप्ती होते. भिक्षेला कसलाही अडथळा नाही. भिक्षाहारी हा मुक्त असतो. भिक्षेमुळे वेळ काळ सार्थक जातो. भिक्षा म्हणजे अमर अशी वेली आहे. जिकडे तिकडे ती लगडलेली आहे. भिक्षा म्हणजे निर्लज्ज आळशी लोकांचा धंदा नाही. पृथ्वीवर नाना देश आहेत. फिरणारा माणूस उपाशी मरत नाही. एखादा मनुष्य लोकांना काही जड होत नाही.
दूध दुभत्याचा धंदा, व्यापार, शेतकी व्यवसाय यापेक्षाही भिक्षेला जास्त प्रतिष्ठा आहे. झोळीवर अवलंबून राहू नये. भिक्षेसारखं वैराग्य नाही, वैराग्यासारखं भाग्य नाही. वैराग्य नसलेला, एका देशात राहणारा अभागी आहे. काही भिक्षा आहे म्हणावे. अल्प संतुष्ट असावे.कोणी खूप आणलं तर एक मूठभर घ्यावं. सुखरूप भिक्षा मागणे हे निस्पृहतेचे लक्षण आहे. मृदू शब्दांमध्ये बोलणे हे परम सुखकारक आहे अशी भिक्षेची स्थिती आहे. ही थोडक्यामध्ये यथामती सांगितली. भिक्षेमुळे कदा काळी येणारी विपत्ती वाचते दूर होते असं भिक्षेचे महत्व समर्थांनी सांगितलेलं आहे. इतिश्री दासबोधे गुरु शिष्य संवादे भिक्षा निरूपण नाम समास द्वितीय समाप्त.
जय जय रघुवीर समर्थ.
पद्माकर देशपांडे
(निरूपणकार पत्रकार / लेखक)
मोबा. 9420695127