जय जय रघुवीर समर्थ. निस्पृहाची लक्षणे समर्थ सांगत आहेत. आपलं स्वातंत्र्य गमावू नये. निरपेक्षता तोडू नये. दुसरा मदत करेल अशी एक क्षणोक्षणी अपेक्षा बाळगू नये. दुसऱ्याच्या वैभवाकडे वाईट दृष्टीने पाहू नये. उपाधी आहे म्हणून सुख मानू नये. स्वरूपस्थितीचा एकांत मोडू देऊ नये. उच्छ्रुंखलपणा करू नये, लोकांची लाज धरू नये, कुठेही आसक्त होऊ नये. परंपरा तोडू नये, उपासना मार्ग सोडू नये, ज्ञानमार्ग कधीही सोडू नये. कर्ममार्ग कधी सोडू नये, कधीही साधन आणि भजन याच्यात खंड पडू देऊ नये. अतिवाद करू नये, मनामध्ये अनीती धरू नये, भलत्याच ठिकाणी रागवारागवी करू नये.
जो मानत नाही त्याला सांगू नये, कंटाळवाणं बोलू नये, एकाच ठिकाणी खूप वर्ष राहू नये, काही उपाधी करू नये, केली तरी ती धरून ठेवू नये. धरली तरी त्याच्यामध्ये गुंतू नये. मोठेपणा मानू नये, स्वतःच महत्व धरून बसू नये, कुठून तरी आपल्याला मान मिळेल अशी इच्छा धरू नये. साधेपणा सोडू नये, लहानपण नम्रता सोडू नये, अन्याय करून अभिमान धरू नये. अधिकार नसताना सांगू नये, दाटून उपदेश देऊ नये, परमार्थ कधीही भिडस्तपणे करू नये. कठीण वैराग्य सोडू नये, कठीण अभ्यास सोडू नये, कोणाविषयी कठोरपणा धरू नये. कठीण शब्द बोलू नये. कठीण आज्ञा करू नये. कठीण परिस्थितीत धीर सोडू नये. आपण कोणावरही आसक्त होऊ नये, केल्याशिवाय सांगू नये, शिष्यवर्गाला वर्षानुवर्ष काही मागत बसू नये. उद्धट शब्द बोलू नये, इंद्रियांचे स्मरण करू नये, शाक्तमार्ग धरू नये, मुक्तपणाचा अभिमान धरू नये.
एखादे हलके काम करण्यास लाजू नये, वैभव असले तरी माजू नये, जास्त क्रोध करू नये. आपल्याला कोण विचारणार या मोठेपणाच्या आढ्यतेने वागू नये. न्यायनीती सोडू नये, अन्यायाने वागू नये, कळल्याशिवाय बोलू नये, अंदाजाने निश्चय करू नये. कोणी मूर्ख पणाने काही सांगितलं तर दुःख मानू नये. सावधपणा सोडू नये, व्यापकपणा सोडू नये, आळसाचे सुख मानू नये. मनात कपट धरू नये, स्वार्थी आज्ञा करू नये, केली तरी अप्पलपोटेपणा करू नये. प्रसंग नसताना बोलू नये, संदर्भांशिवाय गायन करू नये, विचार केल्याशिवाय अविचाराच्या मार्गावर जाऊ नये. परोपकार सोडू नये, परपिडा करू नये, एखाद्याशी वितुष्ट करू नये. आपल्या माहिती नसेल तर सांगावे, महंतपण सोडू नये, द्रव्यासाठी कीर्तन करीत हिंडू नये. ज्याने संशय निर्माण होईल असं बोलू नये. खूप काही निश्चय करू नये. समजावून सांगण्याच्या सामर्थ्याशिवाय लोकांपुढे ग्रंथ वाचू नये.
परीक्षा पाहण्यासाठी विचारू नये, अहंकार दिसू नये. कोणालाही सांगेल असं म्हणू नये. ज्ञानाचा गर्व धरू नये, कोणाचा छळ करू नये, कोणाशीही कुठेही वाद घालू नये. स्वार्थ बुद्धी जडू देऊ नये, व्यर्थ कारभारात पडू नये, राजद्वाराचे कार्यकर्ते होऊ नये. कोणाला भरवसा देऊ नये, देण्यास कठीण भिक्षा मागू नये, भिक्षा मिळावी म्हणून आपली परंपरा सांगू नये. सोयरीकीत पडू नये, मध्यस्थी करत बसू नये, प्रपंचाच्या उपाधी अंगी लावून घेऊ नये. जिथे प्रपंचाचे प्रस्थ खूप असेल तिथे जाऊ नये, अशुद्ध अन्न खाऊ नये, पाहुण्यासारखं आमंत्रण घेऊ नये. श्राद्धपक्ष, साठी, समाधी, शांती, बारसे, भोग, उद्यापन, नवस, व्रते येथे निस्पृह माणसाने जाऊ नये, तिथलं खाऊ नये आणि स्वतःला ओशाळे करू नये. असं समर्थ सांगतात पुढील उपदेश ऐकू या पुढील भागात.
जय जय रघुवीर समर्थ.
पद्माकर देशपांडे
(निरूपणकार पत्रकार / लेखक)
मोबा. 9420695127